बालगुन्हेगार ठरल्याने ३५ वर्षांनी जन्मठेप रद्द

SC

नवी दिल्ली: खून केला तेव्हा आरोपी अल्पवयीन होता हे सिद्ध झाल्याने त्याला ३५ वर्षांपूर्वी ठोठावण्यात आलेली जन्मठेप सर्वोच्च न्यायालयाने (SC)रद्द केली.

उत्तर प्रदेशच्या आझमगढ जिल्ह्यातील योगेंद्र यादव (Yogendra Yadav) या इसमास तेथील सत्र न्यायालयाने सन १९८५ मध्ये खुुनाबद्दल जन्मठेप ठोठावली होती. त्याविरुद्ध योगेंद्रने केलेले अपील अलाहाबाद उच्च न्यायालयाने २४ वर्षांनी म्हणजे मार्च २०१९ मध्ये फेटाळले.

योगेंद्रने सर्वोच्च न्यायालयात अपील केले आणि खून केला तेव्हा आपण अल्पवयीन होतो हा मुद्दा प्रथमच घेतला. योगेंद्रच्या या दाव्याची शहानिशा करण्याचे काम आझमगढच्या जिल्हा न्यायाधीशांवर सोपविले. त्यांनी योगेंद्रचा जन्माचा दाखला व शाळेचा दाखला इत्यादींची तपासणी करून असा अहवाल दिला की, त्याची जन्मतारीख १ जुलै १९६६ अशी असून खून झाला त्या दिवशी (१ आॅगस्ट, १९८३) त्याचे वय १७ वर्षे एक महिना होते. म्हणजेच तो त्या दिवशी कायद्यानुसार अल्पवयीन होता.

न्या. अशोक भूषण, न्या.आर. सुभाष रेड्डी व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने हा अहवाल विचारात घेतला आणि योगेंद्रला खुनाच्या आरोपातून निर्दोष ठरवून त्याची जन्मठेप रद्द केली. मूळ घटनेला ३७ वर्षे उलटून गेली असल्याने बालगुन्हेगार कायद्यानुसार योगेंद्रवर खटला चालविण्यासाठी हे प्रकरण पुन्हा बाल गुन्हेगार न्यायालयाकडे पाठविणे योग्य होणार नाही, असे खंडपीठाने नमूद केले.

अशा प्रकारे वयाच्या १७ व्या वर्षी केलेल्या खुनातून योगेंद्र आता वयाच्या ५४ व्या वर्षी पूर्णपणे मुक्त झाला आहे. अटक झाल्यावर जामीन मिळेपर्यंत सुरुवातीस त्याने दोन वर्षे कच्चा कैदी म्हणुून तुरुंगवास बोगला होता. त्यानंतर आताचा हा निकाल होईपर्यंत तो सलग जामिनावर होता.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER