स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला लागा! : नाना पटोले

Nana Patole
  • नाशिक शहर जिल्हा व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न

मुंबई : राज्यात काँग्रेस (Congress) पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्याची गरज असून सर्वांनी एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून देऊन कामाला लागावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे.

गांधी भवन येथे आज नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील,  चंद्रकांत हांडोरे, आ. प्रणिती शिंदे, आ. हिरामन खोसकर, माजी मंत्री शोभा बच्छाव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव वामसीचंद रेड्डी, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, मोहन जोशी, शरद अहेर, भाई नगराळे, चारुलता टोकस, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे, प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील, देवानंद पवार आदी उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन काम करणारा पक्ष आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) काँग्रेस महत्वाचा घटक पक्ष आहे. कठीण परिस्थिती असतानाही सरकारने एका वर्षात जनतेसाठीचे कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीनंतरची मदत यासह कोरोना काळातही उत्तम काम केले आहे. सरकारची ही कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले पाहिजे. तसेच केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून महागाई प्रचंड वाढली आहे. लोकांचे जगणे कठीण झाले आहे. सर्व सरकारी कंपन्या विकल्या जात आहेत. भाजपा (BJP) सरकारच्या या लोकविरोधी कारभाराला लोक कंटाळले आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावा-गावात जाऊन पक्षाची भूमिका व सरकार करत असलेले काम पोहोचवावे काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात नंबर एकचा पक्ष बनेल, असा विश्वास प्रदेशाध्यांनी बोलून दाखवला.

यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा विचार हाच शाश्वत विचार असून तोच देशाला तारणारा आहे. काँग्रेस हा संविधानाला व लोकशाहीला माननारा पक्ष असून समाजातील सर्वांना ताकद देणारा पक्ष आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार लोकांच्या हिताचे निर्णय घेत असून लोकांपर्यंत सरकारचे काम पोहोचवा. विधान परिषदेच्या निवडणुका तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली असून अशीच कामगिरी आगामी निवडणुकांमध्ये करण्यासाठी सज्ज रहा, असे थोरात म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER