मोदी कमी पडले तर मायावतींचे जमू शकते भजन

Modi-Mayawati.jpg

Badgeउद्या रविवारी लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान होत असताना सर्वांचे लक्ष २३ मे म्हणजे मतमोजणीच्या तारखेकडे लागले आहे. काय होणार २३ तारखेला? ३०० पेक्षा अधिक जागा आम्हाला मिळणार, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तसे झाले तर काहीच वांधा नाही. पक्षात मोदींना अडवण्याची हिंमत कुणात नाही. सरसंघचालक मोहन भागवत हेही आपले ‘रिमोट कंट्रोल’ चालवणार नाहीत; पण समीक्षकांना ‘फिर से एक बार, मोदी सरकार’ अवघड दिसते. गेल्या वेळी भाजपला २८२ जागा मिळाल्या होत्या. त्यापेक्षा कमीच जागा यावेळी मोदींना मिळतील असे सर्वांचेच गणित आहे. तसे झाले तर काय होईल?

भाजप आणि त्यांच्या एनडीएला २३० च्या आसपास जागा मिळाल्या तर वायएसआर काँग्रेस, तेलंगण राष्ट्र समिती, बिजू जनता दल, अण्णा द्रमुक यासारखे मित्रपक्ष मोदींशी सौदेबाजी करतील. महत्त्वाची खाती मागतील. कमी-जास्त देऊन मोदींना पुन्हा सत्तेत बसता येईल.

‘अंडर करंट’ चालला तर काँग्रेस आणि मोदीविरोधात असलेले पक्ष मिळून ३०० पेक्षा अधिक जागा जिंकून राजकीय भूकंप घडवतील. अशा परिस्थितीत राहुल गांधी दिल्लीच्या तख्तावर बसतील. बाहेर राहून सर्वांना चालतील अशा व्यक्तीला पंतप्रधान बनवतील अशी शक्यताही नाकारता येणार नाही. मोदींना रोखले याचेच काँग्रेस भविष्यात राजकीय भांडवल करील. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत ‘सिक्सर’ मारण्याचा काँग्रेसचा गेम आहे;

पण २०० च्या आत जागा घेऊन सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आला तर राष्ट्रपती भाजपला सर्वांत आधी सरकार बनवायला बोलावू शकतात. अशा वेळी मोदी जुगाड करून आघाडी सरकार बनवतील.

१२५ जागांवर एनडीए थांबली तर मोदींना ते अडचणीचे आहे. अशा स्थितीत लहानसहान प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या मागे धावतील; कारण तिथे त्यांना चांगली खाती मिळू शकतील.

ममता बॅनर्जी शर्यतीत असल्या तरी त्या इतक्या लवकर कोलकाता सोडणे शक्य नाही. पंतप्रधान म्हणून त्या दिल्लीला गेल्या तर बंगाल कोण सांभाळणार? हा प्रश्न आहे. त्यांचा भाचा लोकसभेला उभा आहे; पण तो अजून पूर्णपणे तयार झालेला नाही. त्यामुळे ममता ह्या मायावती यांना पुढे करू शकतात. चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिलेल्या मायावती यांची पंतप्रधान बनण्याची इच्छा आहे. ती त्यांनी बोलूनही दाखवली आहे. ‘दलित की बेटी’ ला पंतप्रधान बनवल्याचे श्रेय काँग्रेस स्वतःकडे घेऊ पाहील. राहुल गांधी यांनी जोमाने यावेळचा प्रचार केला असला तरी ताबडतोबीने पंतप्रधान होण्याची घाई त्यांना नाही. त्यांचे सहकारी तसे सांगतात. सोनिया गांधी उद्या-परवा मैदानात येण्याचे संकेत मिळाले आहेत. तसे झाले तर सत्तेच्या राजकारणाला नवी वेगळीच धार येईल. सोनिया गांधी यांचा शब्द सहसा कुणी मोडण्याची शक्यता नसल्याने त्या ‘अब की बार’ला कोणते वळण देतात याकडे देशाचे लक्ष राहील. अर्थात हा सारा ‘जर-तर’चा खेळ आहे. मोदींनी ३०० जागांचा दावा करून सर्वांचा रक्तदाब वाढवला आहे.