दारु आणि बीडी आणून देण्यास नकार देणार्‍या बालकाचा खून करणार्‍या आरोपीला जन्मठेप.

सांगली :- दारु आणि बिडी आणून देण्यास नकार दिल्याने नऊ वर्षे वयाच्या बालकाला गळफास लावून त्याचा खून करणार्‍या आरोपीला सांगली कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गणेश हणमंतअप्पा तळवार (वय 48, रा. खॉजावस्ती , मिरज) असे आरोपीचे नाव आहे. त्यांने गणेश य‘ाप्पा वाल्मीकी (वय 9) या बालकाचा दि.15 जुलै 2018 रोजी खून केला होता.

मुळचा कर्नाटकातील दावणगिरीचा असलेला आरोपी गणेश तळवार हा मिरजेतील खॉजा वस्ती परिसरात भाड्याने रहात होता. त्याच्या घरापासून काही अंतरावर त्याची मावसबहिण ज्योती य‘ाप्पा वाल्मिकी ही आपल्या तीन मुलांसह रहात होती. ज्योती यांचा पती हा कामाच्या निमित्ताने विशाळगड मध्ये रहात होता. तो अधून मधून येत जात होता. आरोपीचेही ज्योती यांच्या घरी येणे जाणे असायचे. दि.15 जुलै 2018 रोजी ज्योती या मैत्रिणीसह कामाच्या निमित्ताने जयसिंगपूरला गेल्या होत्या. त्यावेळी मुले गणेश, हणमंत आणि लक्ष्मी असे तिघे घरी असताना आरोपी त्यांच्या घरात आला. गणेश वाल्मिकी या बालकाला दारु घेवुन येण्यास सांगितले. त्यावर गणेशने मी आता जेवणार आहे, दारु आणणार नाही असे सांगितले. त्याने दारु आणण्यास नकार दिल्याने आरोपीला राग आला. त्यानंतर आरोपीने लक्ष्मी हिला तीन रुपये देवुन बिडी आणण्यास सांगितले. तिने आरोपीला बिडया आणून दिल्या. त्यानंतर आरोपीने लक्ष्मीला एक रुपया देवुन चॉकलेट आणण्यास सांगितले. ती घरातून बाहेर पडताच आरोपीने गणेश याचा दोरीने गळा आवळला आणि तीच दोरी घरातील बांबुच्या तुळीला बांधली.

चॉकलेट आणण्यासाठी गेलेली लक्ष्मी काही वेळातच घरी आली, त्यावेळी तिला भाऊ गणेश याला फास लागलेला दिसली. ती मोठ मोठयाने रडू लागली. आरोपीने तिचे गालावर चापटा मारुन कोणाला काही बोललीस तर तुलाही असेच मारुन टाकीन अशी धमकी दिली. भयभीत लक्ष्मी घराबाहेर आली आणि तिने शेजारच्या महिलांना ही घटना सांगिली. घरातील घटना समजताच गणेशची आई घरी पोहचली. तिने आरोपीला जाब विचारला, त्यावेळी आरोपीने गणेशने स्वतःच गळफास लावुन घेतल्याचे सांगितले. परंतु मुलगी लक्ष्मीने घडलेली हकीकत कथन केल्यानंतर आरोपीचे कृत्य समोर आले.

मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौक पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी आरोपीला अटक करुन त्याच्या विरुध्द न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी िअतरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अण्णासाहेब पाटील यांच्या न्यायालयात झाली. सरकारी वकील श्रीमती आरती देशपांडे-साटविलकर यांनी सात साक्षीदारांच्या माध्यमातून नेमकी घटना आणि आरोपीचे कृत्य न्यायालयासमोर आणले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.