उच्च न्यायालयाच्या तंबीनंतर बिहारमध्ये १५ मेपर्यंत लॉकडाऊन

Nitish Kumar

पाटणा :- बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची साथ वाढत असल्याबद्दल पाटणा उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर बिहार सरकारने १५ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणी केली. सोमवारी न्यायालयाने लॉकडाऊन संदर्भात राज्य सरकारला विचारणा केली होती. मुख्यमंत्री नीतीश कुमार (Nitish Kumar) यांनी ट्विट करत लॉकडाऊनच्या संदर्भात माहिती दिली. “सहकारी मंत्री व अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर १५ मे २०२१ पर्यंत बिहारमध्ये लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लॉकडाऊनबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना व इतर कामांच्या संदर्भात आज आपत्कालीन व्यवस्थापन गटाला सूचना करण्यात आल्या आहेत.” असे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. कोरोना रुग्णांवर होणाऱ्या उपचारांच्या स्थितीबाबत सोमवारी पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेसंबंधी उच्च न्यायालयाने बिहार सरकारला लॉकडाऊन संदर्भात प्रश्न विचारला होता. उच्च न्यायालयाने राज्याच्या महाधिवक्त्यांना राज्य सरकारशी बोलण्यास सांगितले होते.

४ मेपर्यंत लॉकडाऊनाबाबत कोणताही निर्णय न घेतल्यास उच्च न्यायालय कठोर निर्णय घेऊ शकते, असेही न्यायालयाने बजावले होते. न्यायालयाने राज्य सरकारवर टीका केली होती. बिहारमध्ये कोरोनाचे व्यवस्थापन करण्यासाठी ‘वॉररूम’ नसल्याचेही न्यायालयाने म्हटले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कोरोना रुग्णांच्या उपचाराच्या सुविधांमध्ये वाढ झालेली नाही, अशी टीका न्यायालयाने केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button