पडद्यावरची अरूंधती मधुराणीसारखीच

Madhurani Prabhulkar

कधी कधी एखाद्या कलाकाराला तो खऱ्या आयुष्यापेक्षा वेगळ्या स्वभावाची व्यक्तीरेखा साकारावी लागते तर कधी कधी तो जसा आहे तशीच व्यक्तीरेखा साकरण्याची संधी मिळते. अनेकदा कलाकार म्हणतात की माझ्या मूळ स्वभावापेक्षा वेगळी भूमिका असल्याने आव्हान वाटले. हा झाला त्याच्यातील कलाकाराच्या दृष्टीकोनाचा भाग. पण जेव्हा एखाद्या कलाकाराला अगदी त्याच्यासारखीच, त्याच्याच आवडीनिवडी असलेली किंवा त्याच्या खऱ्या आयुष्यातील क्षणांशी जवळीक साधणारी भूमिका मिळाली तर आव्हानापेक्षाही मिळणारा आनंद खूप वेगळा असतो. असाच आनंद सध्या मधुराणी प्रभुलकर(Madhurani Prabhulkar) घेत आहे. आई कुठे काय करते या मालिकेत प्रेक्षकांसमोर आईचं आयुष्य उलगडून दाखवणाऱ्या मधुराणीने कुटुंबासाठी आई कशी आपल्या हौसेला, छंदांना मुरड घालून आनंदाने जगते याचा प्रत्यय घरातच घेतला आहे. त्यामुळेच ती म्हणते पडद्यावरची अरूंधती ही अगदी मधुराणीसारखीच आहे.

आई कुठे काय करते या मालिकेत अरूंधती या भूमिकेच्या निमित्ताने मधुराणीने दहा वर्षानंतर मालिकेत कमबॅक केले आहे. प्रमोल प्रभूलकर यांच्याशी लग्नानंतर मधुराणीने आपला सगळा वेळ घरासाठी दिला. त्यानंतर तिला मुलगी झाली आणि पुन्हा तिने आपले करिअर थांबवले. मधुराणी ही अभिनेत्री तर आहेच त्यासोबतच ती उत्तम कवयित्री आणि गायिकाही आहे. तिचे कवितेचे पान हे यूट्यूब चॅनल सध्या हीट असून यामध्ये ती कवितेवर आधारीत अनेक ऑनलाइन कार्यक्रम सादर करते. तिची स्वताची कवितेची समज खूप चांगली आहे. लग्नाआधी आणि त्यानंतर मुलीच्या जन्माआधी घर सांभाळून तिने काहीदिवस आपले छंद जोपासले. पंधरा वर्षापूर्वी नवरा माझा नवसाच्या या सिनेमात गणपतीपुळ्याला जाण्यासाठी बसमध्ये चढलेली उदयोन्मुख आरजे आठवतेय का…तीच मधुराणी.

भुसावळ येथे जन्मलेली आणि पुण्यात बालपण घालवलेल्या मधुराणीने पुरूषोत्तम करंडक स्पर्धेतून वयाच्या सोळाव्या वर्षीच अभिनयात पाऊल ठेवले. पुढे नाट्यस्पर्धा, एकांकिका, कविता यामध्ये ती रमली. सुंदर माझं घर, गोड गुपित यासारख्या सिनेमांसह असंभव या मालिकेतील तिची भूमिका गाजली. पती प्रमोद यांच्यासोबत तिने अभिनय कौशल्य प्रशिक्षण संस्थाही सुरू केली. तर असा हा तिचा प्रवास सुरू असतानाच ती जेव्हा आई झाली तेव्हा तिने हे सगळं थांबवून मुलीच्या संगोपनाकडे लक्ष दिलं. ती सांगते ही फेज प्रत्येक आईच्या जीवनात येते. आणि कोणत्याही आईच्या आयुष्यातील हाच भाग तिचे मोठेपण अधोरेखित करतो. आई आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी झटते. आणि हे सगळं करत असताना ती कोणतीही तक्रार करत नाही. तिला यामध्ये मिळणारं समाधान हाच तिचा आनंद असतो. त्यामुळे आई कुठे काय करते ही मालिका प्रत्येकाला त्याच्या आईचे प्रतिबिंब दाखवणारी आहे.

मधुराणीचा हा विचार तिचाही अनुभव आहे. मधुराणीची आई खूप चांगली शास्त्रीय गायिका आहे. पण केवळ मुलींचे संगोपन करता यावे, त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी मधुराणीच्या आईनेही तिचे गायन लांब ठेवले. आईचा हा त्याग पाहतच मधुराणी मोठी झाली. त्यामुळे तिलाही आईच्या त्यागाची जाणीव आहे. मधुराणीलाही गाण्याची आवड आहे, आईकडून सुरेल गळाही तिच्याकडे आला आहे. म्हणूनच जेव्हा लॉकडाऊन होण्यापूर्वी मधुराणीची आई तिच्याच घरी रहायला आली होती आणि लॉकडाउनमुळे तिला पुण्याला जाणे शक्य नव्हते तेव्हा मधुराणीने आईकडून गाण्याचे धडे घेतले. एकीकडे मुलीचा अभ्यास, तिच्या इतर अॅक्टिव्हीटीकडे लक्ष देणारी मधुराणीतील आई आणि दुसरीकडे आईचा रियाज चांगला व्हावा म्हणून तिला प्रोत्साहन देणारी मधुराणीतील मुलगी अशा दोन भूमिका लॉकडाउनमध्ये मधुराणीने निभावल्या.

संवादशास्त्रात पदवी घेतलेली आणि सांस्कृतिक विषयात रमणारी मधुराणी मालिकेतील अरूंधतीशी इतकी समरस झाली आहे की फक्त अरूंधतीची वेषभूषा करून कॅमेऱ्यासमोर मधुराणीच वावरते असंही ती जाणीवपूर्वक म्हणते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER