लोहा-कंधार विधानसभा: शेकापचे शिंदे यांच्या प्रचाराने घेतला वेग

विकासाची पाच कलमी कार्यक्रम घेवून शिंदे मतदारांसमोर

नांदेड प्रतिनिधी :- कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघातील शेकापचे उमेदवार श्यामसुंदर शिंदे यांनी शनिवारी प्रचाराला धुमधडाक्यात प्रारंभ केल्यानंतर रविवारी गावोगावी जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर दिला. अनेक गावांत कॉर्नर बैठका घेतल्या. मतदारसंघातील ग्रामस्थांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी ग्रामस्थांशी सुसंवाद साधताना दिली.

ही बातमी पण वाचा : रस्ते, सिंचन, रोजगार, त्रिसुत्रीने विकास साधणार -शेकापचे उमेदवार श्यामसुंदर शिंदे

रविवारी सकाळी कॉर्नर बैठका घेवून टेळकी, पांगरा, पांगरा तांडा, मोकलेवाडी, भोपाळवाडी गावातील समस्या जाणून घेतल्या. ग्रामस्थांशी हितगुज करताना अंतर्गत रस्ते, वीज, पाणी आदी विषयावर विचार व्यक्त केले. प्रत्येक गावात दर्जेदार शिक्षण,मुबलक शुद्ध पाणी, रोजगार, डिजीटल शाळा, दळणवळणाची साधणे, शेतकर्यांच्या पिकांना हमी भाव, मुख्य रस्त्यावरील गावांतील शेतकर्यांसाठी भाजीपाला मार्केट उपलब्ध करून देणे, कलंबर कारखाना पुनरुज्जीवित करणे, शेती सिंचनाखाली आणणे, बेरोजगारांसाठी उद्योग व्यवसाय उभारणे आदी महत्त्वाच्या मुद्यावर शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

विकासाचा पाच कलमी कार्यक्रम घेऊन मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. समाजातील सर्व घटकांचा विकास, प्रत्येक गावात विकासाची गंगा हेच माझे ध्येय आहे, असेही शिंदे म्हणाले