लोकल टू ग्लोबल !

Diwali

हाय फ्रेंड्स ! दिवाळी आली म्हणता म्हणता उद्या दिवाळी चा शेवटचा दिवस ! पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आहे. तसेच लक्ष्मीपूजन आणि चतुर्दशी एकाच दिवशी असल्याने यावेळी चक्क दिवाळीनेही शॉर्ट कट मारला ! मी तुमच्याशी मागे शेअर केल्याप्रमाणे दिवाळीत मस्त आराम…. वगैरे काही करू शकले नाही. कारण सवयच बेटी वाईट ! ती सगळी धडपड केल्याशिवाय स्वस्थ बसू देईल तर ना ! आज भाकड दिवस असल्याने थोडी निवांत होते.

सकाळीच मला आठवण आली, लहानपणी आमच्या घरी धुणी धुणाऱ्या लक्ष्मीबाई पाडव्याला बाबांना ओवाळायला येत असत. त्या वेळी बहुतेक पूर्ण गाव ओवाळायची त्यांची पद्धत असे. गप्पा करताना माझे सासरे म्हणाले, पूर्वी नाभिक सकाळी नरकचतुर्दशीला तेल लावून द्यायला येत असत.

मागच्या वर्षी आमच्या शेजारच्या आजींनी आवा लुटला होता संक्रांतीला! आम्ही सगळ्या वाजत-गाजत कुंभाराकडे गेलो होतो आणि आव्याची पूजा केली होती . पूर्वी आईकडे ,काचेच्या बांगड्या बाजारात मिळत नसत .तर बांगड्या भरण्यासाठी कासारिण येत असे. पोळ्याच्या दिवशी आमच्या घरासमोरच्या घरी मानाचे बैल असायचे, मग त्यांच्याकडे वाजंत्रीवाले, डफडीवाले दिवसभर डफडे वाजवित. एकूणच अशा लहानपणीच्या गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात अनिमेषला प्रश्न पडला की, “मावशी तू म्हणत होती ते गुरव म्हणजे गुराखी का गं ?”

खरच या पिढीने काही बघितलंच नाही. बहुरूपी ,दान पावलं करता येणारे वासुदेव ,या सगळ्या गमती जमती. “लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला ! शेंबडी पोरं पाठी बांधा तुम्ही लग्नाला चला” आणि मग असलच काही तरी, कशाचीतरी आमटी ,कढी ते म्हणायचे .आणि आम्ही खूप हसायचो. खूप निर्भेळ आनंद होता तो ! याशिवाय गावांमध्ये कडकलक्ष्मी, डोंबाऱ्याचा खेळ, गारुडी हे बघायला मिळत आणि आपोआपच त्या संबंधीचे कितीतरी शब्दभांडार आमच्याकडे असायचे हसत खेळत! अशा गप्पा व फराळ झाला. दुपारची जेवणही झाली. तेव्हा मी प्रथम झेप घेतली ती दिवाळी अंकाकडे ! आज पहिला दिवाळी अंक हाती पडला होता. यावेळी खूप चॉईस नसल्याने जो अंक दिला तो मी घेतला, मीही कामाच्या गडबडीत होते. तसाही पुढच्या रविवार पर्यंत मला कुठे मिळणार होता वाचायला ?

आणि अहो आश्चर्यम ! आज बघितलं तर दिवाळी अंक होता “आपले छंद !”आणि मुखपृष्ठावर चक्क वासुदेव. क्या बात है ! अंकाचा विषय होता ,”बलुतेदारी कालची आणि आजची.”त्यावरचा विशेषांक. काय योगायोग आपणास सकाळी यावर गप्पा केल्या.

तसाही बाराबलुतेदार हा शब्द लहानपणापासूनच ऐकिवात आहे. त्यांच्या कौशल्यातून ते आपला व्यवसाय परंपरेने करतात हे कळलं होतं. म्हणजे अगदी शाळेत शिकवायचे ना? माठ कोण बनवतो – कुंभार, लोखंडाच्या वस्तू ? लोहार. मग पुढे ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी….., नाहीतर मग फिरत्या चाकावरती देसी…! या गाण्यातून पुन्हा हा लोहार कुंभार भेटत गेले. पुढे कधीतरी या जाती म्हणून ओळखल्या जातात हे कळले. मात्र प्रत्येकच संत गोरा कुंभार, कुणबी समाजाचे तुकोबाराया, संत नामदेव शिंपी समाजाचे, तर सावता माळी कांदा-मुळा-भाजी घेऊन त्याचबरोबर आपापले थोर विचार साध्या-सरळ शब्दात घेऊन भेटत राहिले. आणि त्यांच्यातील प्रामाणिक निखळ भक्तीने ते मनाला स्पर्शूनही गेलेत . प्रत्येकालाच फार कष्टातून दिवस काढत असताना संकटांना तोंड द्यावे लागले. परंतु श्रद्धा व भक्ती हीच त्यांची ताकद होती . त्यामुळे हा संत परिवार कायमच आदर स्थान म्हणून डोळ्यासमोर राहिला आहे आणि राहतो.

ह्यामुळे बाल बारा बलुतेदारी म्हणजे नेमके काय ? कसे? याविषयी खूप उत्सुकता वाटली ,आणि मी अधाशा सारखे वाचन सुरू केले. त्यातील पहिलाच लेख डॉक्टर प्रल्हाद लुलेकरांचा . त्यातून खूप सुंदर, महत्वाची आणि अगदी बेसिक माहिती जी मला हवी होती ती कळत गेली.

सारेच बलुतेदार त्यांच्या व्यावसायिक कारागिरीवर, विशिष्ट कामांच्या कौशल्यावर जगत असतात. ते जमिनीचे मालक नसतात आणि त्यांना शेती संबंधी माहिती नसल्याने त्यांना ग्रामीण भागात” अडाणी “म्हणून संबोधले जाते .हा शब्द ऐकला होता पण नेमका अर्थ मला आज कळला.

पूर्वी शेती हाच एक व्यवसाय होता .शेतीच्या विकासाबरोबरच निर्माण झालेल्या ग्रामरचना, खेडी आणि त्यांच्या मूलभूत गरजेतून ग्रामव्यवस्था आकाराला आली. या व्यवस्थेतून ,आणि विविध लोकांच्या प्रतिभा निर्मितीतून ग्राम संस्कृती निर्माण झाली. यात बलुतेदार, अलुतेदार यांचे अमूल्य योगदान आहे. मग शेतीच्या लागवडीसाठी, मशागतीसाठी, शेतीपूरक अवजारांची निर्मिती बलुतेदार आलुतेदारांनी केली. त्यातून गाव गाडा तयार झाला. त्यांना कामाचा मोबदला धान्य स्वरूप मिळत असे. ज्यामुळे नित्य गावगाड्यात काम पडते त्याला बलुतेदारी तर ज्यांची गरज नसते मात्र जगण्यासाठी त्यांचे काम नायमित्तिक रित्या गरजेचे असते ते अलुतेदार. बलुतेदार १२ तर अलुतेदार १८ असत.

जात व व्यवसाय यात बंदिस्त झाल्याने बलुतेदार गुलाम झाला. गावावर सत्ता गाजवणार्यांशि संघर्ष केला तर गाव सोडावे लागे. विस्थापित झाल्यावर निर्माण होणारे इतर प्रश्न आणि उपरेपणाची भावना निर्माण होऊ लागली. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरही प्रभुत्व गाजवणारयांना सेवा देणे, व आपल्या श्रेष्ठत्वाच्या अहंकारात अडकत जाणे हेच त्याचे आयुष्य बनले. आणि आता तर शेती व्यवसाय ही बाजूला पडतो आहे. नवीन तंत्रज्ञानाचा चा उदय आणि प्रगती ही आणखीन एक अडचण म्हणूनही त्यांच्यापुढे उभी आहे. मुळात सामाजिक अस्तित्व नाही, आर्थिक दयनीय, शैक्षणिक मागासलेपण आणि अनेक जातीय स्तरावर विभाजन झाल्याने एकेका बलुतेदारांची संघटन अपुरे पडते आहे.

इतक्या चांगल्या कला लयाला जाऊन आपण कित्येक कलाकारांना मुकतो याची जाणीव झाल्याने वाईट वाटते. पण कुठेतरी असंही वाटतं की कोणत्याही क्षेत्रात बदलत्या प्रवाहाबरोबर बदलत जाणे खूप महत्त्वाचे आहे. बलुतेदारांच्या कलात्मक दृष्टीने आमचे संस्कृतीक भावजीवन समृद्ध केले आहे. त्यांचे कौशल्य काळाबरोबर संवर्धित झालेलेही बऱ्याच ठिकाणी दिसते .जसे की सुतारकाम, लोहारकाम ,कुंभार काम, नाभिक ,सोनार काम यांनी आजतागायत आपल्या कौशल्याना विकसित करून आपले व्यवसाय वाढवले आहेत.

त्यांची ही गावागावांमधून असणारी कला जागतिक स्तरावर जाण्याइतकी वैभव संपन्न नक्की आहे, आणि ते आवश्यकही आहे .त्यामुळेच आपण खरेतर “लोकल टू ग्लोबल “साध्य करू शकू.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER