नेटफ्लिक्सला (NETFLIX) टक्कर देण्यासाठी लायन्सगेट (LIONSGATE) सरसावले

Lionsgate moved to beat Netflix

Chandrakant Shindeभारतात डाटा स्वस्त झाल्यापासून मोबाईल, टॅबवर मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि चित्रपट पाहाणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. लॉकडाऊनच्या काळात तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या आहेत. हे पाहून गेल्या वर्षी भारतात प्रवेश केलेल्या ‘लायन्सगेट’ या ब्रिटनमधील चित्रपट निर्मात्या संस्थेने पीव्हीआर पिक्चर्सबरोबर हॉलिवूडच्या चित्रपटांचे आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंग करण्यासाठी करार केला आहे.

मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळणारा भारतातील मोठा प्रेक्षकवर्ग पाहून परदेशातील अनेक ओटीटी कंपन्यांनी भारताकडे आपला मोहरा वळवला आहे. केवळ मोबाईल किंवा टॅबच नव्हे तर स्मार्ट टीव्हीनेही ओटीटी प्लॅटफॉर्मला मोठे बळ दिले आहे. ‘नेटफ्लिक्स’ने अगोदरच यात उडी घेऊन अग्रस्थान प्राप्त केले आहे. अँपलनेही भारतातील मनोरंजन क्षेत्रातील वाढता व्यवसाय पाहून अँपल टीव्हीसोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मचीही तयारी गेल्या वर्षी सुरू केली होती. अँपलसोबतच कॅनडातील प्रख्यात ‘लायन्सगेट’ या चित्रपट निर्मिती संस्थेनेही भारती एअरटेल, व्होडाफोन आणि आयडियासोबत करार करून त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्मची सोय उपलब्ध करून दिली होती. आता आपल्या कॅटलॉगमध्ये हॉलिवूडचे मोठे चित्रपट जोडण्यासाठी पीव्हीआर पिक्चर्ससोबत करार केला आहे.

‘लायन्सगेट’ हा कॅनेडियन अमेरिकन कंटेंट स्टुडिओ असून तरुण पिढीतील लोकप्रिय हंगर गेम्स, ट्विलाईट सागा सीरीज, जॉन विकच्या चित्रपटांच्या सीरीजसह गाजलेले ला ला लॅन्ड, वंडर,अमेरिकन असॅसिन, रॉबिन हूड, द स्पाय व्हू डम्प्ड मी, अ सिंपल फेव्हर, नाऊ यू सी मी २, गॉड्स ऑफ इजिप्त, लेटर्स टू ज्यूलिएट आणि रिझर्व्हेयर डॉग्ज- अशा नामवंत चित्रपटांची निर्मिती केली आहे. भारतातील प्रेक्षकांना आपलेसे करण्यासाठी गेल्या वर्षी भारतात प्रवेश केल्यानंतर आता लायन्सगेट लायन्सगेट प्ले या ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज होत आहे. भारतात अगोदरच नेटफ्लिक्स, डीज्नी हॉटस्टार, झी ५, मॅक्स प्लेयर – असे काही ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. आता आपल्या कंटेंटने या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मात करण्यासाठी लायन्सगेट आपले पंख पसरवत आहे. यासाठी भारतातील विविध भाषांमध्ये कंटेंट पुरवण्यास सुरुवात करणार आहे.

आपल्याकडील चित्रपटांसोबतच हॉलिवूडमधील प्रख्यात चित्रपटांचे हक्क घेण्यासाठी लायन्सगेट भारतातील कंपन्यांबरोबर चर्चा करीत होते. त्यांना आता यश आले असून पीव्हीआरसोबत त्यांनी नुकताच करार केला आहे. लायन्सगेटने आपल्या ‘लायन्सगेट प्ले’साठी पीव्हीआर पिक्चर्सकडून बॉक्स ऑफिसवर यशस्वी झालेल्या लोकप्रिय हॉलिवूड चित्रपटांचे स्ट्रीमिंग हक्क विकत घेतले आहेत. भारतीय ग्राहकांपर्यंत हॉलिवूडमधील सर्वोत्तम कंटेंट पोहचवण्यासाठी लायन्सगेट प्ले सतत प्रत्यनशील असून, त्यांच्याकडील सकस चित्रपटांच्या यादीत त्यांनी आता नव्याने भर घातली आहे.

लायन्सगेटकडे ॲक्शन-थरारपासून विनोदी आणि नाट्यमय अशा अनेकविध शैलींतील आणि समीक्षकांची तसेच व्यावसायिक प्रशंसा मिळवलेले हॉलिवूड चित्रपट असून त्यांना भारतीय ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यांच्या चित्रपटसंग्रहात जगभरातील बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या विविध चित्रपटांमध्ये ब्रॅड पिट अभिनित ‘फ्यूरी’, अरनॉल्ड श्वाझ्नेगर-सॅल्वेस्टर स्टॅलन अभिनित ‘दि टॉम्ब अका एस्केप प्लॅन, वेन डिझेल-कार्ल अर्बन अभिनित ‘रीडीक’ चित्रपटांचा प्रामुख्याने  समावेश आहे. यंदाच्या म्हणजे हे २०२० मध्ये लायन्सगेटवर हे चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. जूनमध्ये लायन्सगेट प्ले त्यांच्या ‘फ्रायडे ब्लॉकबस्टर’ मालिकेत सलमा हायेक-पेनेलोप क्रूझ अभिनित वेस्टर्न ॲक्शन कॉमेडी ‘बँडिडस’ आणि जेट लीचा ‘किस ऑफ दि ड्रॅगन’ प्रदर्शित करणार आहेत. नजिकच्या काळात यांतील काही चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू आणि इतर भाषांमध्ये कंपनी डब करणार आहे.

बदलता काळ आणि जागतिक महामारीमुळे देश लॉकडाऊनमध्ये असल्याने कंटेंटची मागणी वाढतच चालली आहे. पीव्हीआरसोबतच्या भागीदारीसारखे अनेक करार लायन्सगेटकडून भविष्यात जाहीर केले जाणार असून नेटफ्लिक्सवर मात करण्याची पूर्ण तयारी लायन्सगेटने केल्याचे दिसून येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER