लोणावळा नगराध्यक्षांच्या खुनाचे कोडे १२ वर्षांनी पुन्हा अनुत्तरीत

Bombay High Court
  • दोन आरोपींची जन्मठेप हायकोर्टाने केली रद्द

मुंबई : पुणे जिल्ह्यातील लोणावळा नगर परिषदेचे अध्यक्ष राजू चौधरी यांच्या खुनाबद्दल जफर खिजर शेख आणि सुमीत अप्पा ऊर्फ प्रकाश गवळी या दोन आरोपींना सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेप मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) अपिलात रद्द केली आहे. यामुळे या खटल्यातील सर्व सातही आरोपी निर्दोष सुटल्याने चौधरी यांचा खून नेमका कोणी केला याचे आधी सुटलेले कोडे १२ वर्षांनी पुन्हा अनुत्तरीत राहिले आहे.

राजू चौधरी यांचा २६ मे २००९ रोजी दुपारी नगर परिषदेतील त्यांच्या चेंबरमध्ये सुºयाने गळा चिरून आणि अन्य ४१ ठिकाणी भोसकून खून करण्यात आला होता. एकूण सात आरोपींविरुद्ध पुण्याच्या सत्र न्यायालयात या खुनाचा खटला दाखल केला गेला होता. त्यापैकी एका आरोपीला उच्च न्यायालयाने खटल्याचा निकाल होण्यापूर्वीच आरोपमुक्त केले होते. २७ एप्रिल २०१२ रोजी सत्र न्यायालयाने खटल्याचा अंतिम निकाल देऊन जफर शेख व सुमीत गवळी या दोन आरोपींना जन्मठेप ठोठावून अन्य चार आरोपींना निर्दोष मुक्त केले होते. या निकालाविरुद्ध शेख व गवळी यांनी केलेल्या अपिलांचा उच्च न्यायालयात नऊ वर्षांनी निकाल झाला. न्या. साधना जाधव व न्या. एन.आर. बोरकर यांच्या खंडपीठाने ही अपिले मंजूर करून शेख व गवळी यांनाही निर्दोष मुक्त केले.

चौधरी यांच्यावर खुनी हल्ला झाला तेव्हा नगर परिषदेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष उमेश मुदलीयार त्यांच्या चेंबरमध्ये बसलेले होते. हल्ल्यात मुदलीयार हेही जखमी झाले होते. चौधरी यांचा खून व मुदलीयार यांच्या खुनाच्या प्रयत्नाखेरीज गुन्ह्याच्या वेळी अंगावर घातलेले कपडे जाळून पुरावा नष्ट करणे या गुन्ह्यासाठीही हा खटला चालविला गेला होता. खंडपीठाने शेख व गवळी यांना या सर्व गुन्ह्यातून पूर्णपणे निर्दोष मुक्त केले.

खटल्यात अभियोग पक्षाने उभ्या केलेल्या एकूण २७ साक्षीदारांपैकी मुदलीयार हे एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. परंतु त्यांच्या साक्षीत अनेक विसंगती, त्रुटी व विरोधाभास असल्याने खंडपीठाने त्यांची साक्ष अविश्वसनीय मानली. खंडपीठाने म्हटले की, खटल्यात एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असेल व त्याची साक्ष पूर्णांशाने विश्वसनीय असेल तर तेवढ्यावरही आरोपीस दोषी ठरवले जाऊ शकते. परंतु मुदलीयार यांची साक्ष तशी नसल्याने ती आरोपींवरील गुन्हे नि:संयपणे सिद्ध होण्यास पुरेशी नाही.

लोणावळा पोलीस ठाणे नगर परिषदेच्या अगदी समोर आहे. नगराध्यक्षांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलीस १५ मिनिटांत तेथे हजर झाले होते. परंतु त्यांनी केलेल्या तपासातील अनेक त्रुटींवरही खंडपीठाने बोट ठेवले. पोलिसांनी आपल्या तपासाचे समर्थन करण्यासाठी साक्षीदार तयार केले, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले. चौधरी यांचा खून होण्याच्या वर्षभर आधी नगर परिषदेने, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून, शहरातील शंभरहून अदिक बेकायदा बांधकामे पाडून टाकली होती. त्यात गवळी कुटुंबाच्या मालकीची काही हॉटेले व दुकानेही पाडली गेली होती. त्याच्या रागातून चौधरी यांचा खून झाला, असे अभियोग पक्षाचे म्हणणे होते. परंतु खुनाचा हे हेतू पुरेसा समर्थनीय वाटत नाही, असे खंडपीठाने म्हटले.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button