भाजपकडून खडसेंच्या पुनर्वसनाचे प्रयत्न, केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

Eknath Khadse

नवी दिल्ली : नुकताच संपन्न झालेल्या महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली नसल्याने पक्षासोबत नाराज असलेले भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न भाजपच्या केंद्रातील नेत्यांनी सुरु केल्याची माहिती पुढे येत आहे. भाजप आता त्यांच्यासह इतर नाराज नेत्यांना केंद्रातील टीममध्ये स्थान देण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नव्या टीमची घोषणा करणार आहेत. या टीममध्ये महाराष्ट्र भाजपच्या नाराज नेत्यांना संधी देण्यात येणार असल्याची बातमी टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे.

महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना राष्ट्रीय स्तरावर पक्ष संघटनेत काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. यामध्ये नाराज नेते एकनाथ खडसे आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना स्थान देतमोठी जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेचे तिकीट मिळाले नसल्याने एकनाथ खडसे हे प्रचंड नाराज असल्याचं गेल्या काही दिवसात बघायला मिळालं होतं. त्यांनी विधानपरिषद तिकीट मागितलं होतं. मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारुन, बाहेरुन आलेल्या नेत्यांना तिकीट दिल्याचा आरोप, खुद्द खडसे यांनी केला होता. खडसेंनी चंद्रकांत पाटील यांचं नाव घेऊन तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.

या पार्श्वभूमीवर आता एकनाथ खडसे यांना थेट जे पी नड्डा यांच्या टीममध्ये महत्वाचं स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र एकनाथ खडसे हे पद स्वीकारणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण पक्षवाढीसाठी आपण आयुष्यभर झिजलो आहे, असं ते वारंवार जाहीरपणे सांगत असतात. त्यामुळे ना आमदारकी, ना खासदारकी मिळाल्याने खडसे संघटनेत काम करणार का हे येत्या काही दिवसातच कळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला