मोदींना गरज लागली तरच दिल्लीत ‘वाघां’ची डरकाळी

Badgeलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला किती जागा मिळतात त्यावर भाजप-शिवसेना युतीची देशातली आणि महाराष्ट्रातली दिशा ठरणार आहे. सध्या राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचे २३ उमेदवार लोकसभेत लढत आहेत.

निकालानंतर मोदींना गरज लागली तरच शिवसेनेचे महत्त्व वाढू शकते. त्यामुळे शिवसेनेचे किती उमेदवार निवडून येतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूक भाजप-शिवसेना यांनी युतीत लढवली होती. सेनेला चांगल्या जागा मिळाल्या तरच देशाच्या मंत्रिमंडळात त्यांना चांगली खाती मागता येतील.

ही बातमी पण वाचा :- मोदी कमी पडले तर मायावतींचे जमू शकते भजन 

युतीला राज्यात एकूण ४८ जागांपैकी ४० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा भाजप नेते करीत असले तरी सारे तेवढे आलबेल नाही. कोणी कोणाचा घात केला ते निकालानंतर स्पष्ट होईल. निवडणुकीनंतर औरंगाबादचे शिवसेनेचे उमेदवार खैरे आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातला वाद उफाळून आला होता. दानवे यांनी युतीधर्म पाळला नाही, असा उघड आरोप करून खैरे यांनी खळबळ उडवून दिली होती.

२३ तारखेला खैरे पडले तर हा वाद चिघळणार आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा फार फायदा झाला नाही तर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोदी आपल्या ‘लहान भावा’ला कसे वागवतील याचे आतापासूनच शिवसेनेला टेन्शन आले आहे. विधानसभा निवडणुकीत जागा आणि सत्तेचे समसमान वाटप करण्याचा युतीत आधीच तोंडी करार झाला आहे. लोकसभा निकालानंतर काय परिस्थिती निर्माण होते आणि भाजप म्हणजे मोदी किती शब्द पाळतात याची शिवसेनेला आताच चिंता लागली आहे.