गरिबांच्या जगाच्या संगतीने जगताना

गरिबांच्या जगाच्या संगतीने जगताना

माझ्या घराच्या मागच्या बाजूला बराच “सुखवस्तू “म्हणता येईल असा स्लम एरिया आहे. त्यातूनच कामाला येणार्‍या मावशी ,दादा ,आजोबा यातून बरेचदा जवळून गरिबी बघता आली. होता येईल तेवढी मदतही त्यांना करते. त्यातील काही जणी आपल्या मुलांना अतिशय कष्ट करून” टीवीशन”ला पाठवून इंजिनीयर बनवायला बघतात. एकूण स्वच्छ ,छान राहू लागल्या आहेत. अगदी नवीन गोष्टी शिकण्याकडे देखील त्यांचा कल आहे. अडचण आली तर विचारतात काय करू ते. हे सगळेच मागे उल्लेख केल्याप्रमाणे मागच्या सुखवस्तू झोपड्यांमध्ये राहणारे लोक.

परंतु प्रवास करताना मुंबईच्या आसपास आपल्याला दिसते ते गरिबीचे विदारक चित्र . त्यांच्याकडे बघताना मध्यमवर्गीय लोकांना खूप प्रश्न पडतात .अगदी मुलांना त्यांच्याकडे खेळायला पाठवायच म्हणजे वाईट संस्कार व्हायला वेळ नाही लागत वगैरे असेही विचार दिसतात .म्हणजे त्यांचे नैतिक दृष्ट्याही अपयशी असल्याचे लेबल असते ते.

विचार करताना जरा व्यवस्थित बोलून ते विचार करत नाहीत असंही बरेचदा जाणवतं. तोडफोड विचार असतात त्यांचे. जरा मुलीचे सासरी पटले नाही की बरेचदा हातघाईवर येऊन मोडतोड करतात. एकीकडे खायला नाही आणि लग्नकार्य आणि मानपान यावर अमाप खर्च करणे, प्रत्येक मरणदारी आणि तोरणदारी या पद्धतीनुसार लग्न आणि मौतिला त्यांना जावेच लागते. मग भलेही रोजगार मिळाला नाहि तरी चालतो. या प्रथा परंपरा ,ऋण काढून सण साजरे करणे, किंवा हौस आणि कौतुका पायी घरामध्ये टीव्ही आणि मुलांच्या हातात देखील मोठे मोठे मोबाईल दिसतात. त्यावेळी मलाही कुठेतरी आश्चर्य वाटतं .प्रत्येक वेळी मी मावशींना सांगत असते की दोन मुले झाली आता तरी ऑपरेशन करायला सांग ग बाई सुन मुलांना! पण कसलं काय ! मग असे आपले आडाखे चुकत का जातात ? माझ्या परीने मी प्रयत्न करते. पण गरीबी हटाव सारख्या घोषणा असोत किंवा पंचवार्षिक योजना ! यांनी बराच परिणाम झालाही .परंतु प्रत्येक वेळी योग्य कृतीची साथ होतीच असं नाही त्यामुळे, काहीतरी आशावादी राहण्यास केवळ त्यांना मदत यामुळे होत राहिली.

पण तरीही गरिबी हा पूर्ण जगाला भेडसावणारा प्रश्न आहेच , काही कमी जास्त प्रमाणात .या अवघड प्रश्‍नावर विचार करत असताना अचानक ,योगायोगाने या वेळेच्या एका दिवाळी अंकात मला याच विषयावर अतिशय सुंदर लेख वाचायला मिआला. तो लिहीलाय प्रोफेसर अभिजित बॅनर्जी यांनी ! म्हणजे अर्थशास्त्रातील या नोबेल पारितोषिकाने सन्मानित भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ. भारतीय वंशाचे हे अर्थशास्त्रज्ञ यांची आई मुंबईतील निर्मला पाटणकर! पण त्या पुढे उच्च शिक्षणासाठी लंडनला गेल्या .तिथे त्यांचा डॉक्टर विनायक बॅनर्जीबरोबर विवाह होऊन नंतर कलकत्ता हे त्यांचे घर ही त्यांची कर्मभुमी ठरले. त्यामुळे प्रोफेसर अभिजीत यांचे ही तेच घर. उच्चमध्यमवर्गीय ,उच्चशिक्षित, बुद्धिवंतांच्या वर्तुळात यांचा वावर. पण घर होतं कलकत्त्याच्या सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीच्या काठावर .ती मुले दिवसभर बाहेर उंडारत. पण लेखकांना अभ्यास झाल्यावर या मुलांबरोबर खेळायला जायला कोणीच अडवलं नाही, हेच ते बाळकडू ! कधीही शाळेत न जाणारी लिहिता-वाचता न येणारी, फटक्या खराब कपड्यांमधली ही मुले आपल्यापेक्षा जास्त स्मार्ट आहेत असे त्यांना तेव्हाही लक्षात आले. पुढे उच्च शिक्षणासाठी दिल्ली व जे एन यू ने पूर्ण भारताचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले. उच्च शिक्षण हावर्ड युनिव्हर्सिटीत झाले. “विकासाचे अर्थशास्त्र “हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. पुढे पत्नीसह संपूर्ण भारतभर फिरून प्रत्यक्ष गरिबीत उतरून बघण्याचा निर्णय घेतला आणि” गरिबी व गरीब” या अभ्यास विषयावर पत्नी डॉक्टर इसथर् डफलो व एक मित्र यांच्याबरोबर “पावर्टी ऍक्शन लॅब “सुरू केली. याचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या प्रश्नांवर केवळ आकडेवारी नाही ,तर गरिबांच्या आयुष्यात उतरून ,वास्तव तपासण्याचा प्रयोग हा होता .गरीब लोक आयुष्य कसे जगतात? ते काय विचार करतात ?निर्णय कसे घेतात ?तो घेताना नेमक्या कोणत्या गोष्टींची त्यांना मदत होते ?कोणत्या गोष्टी पाय खेचतात.?

यावर बोलताना ते म्हणतात की,”आम्ही 20 हून अधिक वर्षे भारतातली दरिद्री खेडी फिरलो. जगभरातल्या अति गरिबांच्या अंधाऱ्या वस्त्या पायाखाली घातल्या. गरिबांची दुःख म्हणून उलगडण्याचा प्रयत्न केला. आम्ही आधी न कळवता अनाहूतासारखे गेलो, त्यांनी आमचं स्वागत केलं. पाहुणचार केला .वरून आमच्या प्रश्नांना न कंटाळता सविस्तर उत्तरे दिली. स्वतःच्या आयुष्यातल्या खासगी गोष्टी न संकोचता सांगितल्या.”हे ऐकताना मलाही खूप कौतुक वाटलं.

पुढे ते म्हणतात की ,”या गरीबांनी बहुतेकदा आम्हाला धक्के दिले ,आमचे बहुतांश आडाखे आणि गृहीतक चुकीची आहेत हे दाखवून दिलं .या चुकांची कारणही शोधून दिली .गरिबांविषयीच्या सरसकट समजूती मधून निष्कर्षाला येणं आणि त्यातून दीर्घकालीन धोरणाची आखणी करणं बहुतेकदा निरूपयोगी ठरतं त्याची कारणं जगापुढे मांडण्यासाठी आम्हाला मुद्दे दिले.”

हा लेख वाचताना बऱ्याच गोष्टीचा उलगडा मला झाला. आपण दुरून सल्ले देतो. पण त्यांच्या प्रश्‍नांची जाणीव होण्यासाठी त्यांच्यात राहून ,त्यांच्या या गटाचा भाग होऊन, विचार केला तरच आपल्याला त्यांचे प्रश्न कळतात. जगातल्या सगळ्या गरिबांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं हि एक सारखी नसतात आणि दुसरी गोष्ट ती व्यक्तिपरत्वे भिन्नभिन्न असतात .याला कारण त्यांच्या रूढी परंपरा ,विचार करण्याची पद्धती, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती यानुसार त्यात विविधता येते. आणि त्यामुळे सरसकट एक उत्तर सगळ्या गरीबी साठी लागू होत नाही.

त्याचप्रमाणे चैनीच्या वस्तू घेण्याकडे यांचा ओढा असतो ,मात्र बचतीकडे फारसे लक्ष नसते. अगदी खायला नसलं तरीही मोबाईल लागतोच. याचे देखील उत्तर मला समजलं. खरतर ते पण तार्किक दृष्ट्या योग्य विचार वगैरे करू शकतात ,मूर्ख नसतात, पण तरीही अन्नापेक्षा ,टीव्ही महत्त्वाचा ठरतो .कशामुळे तर आता नाही तर कधीच नाही !एवढं फक्त त्यांना माहिती असतं. अतिशय वैराण खेड्यामध्ये, कंटाळवाण्या जगामध्ये हाताशी पूर्ण वर्षभरात केवळ 70 दिवस काम आणि सगळे मिळून तीस दिवस जास्तीत जास्त मजुरी मिळत असेल. तर नुसता रिकामा बसून डोकं काम करू देत नाही .टीव्ही समोर असला की दिवस पटकन जातो. इतक विदारक चित्र मला कळलं.

तसेच सुगीच्या वेळीच हे शेतकरी बाजारातून खत का आणून ठेवत नाही?असे खास मध्यमवर्गीय प्रश्नही मला पडले. पण बरेचदा असं आणून घरात ठेवलेलं खत, अडीनडीला बाजारात जाऊन विकण्याची वेळ येऊ शकते हे त्या सुज्ञ गरिबाला माहिती असतं,म्हणूनच चार पैसे हाती आल्यावर ,धान्य ,भाजीपाला खरेदी करण्याऐवजी मुलीला लग्नात द्यायला म्हणून एखादी स्टीलची पातेली घेऊन ठेवताना एखादी माऊली दिसते. तर बचत गटाला व्याजापोटी पैसे देण्यापेक्षा खात्यात का नाही पैसा जमा करत याचे उत्तरही त्या चतुर महिलेला माहित असते .कर्जाचा हप्ता लागतो. त्यामुळे तेवढे पैसे सक्तीने बाजूला पडतात ,बचत करायची तर ती कधीच होणार नाही. माझ्या बाजूला ठेवलेल्या पैशाला वाटा फुटतीलच . ही जाणीव पण त्यांना आहे. तिथे आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांच् अर्थकारण चालत नाही .

त्यांच्या कामाची रक्कम नेहमीच रोख स्वरूपात त्यांच्या हातात मिळते आणि पैसे हातात आले की त्याला वाटा फुटणारच. अशातून जर पैसे वाचवायचे तर त्या बँकेत नेऊन जमा करणे सोपे नाही. त्यासाठी अति गरीब माणसाला मन मारावच लागतं ,पण हेच जर दररोज असेल तर त्याचाही कंटाळा येतो.

आपण मन मारू शकतो ,कारण उद्याची आपल्याला खात्री असते. याचं उद्याच्या भीतीतूनच अनेक मुले जन्माला घालण्याची प्रवृत्ती निर्माण होते. गोतावळा याचा आधार खूप महत्त्वाचा वाटतो म्हणूनच लग्नकार्य ,मानपान, यांना जाणे महत्त्वाचे मानले गेले असले पाहिजे.

अभ्यासकांनी गरिबी हटवण्याची काही सूत्रही दिलेली आहेत, ती म्हणजे विश्वसनीय माहितीचा अभाव, अभ्यासकांचे पूर्वग्रह दूषित वृत्ती, त्यांची विचार प्रक्रिया निर्णय पद्धती समजावून घेणे, त्यांना वाटणारी भविष्यकाळाची चिंता, आणि आणि भूतकाळातील कायमस्वरूपी अस्थिरता दूर करून स्थैर्य असलेले आयुष्य मिळवून देणे .ही काही सूत्र सागितली आहेत.

प्रोफेसर अभिजित बॅनर्जी यांच्या या अभ्यास प्रक्रियेतून मला दैनंदिन जीवनामध्ये सभोवताली बघताना , भेडसावले प्रश्न दूर झाले. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनाच हा प्रश्न नेहमीच पडतो. पण खरंच निकट भविष्य जर अंधकारमय दिसत असेल, भविष्याची खात्रीच नसेल तर आपोआपच आज मन मारून जगायला कोण तयार होईल? या प्रश्नांची उत्तरे मिळता मिळता मलाच एका संधीची खिडकी उघडल्या गेल्यासारखी वाटते आहे. आपल्या गरीब देश बांधवांसाठी काहीतरी करावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण काय करावं नेमकं कळत नाही. हे नेमकं काय ? याची दिशा यातून मिळू शकते, मला मिळाली. तुम्हाला काय वाटतंय ? जरूर कळवा.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER