“आधी लगीन Ph.D. चे !”

marriage

हाय फ्रेंड्स ! सध्या मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून 21 वरून नेण्यासंबंधी चर्चा सुरू आहे. त्यामागील उद्देश चांगलेच आहेत .पण त्याचवेळी दुसरीकडे मुलींच्या लग्नाची जास्त वाढणारी वय ही पण एक मोठी सामाजिक समस्या बनते आहे. 22– 23 वर्षाची लेक असणाऱ्या मैत्रिणीला परवा म्हटलं की ,”आलीच की ग तुझी लेक लग्नाला !” त्यावर ती म्हणाली , “नाही अगं ! आहेत अजून दोन-चार वर्षे तरी. सध्या पी जी करते आहे .म्हणतेय पुढे पीएचडी करायचे म्हणून. सध्यातरी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ची तयारी करते .जरा पायावर उभे राहू दे. आजकाल पायावर उभी हवीच न ग !”

तर आजकालचे मुलांचे आई-वडील अतिशय त्रस्त असतात. चांगल्या मुलीच येत नाहीत सांगून! आल्या तर त्यांच्या अपेक्षा खूप काहीच्याकाही असतात. तशी पण मुलींची संख्या कमी झाली आहे ना! अशी मुलाच्या आईवडिलांची धारणा आहे सध्याला !

मुलींच्या पालकांचे बरोबरच आहे अगदी ! स्त्रीची स्वतःची ओळख असणे, ती पायावर उभी असणे हे तिच्या स्वअादरासाठी , स्वावलंबी आणि कर्तबगार होण्यासाठी, अडचणींना खंबीरपणे तोंड देण्यासाठी आणि आजच्या महागड्या काळात दोघांनी मिळून संसार सांभाळणे गरजेचे आहे म्हणूनही ,स्त्रीचे शिक्षण आणि स्वावलंबीत्व आवश्यक आहे. यात शंकाच नाही.

पण त्यातच समोर जाऊन जर लग्न करायचेच असेल, तर काहीतरी डेडलाइन मात्र हवी ना! उलट चांगली नोकरी मिळून एक-दोन वर्ष झालेल्या, पंचवीस सव्वीस वर्षांच्या मुला मुलींनी लग्न केली, तर त्याला आजकाल” बालविवाह “म्हणतात लोक ! परंतु कुठेतरी लग्नाचे योग्य वय हे आपल्यासाठी ,आपणच ठरवायला पाहिजे मुला-मुलींनी. आज मुली हुशारीवर यशाची शिखरे गाठतात .शिक्षण पुढे चालू राहतं मॅच्युरिटी येते .पण त्या बरोबरच वयही वाढत राहतात .आपोआपच त्यांची काही स्वतःची मत ठाम आणि जोडीदाराबदलच्या अपेक्षा तयार होत जातात .खूप चिकित्सा केली जाते .आत्मविश्वास वाढलेला असल्याने कुठेही तडजोडीची तयारी नसते .बरेचदा तर स्वतःबद्दल निरीक्षण न करता समोरच्याकडून अपेक्षा फक्त वाढत जातात.

आपोआपच स्वतःपेक्षा जास्त शिक्षित जोडीदार लागतो. स्वतःपेक्षा जास्त कमावता, मोठ्या पदावरचा असावा लागतो. स्वतःचे घर ,फोर व्हीलर असावी अशी ही त्यांची अपेक्षा असते .मात्र मत पक्की झाल्यामुळे तडजोडीची सवय नसते .त्यामुळे कुठलीच जबाबदारी नसणारा हवा .अशी त्यांची इच्छा असते .पुन्हा घरात “डस्टबिन”( पालक ,आजी आजोबा) नकोत अशीही संकल्पना रूढ झालेली आहे.

लठ्ठ पगाराच्या मुलींबाबत ही कथा असली ,तरी साधारण ग्रज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट मुलींना पण मोठ्या पगाराचा नवरा लागतो .कारण शहरात घराच्या किमती ,रेंट ,एकूण खर्च किती जास्त असतो याची त्यांना चांगली कल्पना असते. असे म्हणत वय वाढत जाते .एका घरात दोघी चौघी बहिणी असतील, तर एकीचे लग्न झाले नाही तर दुसरीचे आटपून टाकायला बऱ्याच जणांचा विरोध असतो. कारण मोठीचे का झाले नाही ?

याची लोक चौकशी करतात अशी भीती त्यांना असते. आणि मग वारंवार मिळणाऱ्या पदोन्नती ,त्यामुळे वाढणारी धडपड, यात लग्नाची वय उलटून गेल्याने मुली थोराड होतात. चेहऱ्यावरची कोमलता ,नाजूकपणा जाऊन त्या निबर दिसू लागतात. एकीसाठी इतर बहिणींची पण लग्न राहतात. या शिक्षित मुलींच्या पालकांच्या ही अपेक्षा खूप जास्त असतात. योग्य अशी स्थळं येत नाहीत अशी त्यांची तक्रार दिसून येते. अशावेळी “योग्य” याचा त्यांनी पूर्ण विचार करायला हवा असतो.

हळूहळू मग अपेक्षा कमी होत जातात. वय वाढत जातं आणि मग कधी कुणाशीही गाठ बांधून घ्यायला तयार होतात. परत एवढी मोठी दरी बौद्धिक दृष्ट्या पडल्याने संसार नावालाच होत असतील. अशावेळी मुली भलेही कमी शिकलेला किंवा कमी पगाराचा जोडीदार स्वीकारतील. तरी कोणत्याही पुरुष जोडीदाराला जन्मजात इगो हा असणारच! त्यांची अपेक्षा असतेच की, पत्नीने माझ्या शब्दाबाहेर जाऊ नये .मला विचारून गोष्टी कराव्या .वगैरे ,वगैरे ,आणि मुळात अशा उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ मुलींशी लग्न करताना ,सर्वसामान्य मुलेही “नाकापेक्षा मोती जड नको “असाच विचार करतात. फारच कमी व्यक्ती ,अशा कर्तबगार स्त्रीच्या मागे उभे राहणाऱ्या ,दोन पावले मागे घेऊ शकणाऱ्या असतात .नाहीतर सर्वसाधारण पुरुष प्रधान संस्कृती मध्ये असाच विचार केला जातो.

मुळात मुलांनाही त्यांच्या पेक्षा जास्त पगाराची ,मोठ्या पदावरची, कुठल्याच बाबतीत वरचढ ,मुलगी चालणार नसते. त्यांच्या अपेक्षा पूर्वीपासून ज्या चालत आल्यात, त्याच टिपिकल अस तात. मुलगी गोरी, सुंदर, मनमिळावू ,सुशिक्षित ,सडपातळ हवी.

अशी अनेक कुटुंबे आजकाल दृष्टीस पडतात. भरपूर शिकलेल्या घरात दोघी तिघी मुली आहेत ,पण एकीचेही लग्न झालेलं नाही. अगदी एखादी त्यातून शहाणपणाने पटकन प्रेम विवाह करून आपला मार्ग मोकळा करून घेते.

यात बराचसा भाग घरातील ज्येष्ठ वयाच्या लोकांचाही दिसतो. आधी पत्रिका फार बारकाईने बघितले जाते ,चिकित्सा केली जाते, चांगली स्थळ अशाच हातातून निसटून जातात .आणि मग हळू हळू त्यातून धरसोड केली जाते. यामुळे समाजात भरपूर वयाने मोठ्या असलेल्या अविवाहित मुली दिसतात. ही पण एक सामाजिक समस्या बनू लागलेली आहे. बऱ्याच जणींचा कुटुंब व्यवस्थेवरचा विश्वास उडालेला आहे, त्यामुळे लिव इन ची प्रथा पडते आहे. एकूणच प्रॉपर दिशेअभावी भरकटत जाणाऱ्या पतंगासारखे ही अवस्था वाटते.

अशा सगळ्या गोष्टींनी वय पुढे पुढे जात राहतो, अन लग्नाचं वय मागे पडतं. पुन्हा परिणाम एवढ्यावरच थांबत नाही .प्रत्येक गोष्टीला आड येतच हे वय ! कारण आधीच उशिरा लग्न झालेल्या मुली, मुलांचा विचार लगेच करीत नाही. एकमेकांच्या स्वभावाची पुरती ओळख ,करियर मध्ये सेटल होणे ,आर्थिक दृष्ट्या पुरेसे समर्थ (अजून काय समर्थ व्हायचे असते ?)झाल्याशिवाय मुलांचा विचार करत नाही. असे करता करता तिशी येते किंवा तिशी ओलांडली जाते. वय वाढत गेल्यावर बाळंतपण कठीण होत जातं. मग जास्तीत जास्त एका बाळावर थांबावे लागते .किंवा करिअरची स्वप्न पाहताना ऑफिसचा स्ट्रेस, धावपळ यातून प्रेग्नेंसी राहण्यातही अडचणी निर्माण होतात, क्वचित प्रसंगी मग “फक्त दोघंच” राहण्याचा निर्णय घेतला जातो. किती निसर्गाशी खेळ करणार आपण ? बुद्धीच्या ,कर्तुत्वाच्या जोरावर” निसर्ग माझ्या मुठीत “असं वाटत असलं ,तरी त्याचे परिणाम भोगावे लागतातच.

सुशिक्षित ,बुद्धिमान ,तरुण– तरुणींकडून निर्माण होणारी, निकोप ,आरोग्यपूर्ण, बुद्धिमान नवीन पिढी खरतर तयार व्हायला पाहिजे. यासाठी तरुणींनी विचार करायला हवा .विवाह आणि मुलं ही दोन्ही एका योग्य वयात व्हायलाच हवीत. ते शास्त्रीय आरोग्यपूर्ण आणि समाजासाठी योग्य असतं, यात शंकाच नाही.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER