लोकसभा निवडणूक २०१९ : बंगालमध्ये अखेरच्या टप्प्यातही हिंसाचार

Car-Fire

कोलकाता : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशीही पश्चिम बंगालमध्ये मतदान सुरू होण्याआधीच हिंसाचार सुरू झाला. भाटापाडा मतदारसंघात आज रविवारी मतदान सुरू होण्याआधीच काही मोटारी पेटवून देण्यात आल्या. गोळीबार आणि बॅाम्बही झाले.

भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी बंगाल पोलिसांसह तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हिंसाचार घडवल्याचा आरोप केला आहे . तर टीएमसीने यासाठी बैरकपूरचे भाजपचे उमेदवार अर्जुनसिंह व भाजपवर आरोप केले आहेत.

बारासात लोकसभा मतदारसंघातील कदम्पुकुर भागातही हिंसाचार झाला. टीएमसीचे उमेदवार सुभाष बोस यांना ताब्यात घेण्यात आले आणि भाजपचे नेते अनुपम दत्ता यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

बंगालमध्ये पहिल्या टप्प्यापासून ते शेवटच्या टप्प्यातील मतदानापर्यंत टीएमसी व भाजप कार्यकर्त्यांमध्ये चकमकी सुरू आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बंगालमध्ये नऊ  जागांसाठी आज मतदान होते आहे. यात कोलकाता उत्तर, कोलकाता दक्षिण, दमदम, बारासात, बशीरहाट, जादवपूर, डायमंड हार्बर, जयनगर (एससी) आणि मथुरापूर (एससी) लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मतदानाच्या दरम्यान राज्यात सुरू असलेला हिंसाचार लक्षात घेता कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.

ही बातमी पण वाचा : अंतिम टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पंतप्रधान मोदींचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार