ओझे घेऊन जगताना

ओझे घेऊन जगताना

हाय फ्रेंड्स ! कालच आपल्या लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्याला विस्मरण ही खरंतर मिळालेली एक मोठी देणगीच आहे. तसाही विचार केलात तर आपल्या घरी एखादा कार्यक्रम असतो ,आपल्या मागे अनेक कामे असतात किंवा ऑफिसमध्ये काही दिवस आत्यंतिक हेक्टीक असतात, अशावेळी काही सुचत नाही, वस्तू कुठे ठेवली तरी आठवत नाही . विचारांचा अतिरेक त्याला जबाबदार असतो. म्हणूनच तसं बघितलं तर अनावश्यक गोष्टी आपण विसरू शकतो हेच किती महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण चांगल्या कामावर कॉन्सन्ट्रेशन करू शकतो.

अर्थात वयानुरुप जे विस्मरण होते ते वेगळे. ते याठिकाणी अपेक्षित नाही. फ्रीजचा दरवाजा उघडल्यावर तो का उघडला हेच बरेचदा आठवत नाही किंवा बरेचवेळा हातातला मोबाईल कपाट उघडल्यावर कपाटात नकळत टाकल्या जातो आणि नंतर आपण त्याचा शोध घेत बसतो ती गोष्ट वेगळी !

पण बरेचदा आपण नकळत अनावश्यक गोष्टींचे ओझे घेऊन जगत असतो. काही गोष्टींचा विचार करताना ,यांना माझ्या आयुष्यात महत्त्व किती ? याचा विचारच न करता निरुपयोगी गोष्टींना अवास्तव महत्त्व देऊन त्यांच्या विचारांनी मनाला व्यापून टाकतो .मग त्या वेळीच आवश्यक असलेल्या कर्तव्य किंवा जबाबदाऱ्यांची ओझी बाजूलाच पडतात, आणि त्यांचा विसर पडत जातो. मात्र निरुपयोगी गोष्टी गरज नसताना सतत आठवत राहून आपण आपल्या मनाचा समतोलच मुळी बिघडवून टाकतो.

ऊदा. कोणीही आपल्याबद्दल काही उणेदुणे बोलले तर ते मनाला खूप जास्त लावून घेणे! ते किती लावून घ्यायचे हे आपणच आपले ठरवायचे असते .कुणी म्हणेल ,”गेंड्याची कातडी लागते त्याला.” पण असं मुळीच नाही. याला फक्त शहाणपणा लागतो ,सारासार विवेक लागतो ,स्वतःविषयी विश्वास लागतो .मी जे करतो किंवा करते ते योग्यच आहे याची खात्री करून घेतली तर समोरचाच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं तेच मुळे आपण ठरवायच असतं .तेव्हाच आपण ती गोष्ट विस्मरणात टाकू शकतो .समोरच्यावर आपण कंट्रोल तर नाही करू शकत .परंतु आपण हे स्वतःच्या भावनांचे ,कृतीचे ,विचारांचे सगळे कंट्रोल समोरच्याला देतो . प्रॉब्लेम तिथे येतो. समोरच्याचे शब्द, कृती, भावना अभिव्यक्ती, विचारांचे ओझे घेऊन जगताना आपोआपच आपल्या रोजच्या जगण्यातले सुंदर क्षण मात्र गमावून बसतो.

म्हणूनच काल म्हटल्याप्रमाणे विस्मरण ही एक देणगी आहेच. मनुष्य हा एक ‘ जजमेंटल ‘ प्राणी आहे. समोरच्याच्या स्वभावाचा अंदाज बांधणे ,मूल्यमापन करणे या गोष्टी तो करतो. त्यामुळे काहींचे बोलणे, वागणे, त्याला आवडत नाही .खटकत राहते .त्या व्यक्तींबरोबर राहणं ,त्यांचे आजूबाजूला असणेही त्याला आवडत नाही, खटकत राहते. जेव्हा ती व्यक्ती समोर येते त्यावेळी मागच्या अनुभवांवरून त्या व्यक्तीबद्दल एक विशिष्ट रंगाचा चष्मा त्याने घातलेला असतो. पण खरंतर एखादी व्यक्ती ,एखाद्या वेळी असं का वागली ? याचं कारण फक्त तीच व्यक्ती देऊ शकते ! त्याची त्यामागे अनेक कारणे असू शकतात .ती व्यक्ती मनाने काही कारणाने त्यावेळी दुखावलेली असू शकेल. तिच्याबाबत एखादी अप्रिय घटना घडलेली असू शकते. ती चांगल्या मनस्थितीत नसेल .अशा अनेक कारणांनी त्यामुळे ती तसं बोलली किंवा वागली तरी आजही तसंच वागेल असं मात्र नाही. पण आपण मात्र त्याच चष्म्यातून तिच्याकडे बघतो ,बोलतो ,वागतो .त्याने बाकी काहीच नाही तर परिणाम असा होतो की आपापसातली नाती दुरावतात.

एक सुंदर वाक्य वाचनात आले होते. Instead of questioning the past,put a full stop to it ! अजून एक म्हण आहे,”रात गयी बात गयी”.आपण स्वयंपाक घरात सरबत केलेले भांडे चांगले विसरून घासून ठेवतो कारण त्या जर चुकून दूध गरम केले गेले तर नासायची भीती असते. कारले कापलेल्या सुरीने फ्रूट सॅलड साठी फळांचे तुकडे आपण कधीच करत नाही. तर आधी सूरी स्वच्छ धुऊन येतो आणि त्याचा कडवटपणा काढून टाकतो. ती कडू चव फ्रूट सॅलड ला कशासाठी? अगदी तसंच आहे हे !

आपण मोबाईल वरील डेटा वेळच्या वेळी डिलीट केला नाही तर मोबाईल हँग होतो. हे काम वेळच्या वेळीच केलेले बरे . तसेच मनाला त्रास देणारे विचार जर योग्य वेळेत काढून टाकले नाही तर तो प्रकार आपल्या मनावर होतो . म्हणूनच आपले मन एखाद्या आजाराने हँग होण्याआधी दररोजच्या दररोज कटू , नकोशा आठवणी, चुकीच्या समजुती, दृष्टिकोन झटकून टाकायला डिलीट करायलाच हवे.

जर घरात उपद्रवी उंदीर, घुशी, साप ,विंचू काटा असेल तर असू दे .राहू द्या की! असा विचार आपण कधीच करत नाही, तर घराला उपद्रव होण्याआधी त्यांचा नायनाट करतो .त्यासाठी तात्काळ ॲक्शन घेतो. त्याचप्रमाणे दररोजचा दररोज रात्री थोडं थांबून दररोजच्या व्यवहारतील हिशोबाचा लेखाजोखा मांडायचा. अंतर्मुख होऊन स्वसंवाद साधत कुठल्याही परिस्थितीला अनेक अंगांनी बघून त्याबाबत विचार करून झालेले गैरसमज ,समज ,चुकीच्या धारणा ,दृष्टिकोन पडताळून बघायचे आणि अनावश्यक गोष्टी लगेच डीलीट करायच्या आणि सद्वर्तनाची जमा देखील दररोज करायची हे ठरवून टाकायचं. आणि मग मस्त शांतचित्ताने निद्रादेवीच्या अधीन व्हायचं ! आपोआपच दुसऱ्या दिवशी ची सकाळ प्रसन्न असेल !

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER