लोकसभा २०१९ : नंदुरबार मध्ये पुन्हा एकदा कमळ, धुळ्यात मात्र भाजपला टेन्शन

loksabha 2019 - nandurbar-dhule

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये यावेळी पुन्हा एकदा कमळ फुलण्याची चिन्ह आहेत. भाजपच्या उच्चशिक्षित खासदार डॉ. हिना गावित लोक दुसऱ्यांदा लोकसभा गाठतील अशी सध्याची राजकीय स्थिती आहे.भाजपचे जुनेजाणते नेते डॉ.सुहास नटावदकर यांनी बंडखोरी केली असली तरी त्यांना आठ ते दहा हजारांवर मते मिळणार नाहीत, असे जाणकारांचे मत आहे. डॉ. गावित यांच्या उमेदवारीमुळे नाराज असलेला भाजपचा अतिशय कमी प्रमाणातील मतदार नटावदकर यांच्याकडे वळेल पण ती संख्या फारशी नसेल. नटावदकर मैदानात नसते तर ती मते काँग्रेसचे के.सी. पाडवी यांना मिळाली असती.

पाडवी हे धडगाव अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात त्यांना आघाडी मिळेल. परंतु नंदुरबार,शहादा आणि शिरपूर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये हिना गावित चांगली आघाडी घेतील. नवापूरमध्ये काँग्रेसला ॲडव्हांटेज असेल असे मानले जाते. डॉक्टर हिना यांचे वडील विजयकुमार गावित माजी मंत्री असून जिल्ह्यातील बडे प्रस्थ आहेत. विजयकुमार यांचे बंधू माजी आमदार शरद गावित हे पुतणीच्या प्रचारात उतरले आहेत. दुसरे बंधू राजेंद्र गावीत हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. ते पाडवी यांच्यासोबत दिसत असले तरी जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादी ही हिना यांच्या प्रचारासाठी राबत असल्याचे दिसते. पंधरा दिवसांपूर्वी पाडवी यांचे पारडे जड असल्याचे दिसत होते मात्र  भाजप बंडखोर डॉ. सुहास नटावदकर फारशी मते घेणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर आणि हिना गावित यांच्यासाठी संघ परिवार मैदानात उतरल्यानंतर हिना यांचे पारडे जड झाले. नंदुरबार शहरावर वर्चस्व असलेले काँग्रेसचे दबंग नेते चंद्रकांतभैया रघुवंशी आजारी असल्यामुळे चेन्नईमध्ये भरती आहेत. त्यांच्या  अनुपस्थितीचा मोठा फटका काँग्रेसचे पाडवी यांना बसत आहे.तरीही येत्या तीन दिवसात चंद्रकांतभैयांची यांची एक मोठी जाहीर सभा नंदुरबारमध्ये आयोजित करून त्यांनी पाडवी यांच्यासाठी भावनिक आवाहन करावे असे प्रयत्न होणार आहेत. जिल्ह्यातील काँग्रेस के. सी. पाडवी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे दिसत आहे.त्यांची प्रतिमा चांगली आहे.

ही बातमी पण वाचा : लोकसभा २०१९ : कोल्हापूरचा मुन्ना की संजय यात बंटीच महत्त्वाचा, हातकणंगलेत राजू शेट्टींची हवा

तथापि हिना गावित यांनी पाच वर्षात केलेली विकास कामे, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा पाठपुरावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबारमध्ये झालेली विशाल सभा, संघ परिवाराने त्यांच्या पाठीशी उभी केली ताकद, बंडखोर नटावदकर फारच कमी मते घेतील, विजयकुमार गावित,  यांची मतदारसंघातील ताकद, नवमतदारांचा संभाव्य कौल  या पार्श्वभूमीवर हिना यांनी  आघाडी घेतल्याचे दिसते.

केंद्रीय गृहराज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे -भाजप विरुद्ध आमदार कुणाल पाटील – काँग्रेस यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत धुळे मतदारसंघात  होत आहे. गेल्या वेळी आरामात जिंकलेले भामरे  यांची यावेळी प्रचंड दमछाक होत आहे. कारण कुणाल स्वतः धुळे ग्रामीणचे आमदार आहेत. तसेच मालेगावमधून त्यांना प्रचंड मताधिक्य मिळेल असे चित्र आहे. या दोन मतदारसंघांमध्ये त्यांना मिळालेली आघाडी उर्वरित चार ठिकाणी भामरे कितपत मोडून काढतील हा प्रश्न आहे. गेल्यावेळी मोदी लाट असतानाही तेव्हाचे काँग्रेस उमेदवार अमरीश भाई पटेल यांना मालेगावमध्ये 1 लाख 30 हजार तर भामरे यांना केवळ पाच हजार मते मिळाली होती. मात्र अन्य पाचही विधानसभा मतदारसंघात भामरे यांनी आघाडी घेतली होती.यावेळी  मालेगाव आणि धुळे ग्रामीणमधील पिछाडी अन्य विधानसभा मतदारसंघांमधून भामरे भरू शकतील का या शंकेने भाजपला चिंतेत टाकले आहे. त्यातच धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी बंडखोरी केली आहे काही महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी स्वतःचे उमेदवार उभे केले होते व त्या उमेदवारांना 60 हजार मते मिळाली होती. गोटे यांनी लोकसभेला तेवढीच मते घेतली तर भामरे अधिकच अडचणीत येतील. अशावेळी मालेगाव ग्रामीणमधून शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे आणि शिंदखेडामधून कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल हे भामरे यांना किती मताधिक्य मिळवून देतात यावर बरेच काही अवलंबून असेल.

ही बातमी पण वाचा : लोकसभा २०१९ : पुण्यात बापट तर बारामतीत सुप्रिया आघाडीवर

कुणाल पाटील यांच्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकवटले आहेत. तसेच कुणाल यांचे वडील माजी मंत्री रोहिदास दाजी पाटील यांचा मराठा समाजात दबदबा असून ही बाब कुणाल यांच्या पथ्यावर पडली आहे. मालेगावमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक नबी अहमद हे ओवेसी आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असल्याने कुणाल पाटील यांना थोडा त्रास होईल. मात्र मालेगावमध्ये त्यांनाच मोठी आघाडी मिळेल असे चित्र आहे.मालेगाव व धुळे ग्रामीणने दिलेले टेन्शन आणि गोटे यांची बंडखोरी यामुळे भामरे अडचणीत दिसतात.