जिल्ह्यात सोमवारपासून आठवडाभर लॉकडाऊन

Daulat Desai

कोल्हापूर :- गेल्या काही दिवसांत शहर व जिल्ह्यात कोरोनाचा (Corona) समुह संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्‍वभुमीवर जिल्ह्यात सोमवारपासून आठवडाभर लॉकडाऊन करण्याचा निर्णय आज जिल्हाधिकारी दौलत देसाई (Daulat Desai) यांनी जाहीर केला. यासंदर्भातील मार्गदर्शक सुचना, नियम व अटी उद्या (ता. 18) जाहीर करण्यात येणार आहेत. या काळात दूध, औषधे वगळता कोणतेही व्यवसाय सुरू रहाणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 400 हून अधिक रूग्ण सापडले आहेत. आज एका दिवसांत तब्बल 206 रूग्ण सापडले आहेत. दोन दिवसांपुर्वीही एवढ्याच रूग्णांची भर पडली असून कोरोनामुळे मृत्युचे प्रमाणही वाढले आहे. आज कोरोनामुळे एकही मृत्यु नसला तरी गेल्या तीन दिवसांत तब्बल बारा जणांचा कोरानामुळे बळी गेला आहे. या पार्श्‍वभुमीवर कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) होणार का नाही याविषयी उत्सुकता होती.

आज पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी संवाद साधला. यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने आदि सहभागी झाले होते. या बैठकीतही बहुंताशी लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊन करण्याच्या सुचना दिल्या तर काही लोकप्रतिनिधींनी पूर्ण लॉकडाऊन न करता यासंदर्भातील नियम व अटी अधिक कडक करण्याच्या सुचना दिल्या. लॉकडाऊनबाबत मत मत्तांतरे असल्याने याचा निर्णय सकाळच्या बैठकीत न होता पालकमंत्री पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना हे अधिकार देण्याचे ठरले. त्यानुसार सायंकाळी श्री. देसाई यांनी आठवडाभर लॉकडाऊन करण्यात येणआर असल्याचे जाहीर केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER