मित्राचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

Murder

कोल्हापूर : उसने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून मित्राचा खून केलेला आरोपी रोहन बाबूराव काटाळे (३० रा. मोहिते कॉलनी) याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या शिक्षेसह पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. नागलकर यांच्या कोर्टासमोर सुनावणी झाली.

आज आणि उद्या मुख्यमंत्री ठाकरे कोल्हापुरात

सरकारी अभियोक्ता मंजुषा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहन आणि मृत अभिजित बाबूराव रावळ (वय २५, रा. गंगावेश) हे दोघेही आचारी काम करीत होते. रावळ याच्या मध्यस्थीने रोहन काटाळे याला काम मिळाले होते. त्यावेळी त्याने अंतरा ढवळे यांच्याकडून सात हजार रुपये परत देण्याच्या बोलीवर उसने घेतले होते. मात्र, त्यानंतर आरोपी कामावर आला नाही. पैसेही परत केले नाहीत.

७ जुलै २०१५ रोजी रावळ यांनी त्याच्याकडे पैसे मागितले असता त्याने टपरीचे लाकडी दांडके रावळ यांच्या डोक्यात मारल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे १८ साक्षीदार तपासण्यात आले.