राजीव गांधी यांच्याप्रमाणेच सोनिया गांधींनीही नागरिकांना चिथावले : प्रकाश जावडेकर

Sonia Gandhi-Prakash Javdekar

नवी दिल्लीः दिल्लीतील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अमित शहा यांना केंद्रीय गृहमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केल्यानंतर भाजपनेही काँग्रेसवर पलटवार केला आहे. दिल्ली हिंसाचारात होरपळली असताना दुसरीकडे राजकारण तापले आहे. हिंसा कुणी भडकवली यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

 १९८४ च्या शीख दंगलीवेळी राजीव गांधींनी ज्याप्रमाणे नागरिकांना चिथावले होते, त्याच प्रकारे यावेळी सोनियांनी नागरिकांना चिथावले, असा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. सीएएविरोधात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी नागरिकांना भडकवले असल्याचे जावडेकर म्हणाले. आयबी कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येचा आरोप आम आदमी पार्टीचे नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यावर होत आहे. यावर काँग्रेस का गप्पा  आहे? असा सवाल जावडेकर यांनी केला.

भाजपाचे सोनियांना प्रत्युत्तर; हिंसाचारामागील चेहरे दोन महिन्यांत पुढे येणार

विधानसभेत मुख्यमंत्री केजरीवाल हे हिंसेत मृत्यू झालेल्यांचे जाती-धर्म जाहीर करून वातावरण तापवत आहेत, असा आरोप जावडेकर यांनी केला. दिल्लीतील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. हिंसाचारप्रकरणी चौकशी सुरू आहे. दोषींना कठोर शिक्षा होईल. अशा स्थितीत प्रत्येक पक्षाच्या नेत्याने जबाबदारीने वागून नागरिकांची भेट घेऊन त्यांना शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण असे होताना दिसत नसल्याचे जावडेकर म्हणाले.

 दिल्लीत दंगल फक्त दोन दिवसांपासून होत नाही. तर यासाठी दोन महिन्यांपासून नागरिकांना चिथावण्याचा प्रयत्न सुरू होता. ११ डिसेंबरला कायदा झाला आणि १४ डिसेंबरला काँग्रेसने जाहीर सभा घेत ही आरपारची लढाई आहे, असे म्हटले. जो लढणार नाही तो भित्रा ठरवला जाईल, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. तर सीएएला विरोध करणाऱ्यांसोबत काँग्रेस आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते, असे जावडेकर यांनी सांगितले.

आज ताहिर हुसेन यांना प्रत्येक टीव्ही चॅनल दाखवत आहे. त्यांच्या घरातून अवैध शस्त्रसाठा सापडला. दंगलीची तयारी केलेली दिसली. आता आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यावर गप्प का आहे? असा प्रश्न जावडेकरांनी केला आहे. शाहीनबागमध्ये जाऊन काँग्रेस नेते मणिशंकर यांनी आंदोलकांना चिथवले. शशी थरूर यांनीही तिथे जाऊन आंदोलकांना समर्थन दिल्याचे ते म्हणाले.