लिव्ह इन रिलेशनशिप, पण प्रौढांची !

लिव्ह इन रिलेशनशिप

समाजमाध्यमे ही समाजाचा आरसा आहे म्हणतात ते खरं आहे. बरेचदा आपण म्हणतो की, हे सगळं काही खरं नाही, ही केवळ गोष्ट, कथानक आहे . अगदी आताचाच विषय आठवला. ‘अग्गोबाई सासूबाई’चा ! पहिल्या जाहिरातीतच आसावरीला तिची सून शुभ्रा ही बोहल्यावर उभे करण्यास नेत असते, असे दाखवलेले आहे. आपोआपच या ठिकाणी एकीकडे, हे s ! काहीतरीच! हा विचारही मनात आला आपल्या आणि त्याचबरोबर पाहण्याची उत्सुकता पण वाढत गेली.

आता नुकतीच आलेली एक जाहिरात लॉकडाऊन उठल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी एक स्त्री रेस्टॉरंटमध्ये जाते. एवढ्यात एक वयस्कर गृहस्थ आत शिरताच ती उभी राहते आणि हसून स्वागत करते. तिच्या कुटुंबीयांच्या चेहर्‍यावर आश्चर्य दाटलेलं की, आपल्या बोटातील नवीन रिंग दाखवते व त्यांची ओळख करून देते .नंतर सगळे खूश! आश्चर्यकारकरीत्या परस्परांकडे बघतात. जाहिरात म्हणून फार सहजतेने बघितले जाते. पण प्रत्यक्षात एकाकीपणा जाणवून आईने स्वतःसाठी जोडलेल्या जोडीदाराला एवढी मोठी मुले एक्सेप्ट इतक्या सहजतेने करतील ? अगबाई… मधील बबड्या तरी परावलंबित्वाने आणि अती लाडापायी का होईना या गोष्टींना विरोध करतोच. पण प्रत्यक्ष जीवनात तर हे अशक्य वाटते. मुलांना आई ही आईसारखी हवी असते. साधी कुठली नवीन फॅशन केलेली पण बरेचदा मुलांना आवडत नाही. कुठे तरी आईची प्रतिमा त्यांच्या मनात अशी नसते. हे खूप मनावर घेण्यासाठी नसते. परंतु विरोध असाही होतो.

मुळात हा प्रश्न खुद्द डॉक्टर रोहिणी पटवर्धन ज्यांनी या वृद्धांच्या कामाला वाहून घेतलेले आहे त्यांनाही हा नव्याने समोर आला. त्यांच्याकडे वृद्धांच्या निवासासह निवासात लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहण्याची सोय आहे का? या प्रश्नाने त्यांच्याही समोर अनेक प्रश्न उभे राहिले होते.

आपणही आज-काल कशीबशी तरुणांच्या तोंडी ही त्यांची भाषा ऐकून तरी घेऊ शकतो; पण प्रौढांच्या बाबतीत तर यामुळे जास्त बंधने किंवा जबाबदारी येत असावी असं वाटतं. या दोन्ही बाजूंनी आर्थिक फसवणूक होऊ शकते का ? कुठलेही कामकाज न करता समोरच्या स्त्रीच्या पेन्शनवर किंवा वारसा हक्कावरील पैशावर डोळा ठेवून लग्न करणारे पुरुष असतीलच की! किंवा फक्त पैशाकडे बघून लग्न करणाऱ्या स्त्रियाही असतीलच! त्यामुळे हाही धोका खूप! पुन्हा मुले, नातेवाईक, समाज यांच्या प्रतिक्रिया कशा असतील? म्हातारपणात सेवा करवून घेण्याचा यात हेतू असेल का किंवा ह्या वयात याची गरज पडत असेल? बायको म्हणून कर्तव्य पार पाडणे अपेक्षित असेल का? मुख्य म्हणजे इतकी वर्षं जुळवत आणलेले बंध बाजूला टाकून परत नव्या माणसाशी या वयात जुळवून घेणे किती शक्य होत असेल ? ही सगळ्यात मोठी गोष्ट वाटते. आणि पुन्हा ती समोरची व्यक्ती ही दुर्वर्तनी, व्यसनी असणारच नाही याचा काय भरवसा? केवळ आजारपण वा एकाकीपणातून येणारी असुरक्षितता घालवण्यासाठी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची गरज आहे का? यामुळे परस्परांच्या कुटुंबात येणारी कटुता किती त्रासदायक होत असेल? असे अनेक विचार सुरू झाले.

मध्यंतरी एका मोठ्या मैत्रिणीला कोरोनामुळे, आजाराने फक्त आठ दिवसांच्या आत तिच्या मिस्टरांना गमवावे लागले. ती म्हणाली की, एका दिवसात आयुष्य पारच बदलून गेलं ग माझं ! तसेच काहींना हार्ट डिसीज तर काहींना लिव्हरच्या आजाराने जोडीदार गमवावे लागले.

पूर्वीची आपली समाजव्यवस्था व त्यातील कुटुंबव्यवस्था त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींना हा एकाकीपणा जाणवत नव्हता .अर्थात त्यातही एक बारकावा म्हणून मला जाणवतो की, या कुटुंबात थोडे मन मारून राहावे लागत असेल. दुसऱ्यांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागत असेल; कारण तेव्हा स्त्रिया विशेषतः आर्थिकदृष्ट्या समर्थ नव्हत्या. पण एकाकीपणावर मात करण्यास मदत होत असे. नाही म्हटलं तरी अनेक वर्षांचा सहवास असलेली जिवाभावाची माणसे असत आणि कुटुंबाच्या हितातच आपलं हित समजण्याची सवय होती. स्त्रिया विशेषतः आपल्या गोतावळ्यात रमतात, इतरांच्या सुखाने सुखी होतात. तरीही त्यांना एकटेपणा जाणवतोच किंवा काही गोष्टी असतात की, ज्या आपण मुलांशीही शेअर करू शकत नाही. पुरुष लोकांना बरेच बाहेर राहायची सवय असते. फक्त घर हे त्यांचे मोजमाप नसल्याने ते लवकर दुःखातून बाहेर येऊ शकतात. अर्थात सेकंड इनिंगमध्येच खरे तर जोडीदाराचे महत्त्व त्यांनाही जास्त जाणवू लागते . काहीही झालं तरी मानसिक एकटेपणा ग्रासून उरतोच.

मात्र आपल्याकडे घटस्फोट या नावानेही स्फोट झाल्यासारखे लोक आवासून आश्चर्याने बघत राहतात. त्यामुळे अशा प्रकारची संकल्पना वापरायची तर अतिशय खंबीरपणा, ठामपणा , सावधपणा, स्पष्टता गरजेचा आहे. धाडस आणि जबाबदारीने या गोष्टी पार पाडाव्या लागतील; कारण असा विचार करणं आणि तो प्रत्यक्ष उपयोगात आणण्याच्या मध्ये खूप मोठी तफावत आहे.

पुण्यामध्ये काही वर्षांपासून हे काम सुरू केल्याचे ऐकिवात आहे. अशा वृद्ध लोकांना एकत्र आणून त्यांच्या भेटीगाठी, ओळखीपाळखी ,आवडीनिवडी , सहली , खेळ यांच्या निमित्ताने पुढे सूर कुठे जुळतात का याचा विचार केला जातो. अशा वेळीही काही लोक तत्काळ निर्णय घेऊन एकत्र येतात; पण नंतर मात्र सवयी जाचक ठरतात .म्हणून ही निवड पुरेसा वेळ देऊनच करायला हवी.

कुटुंबं छोटी झाली. स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाली. तिला स्वतःबद्दलच्या आदरभावाची जाणीव झाली. पण त्यामुळे एकाकीपणाही वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ची प्रौढामधील गरज वाढत असली तरीही म्हणूनच या पायरीवर पाय अजूनही ठेचकाळत आहे.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER