…तर नागपूर, पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय – राजेश टोपे

Rajwsh Tope-Maharashtra Lockdown

पुणे :- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक अशा शहरांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. जर रुग्णसंख्येत अशाप्रमाणेच वाढ होत राहिली तर काही शहरांत लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. ते आज पुण्यात बोलत होते. टोपे यांनी दिलेली ही माहिती रुग्णवाढ होत असलेल्या शहरांसाठी लॉकडाऊनचे संकेत मानले जात आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे चिंतेत वाढ झाली आहे. उद्या याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल.

मात्र लॉकडाऊन काही दिवसांनंतर केले जाईल. लगेच उद्या लॉडकडाऊनची घोषणा करणार नाही, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊन टाळायचं असेल तर जनतेनं दिलेल्या नियमांचे पालन करायला हवे. अजून दोन-चार दिवस कोरोना रुग्ण वाढण्याचा अंदाज आहे. त्यानंतर हे प्रमाण कमी होईल, असा अंदाज असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबई, पुणे, नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा वेळी केंद्रानं दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करून सर्व गोष्टी केल्या जात आहेत. पुण्यात रोज तीन लाख चाचण्या केल्या जात आहेत. मेट्रो सिटीमध्ये बेड पुरेसे उपलब्ध आहेत. संख्या ज्या गतीनं वाढत आहे, त्या दृष्टीनं अजून तयारी करावी लागेल.

जम्बो सेंटर पुन्हा एकदा सुरू करावे लागतील. जिथे डॉक्टर, नर्स यांच्या जागा रिक्त आहेत त्या भरण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. ग्रामीण भागातही लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्याची आवश्यकता आहे. सध्या आरोग्य केंद्रात लसीकरण केलं जात आहे. पण गावागावांतील आरोग्य उपकेंद्रातही लस उपलब्ध करण्याचा विचार सुरू आहे. तसंच ज्या खासगी रुग्णालयांमध्ये २० बेडची सुविधा आहे, अशा रुग्णालयांमध्येही लसीकरणाची परवानगी दिली जाणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत कुठलाही घोळ होत नाही. इतर राज्यांत  बहुदा आकडे लवपले जात असतील. कारण काही राज्यांत निवडणूक होत आहे. मोठ्या सभा होत आहेत. पण तिथली रुग्णसंख्या कमी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत मोठं राज्य आहे. महाराष्ट्रात साडेबारा कोटी लोक राहतात. त्यामुळे तुलना करायची झाल्यास रुग्णसंख्येत महाराष्ट्राच्या पुढेही काही राज्ये असल्याचा संशय टोपे यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER