साहित्य संमेलन ऑनलाइनच व्हावे…

Literary convention

Shailendra Paranjapeसाहित्य संमेलन कुठे भरवावे, यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. साहित्य संमेलन भरवण्यासंदर्भात वर्षानुवर्षे प्रचलित असलेली एक पद्धत आहे. त्यानुसार त्या त्या भागातल्या साहित्य संस्था संमेलन भरवण्याची इच्छा प्रदर्शित करतात आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळ त्यावर सांगोपांग चर्च करून निर्णय घेते. साधारणपणे महाराष्ट्राच्या सर्व भागांमधे संमेलन भरवले जावे आणि मराठी भा,क मोठ्या संख्येने आहेत, अशा देशाच्याही बहुतांश भागात संमेलन भरवलं जावं, हेही त्या प्रक्रियेत अनुस्यूत आहे. बडोदा किंवा इंदूरला झालेली संस्मरणीय संमेलने असोत की पुणे, महाबळेश्वर, आळंदीचे वेगवेगळ्या कारणांनी गाजलेले संमेलन असो, मराठी साहित्य संमेलन हे एक प्रकारे मराठी भाषिकांचा प्रातिनिधिक स्नेहमेळावा असतो आणि एकूणच साहित्य व्यवहाराबद्दल उहापोह त्यात केला जातो.

मागच्या शतकातले थोर विचारवंत देशभक्त महादेव गोविंद रानडे यांनी १८७८ मधे ग्रंथकार संमेलनातून आजच्या साहित्य संमेलनांची मुहूर्तमेढ केली होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्याच वर्षी महात्मा फुले यांनी या संमेलनाचं निमंत्रण नाकारलं होतं आणि ते नाकारताना शूद्रातिशूद्रांच्या प्रश्नांवर या संमेलनात चर्चा नसल्याने आपण त्यास येणार नाही, असं कळवलं होतं. संमेलन म्हटलं की वादविवाद हे आलेच, ही गोष्टही मराठी साहित्य रसिकांच्या आणि एकूणच मराठी भाषकांच्या अंगवळणी पडली आहे.

मात्र, मागच्या पिढीत रानडेंपासून सावरकर, चिं वि जोशी अत्रे बेडेकर के ज पुरोहित अरविंद गोखले असोत की अगदी अलीकडच्या काळात शांताबाई शेळकेंपासून ते अरुणा ढेरेंपर्यंत अनेकांनी संमेलनाध्यक्षपद भूषवले आहे. काही थोर साहित्यिकांनी निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घ्यायचा नाही, हे ठरवल्याने त्यांना संमेलनाध्यक्ष होता आले नाही. मागच्या पिढीतले दिग्गज साहित्यिक, कवी संमेलनाध्यक्ष झाले आणि संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पद्धतीवरूनही अनेकदा वादविवाद चर्चा झडलेल्या आहेत. विशेषतः थोर कवयित्री इंदिरा संत यांचा आज  स्मरणदिवस असताना त्यांना कोल्हापूरच्या संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत रमेश मंत्री यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. वास्तविक इंदिरा संत या मंत्री यांच्यापेक्षा निःसंशय मोठ्या योग्यतेच्या होत्या पण निवडणुकीत घटकसंस्था, मतदार हे सारं गणित जमवून आणावं लागतं. त्या निवडणुकीला लोकसत्ताकार माधव गडकरी विरुद्ध सकाळचे विजय कुवळेकर असंही स्वरूप प्राप्त झालं होतं. गडकरी यांनी रमेश मंत्री यांची बाजू लावून धरली होती तर कुवळेकर हे इंदिरा संत यांच्या बाजूने उतरले होते.

संत यांना पराभूत व्हावं लागलं याची खंत अनेक साहित्यप्रेमींना होती, लेखक, साहित्यिकांनाही होती. पण मुळात अखिला भारतीय साहित्य महामंडळ, त्यांची कार्यपद्धती, निवडणूक प्रक्रिया या एकूणच साऱ्या व्यवहारात आणि वादांमधे साहित्यबाह्य मंडळींचा शिरकाव झाल्यानं हे सारं क्षेत्रंच गढूळ होऊन गेलंय. त्यामुळे नव्या शतकात नव्या पिढीनं त्यात लक्ष घालायला हवं आणि जुने जाऊदे मरणालागुनि, या पंक्तींप्रमाणे नवं घडवायला हवं. केवळ साहित्यात नव्हे तर साहित्य संस्थांच्या कारभारात, महामंडळाच्या कार्यपद्धतीत आणि संमेलनं भरवण्याच्या प्रक्रियेतही.

साहित्य संमेलनं भरवताना स्थानिक पातलीवर एखादी एनजीओ टाईप संस्था काढून दोन चार दिवाळी अंक काढणं, प्रसंगी स्वतःची प्रकाशनसंस्था काढून पुस्तकं प्रकाशित करणं, त्यातून काही स्वघोषित लेखकमंडळींना हाताशी धरणं, वेळोवेळी उपकृत करणं, नंतर संस्थेमार्फत पुरस्कार वगैरे देणं, वृत्तपत्रातून आपली छबी मोठ्या लेखकांबरोबर छापून येईल, हे बघणं आणि हळूच साहित्य संस्थांमधे, साहित्य परिषदेमधे साहित्य महामंडळामधे वर्णी लावून घेणं, ही मोडस काही लोकांनी अंगीकारलीय आणि त्यात प्रावीण्यही मिळवलंय.

या साऱ्या प्रकारातून साहित्यबाह्य किंवा ज्यांचा खरे तर साहित्य या शब्दाशी खरे तर इक्विपमेंट या अर्थानं संबंध यायला हवा, असे लोक साहित्य संस्थांच्या कारभारातले निर्णय करू लागलेत. त्याबद्दल खासगीत खंत व्यक्त केली तर अस्सल साहित्यिक असलेले लोक पूर्णपणे निराशावादी झालेले दिसतात. ते सांगतात, अहो हे लोक येताहेत म्हणून चाललाय तेवढा तरी कारभार चालतोय. त्यातूनच मग साहित्य संमेलन भरवण्याचा वाद होताना अतार्किक किंवा प्रसंगी तर्कशून्य कारणंही दिली जातात.

मुळात करोनाचं संकट अद्याप संपलेलं नसताना साहित्य संमेलन भरवण्यापेक्षा ते ऑनलाईनच का घेऊ नये, हा खरा प्रश्न आहे. पण तसं ते घेतलं तर मखरात बसायची सवय असलेल्यांना मिरवायची संधी कशी मिळणार…ग्रंथदिंडीतही ज्ञानोबा-तुकोबांच्या ग्रंथांपेक्षाही यांचे चेहरे टीव्ही, पेपरातून कसे येणार….वादविषयातून टीव्हीवर बाईट देत रोजच्या रोज बिनभांडवलाची प्रसिद्धी कशी मिळणार…संमेलन घेतलं की पुढचा सगळा साहित्य व्यवहार आणि इतरही व्यवहार पुरा करता येणार…त्यामुळे संमेलनं भरवण्याचा अटापिटा हा मराठी साहित्याच्या की ते साहित्य केवळ एक साधन म्हणून वापरून स्वतःची साहित्य (मालमत्तारूपी) संपदा संपन्न करण्याचा तर प्रयत्न नसतो ना… त्यामुळे मराठी भाषकांनी पत्रं पाठवून इ-मेलद्वारे यंदाचे संमेलन ऑनलाइनच घ्यावं, अशा आग्रह साहित्य महामंडळाकडे धरावा, ही विनंती.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER