अभिनंदनाच्या फोनने श्रेयाचं जमलं

Marathi Actress Shreya Bugde

त्या दोघांची काही निमित्ताने एकमेकांशी ओळख होते. कामाच्या निमित्ताने भेटणं होतं. कुणाला तरी एकाला मैत्री करावीशी वाटते पण दुसऱ्या व्यक्ती पर्यंत ती भावना पोहोचत नाही. मग सतत भेट होईल तेव्हा वाद होत राहतात. मग भेटणे म्हणजे भांडणं असं होऊन जातं. एका वळणावर एक क्षण असा येतो की भांडण मागे पडतं आणि त्या नात्यातला गोडवा कामी येतो. मग त्यानंतर मैत्रीचा टप्पा ओलांडून हे नातं आयुष्याचा जोडीदार बनण्यापर्यंत जातं.

एखाद्या सिनेमात शोभावी अशी ही कथा कॉमेडी क्वीन अभिनेत्री श्रेया बुगडे (Actress Shreya Bugde) हीची लाईफ स्टोरी बनली आहे. निर्माता निखिल शेठसोबत श्रेयाची ओळख झाली ती भांडणातच. पण निखिलला त्याच्या एका विशेष कामासाठी श्रेयाने अभिनंदनाचा फोन केला आणि त्यानंतर ते सगळं भांडण मागे पडलं आणि हृदयातली गिटार कधी वाजली ते दोघांनाही कळलं नाही. आज श्रेया बुगडे आणि निखिल शेठ हे एक कालचे भांडकुदळ मित्र ते आजचे रोमांटिक कपल म्हणून त्यांच्या आयुष्याचा प्रवास करत आहेत. नुकतीच श्रेयाने तिची लव्हस्टोरी सोशल मीडियावर शेअर करत निखिल आणि तिच्या नात्यातल्या काही खास आठवणी उलगडल्या आहेत.

श्रेया बुगडे हे नाव ऐकलं की हवा येऊ द्या मधल्या तिचा प्रत्येक कॉमेडी पंच आठवल्याशिवाय राहत नाही.

विनोदाचं अचूक टायमिंग साधत श्रेयाने मराठी मनोरंजन क्षेत्रात तिच्या स्वतःच्या चाहत्यांची फौज उभी केली आहे. खरेतर लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेली श्रेया शाळा-कॉलेज जीवनात गंभीर भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध होती. शाळा-कॉलेजमध्ये ट्रेनचा प्रवास करत असताना श्रेयाचे लक्ष नेहमी खिडकी बाहेरच्या झाडांकडे नसायचं तर ट्रेनमध्ये पिना ,कानातले टॉप, भडंग पाकीट विकायला येणाऱ्या महिला कशा बोलतात, त्या कशा चालतात हे बघण्यात दंग झालेली असायची. कॉलेजमध्ये असताना सुद्धा चहाच्या टपरीवरचा चहावाला कसा बोलतो, त्याची ढब काय आहे याची ती मिमिक्री करायची. पण त्या वेळेला गंमत म्हणून अशा केलेल्या नकला आणि निरीक्षण तिला एक विनोदी कलाकार म्हणून उपयोगी पडतील असे स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं.

श्रेयाला जितकी विनोदाची जाण आहे तितकीच गंभीर अभिनेत्री म्हणून देखील ती प्रेक्षकांना परिचित आहे. समुद्र या नाटकात श्रेयाने वठवलेली अतिशय सिरीयस भूमिका ही तिच्या अभिनयाचे वैविध्य सांगण्यासाठी पुरेशी आहे. विनोदी अभिनेत्री म्हणून ऑन कॅमेरा प्रत्येकालाच माहीत असलेली श्रेया वैयक्तिक जीवनात देखील अशीच दिलखुलास आणि मनमुराद आनंद घेणारी आहे. श्रेयाच्या आयुष्याचा जोडीदार म्हणजे नि

खिल शेठ मनोरंजनाच्या क्षेत्रात निर्माता म्हणून काम करतो. त्या दोघांची ओळख कशी झाली त्याचा किस्सा नुकताच श्रेयाने शेअर केला आहे.

श्रेया सांगते, माझी आणि निखिलची ओळख एका मालिकेच्या निमित्ताने झाली. त्या मालिकेत माझी छोटीशी भूमिका होती पण या मालिकेचा निर्माता म्हणून निखिल काम बघत होता. एक कलाकार आणि निर्माता म्हणून अनेकदा आमच्या शाब्दिक चकमकी उडाल्या आहेत. माझं म्हणणं त्याला न पटल्याने आणि त्याचं म्हणणं माझ्या पचनी न पडल्याने आम्ही भेटू तेव्हा आमचे वादच व्हायचे. त्यामुळे आज त्या गोष्टी आठवल्या तर आमची मैत्रीच काय तर आमचं लग्न झालं यावर कधीकधी माझा विश्वासच बसत नाही. एक काळ असा होता की आम्ही भेटलो की सतत भांडायचो पण एकदा निखिलने निर्मिती केलेल्या प्रोजेक्टला पुरस्कार मिळाला होता आणि त्यासाठीच मी त्याचे अभिनंदन करण्यासाठी फोन केला. त्या एका फोनने आमच्यातील भांडण आणि मतभेद, गैरसमज दूर झाले. जो काही वाद होता तो मतभिन्नता असल्यामुळे होता हे आम्हाला दोघांनाही कळलं. हे आधी आम्ही लक्षातच घेत नव्हतो. त्यानंतर आम्ही भेटायला लागलो अधिकाधिक जाणून घेतल्यानंतर आमच्या दोघांच्या लक्षात आलं की आम्हाला एकमेकांविषयी काहीतरी खास भावना वाटत आहेत. आणि मग एका पॉईंटवर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही दोघे जेव्हा आमच्या रिलेशनशिपचा विचार करतो तेव्हा आपण कुठल्या कुठल्या विषयावर फालतू भांडण करत होतो हे आठवलं की आम्ही खूप हसतो. आज मी हवा येऊ द्या या शोच्या माध्यमातून लोकांना हसवण्याचा प्रयत्न करते. आयुष्यात खूप गोष्टी अशा येतात की ज्यामुळे आपण दुःखी होत असतो पण मनसोक्त हसणं आणि मनसोक्त हसवणं या दोन्ही गोष्टी आयुष्यात सुखी होण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे ते मला माझ्या कामाने शिकवले. निखिलबरोबर भांडत बसण्यापेक्षा त्याला कौतुकाचा मी एक फोन केला नसता तर कदाचित आज आम्ही एकत्र नसतो. त्यामुळे त्या एका फोनमुळे माझं आयुष्य बदलून गेलं आणि निखिलसारखा एक खूप समंजस जोडीदार मला मिळाला ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.

श्रेया सध्या चला हवा येऊ द्या कॉमेडी शो मध्ये काम करत आहे. त्यासोबतच तू तिथे मी या मालिकेत श्रेयाची भूमिका विशेष लक्षात राहण्यासारखी होती. याशिवाय तिने काही वेबसिरीज लघुपट आणि मालिकांमध्येही काम केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER