सुधीर गाडगीळ यांची ‘जीवनसाधना’

Shailendra Paranjapeसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं विविध क्षेत्रांत अमूल्य योगदान दिल्याबद्दल सहा धुरिणांचा जीवनसाधना गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्याचं जाहीर केलंय. विद्यापीठाच्या वर्धापनदिनाला बुधवारी सकाळी होणाऱ्या समारंभात या सहा जणांचा गौरव केला जाणार आहे. बेभरवशाच्या क्षेत्रात पंचेचाळीस वर्षांपूर्वी कारकीर्द करून एक नवं  क्षेत्रं मराठी तरुणांसाठी खुलं करणारे ज्येष्ठ निवेदक-मुलाखतकार सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil) यांचाही या सहा जाणांमधे समावेश आहे. त्याबद्दल विद्यापीठाच्या निवड समितीचे आणि एकूणच विद्यापीठाचं अभिनंदन करायला हवं.

विद्यापीठानं यापूर्वी विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांना सन्मानित केलंय. पण सुधीर गाडगिळांचं निवेदनाचं मुलाखतकार या पेशाचं तसं कौतुक अधिकृत सरकारी पातळीवर केलं गेलेलं नाही. वास्तविक, कोणतीही पूर्ण वेळ नोकरी न करता निवेदन आणि मुलाखती घेणं, या गोष्टींवरच कारकीर्द करण्याचा निर्णय सुधीर गाडगीळ यांनी ऐंशीच्या दशकात घेतला.  तेव्हा त्यांच्या हातात बँक ऑफ महाराष्ट्र या राष्टीयीकृत बँकेचं नेमणूकपत्रं होतं आणि घरापासून चालत अक्षरशः पाच मिनिटांच्या अंतरावरच्या जनमंगल या मुख्यालयात त्यांची नेमणूक झालेली होती. असं असूनही दरमहा निश्चित पगार मिळणारी नोकरी नाकारून गाडगीळ यांनी बेभरवशाचं कोणतीही मळलेली, रुळलेली पायवाटही नसलेलं निवेदनाचं क्षेत्र निवडलं; कारण त्यांना ते आवडत होतं. त्याहीपेक्षा मोठं कारण म्हणजे त्यांच्या पत्नीनं त्यांना जे आवडतं ते कर, असं सांगून सुयोग्य साथ दिली.

बालपण सदाशिव पेठेत गेलेलं, नूमविसारखी शाळा, बीएमसीसीसारखं महाविद्यालय आणि कॉस्टिंगसारखं शिक्षण घेतलेला हा तरुण महाविद्यालयाच्या गॅदरिंगच्या निमित्ताने निवेदनाच्या क्षेत्रात आला. निवेदन, नाटकात हौशी अभिनेता म्हणून काम करताना चक्क नाना पाटेकर यांच्याबरोबर अभिनय करताना सुधीर गाडगिळांना अभिनयाचा पुरस्कार मिळाला होता, हे कमी लोकांना माहीत असेल. पण लेखकाचे म्हणजे दुसऱ्या कोणी तरी लिहिलेले लोकांसमोर म्हणून दाखवण्यापेक्षा मी माझंच बोलेन, या निर्धाराने गाडगीळ निवेदनाच्या क्षेत्रात मुलाखतकाराच्या पेशात स्थिरावले ते पत्रकारितेच्या रस्त्याने.

पत्रकारिता करताना आकाशवाणीच्या प्रादेशिक बातम्या देणारे सुधीर गाडगीळ अनंतराव पाटलांच्या सह्याद्रीमध्येही काम करत. तेथे त्यांच्याबरोबर अर्धवेळ क्रीडा वार्ताहर म्हणून माजी मंत्री रामकृष्ण मोरे काम करत. दिवंगत पत्रकार वरुणराज भिडे हे तेव्हाचे सहकारी गाडगीळ यांच्या घराजवळच राहायचे. त्यांच्यामुळे विविध विषयांत रस घेणं, वेगवेगळ्या लोकांना भेटणं, विविध विषय हाताळणं या साऱ्याची आणि उचापतीही करण्याची खोड गाडगिळांना लागली. एक मुखवटा घालून भल्याभल्यांना त्यांचं लेखी भविष्य सांगून त्यांची होणारी त्रेधातिरपीट बघणं, हा वरुणराज भिडे आणि गाडगीळ यांचा काही काळ चाललेला छंद होता, हे सांगितलं तर अनेकांना आश्चर्य वाटेल.

‘साप्ताहिक मनोहर’ हे १९७३ मध्ये  स्थापन झालेलं किर्लोस्करांचं साप्ताहिक म्हणजे त्या दशकात तरुणाईचा आवाज होतं आणि त्याचा खप लाखाच्या वर गेलेला होता. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सर्वाधिक लोकप्रिय पत्रकार देवयानी चौबळ यांच्या ‘चंदेरी च्युइंगम’ या साप्ताहिक सदरामुळे हे साप्ताहिक लोकप्रियतेच्या शिखरावर होते आणि चौबळ यांना मुंबईत भेटून, त्यांच्याबरोबर अनेक फिल्मी पार्ट्या आणि समारंभांना जाऊन चौबळ यांचा स्तंभ गाडगीळ लिहायचे. राजेश खन्ना आणि डिंपल यांचा साखरपुडा ही बातमी मराठी दैनिकांच्याही आधी मनोहर साप्ताहिकात छायाचित्रासह प्रकाशित झाली ती देवयानी चौबळ आणि गाडगीळ यांच्यामुळे. काँग्रेसचे नेते उल्हास पवार यांनी ‘चंदेरी च्युइंगम’ हे सदर यशवंतराव चव्हाण यांनाही माहीत होतं, असं आजच गाडगीळांसह रंगलेल्या गप्पांमध्ये सांगितलं.

गाडगीळ यांनी केलेले ‘मंतरलेल्या चैत्रबना’त या गाजलेल्या कार्यक्रमाचे निवेदन, त्यातून गाण्याची साद्यंत मिळणारी माहिती, गाण्याच्या वेळी घडलेले प्रसंग, किस्से हे सारं निवेदनात येऊ लागलं आणि रंजक निवेदनाची नवी वाट निर्माण करत ती गाडगीळ यांनीच प्रशस्त केली. त्यांनी पंडित भीमसेन जोशी यांच्या संतवाणीसाठीही शंभरहून अधिक कार्यक्रमात अभंगापूर्वीचे निवेदन केले आहे. जाहीर मुलाखती हा तर गाडगीळ यांचा हातखंडा. चार हजारांच्या आसपास मुलाखती आणि त्यात जवळपास गेल्या चार पिढ्यांमधले जीवनाच्या सर्व क्षेत्रांतले मान्यवर गीडगीळांनी मुलाखतीतून लोकांपर्यंत पोहचवले आहेत.

गाडगीळ यांनी मोजक्या चित्रपटांतही कामं केलीत; पण ती अगदी मोजक्या आणि भूमिकाही पत्रकाराची किंवा सुधीर गाडगीळांचीच. फावल्या वेळात त्यांनी स्वाक्षरीवरून माणसाचं भविष्य सांगण्यासंदर्भातला अभ्यासही केलाय. ते करिकेचर्सही रेखाटतात. पुण्यभूषण या मानाच्या पुरस्कारासह पन्नासहून जास्ती पुरस्कार त्यांना मिळेले आहेत. पण मुलाखती, निवेदन, दूरदर्शनच्या अगदी सुरुवातीच्या काळात ‘मुलखावेगळी माणसं’ आणि ‘आमची पंचविशी’ अशा सुपरहिट मालिका दूरदर्शनाला देऊन १९७५ च्या काळातच सेलेब्रिटी झालेल्या या ज्येष्ठ मित्राला जीवनसाधना गौरव पुरस्कार मिळतोय, तोही सावित्रीबाई
फुले विद्यापीठाकडून. त्याबद्दल त्याचे अभिनंदन.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER