मॅजिक ऑफ टायडींग अप !

अनुजाला फोन केला की, त्यांची नेहमी जेवण आटोपलेली असतात आणि आणि ती मुलाचा होमवर्क घेत असते. दिवसभराच्या हेक्टिक शेड्युलमुळे ती थकलेली असते. पुन्हा उद्याची तयारीही करायची असते. त्यामुळे तिला केव्हा फोन करायचा कळतच नाही. बहुदा मुंबईचे लोकांच्या दिनचऱ्येत, एक प्रकारचा तोचतोचपणा येतो. हा तोचतोचपणा खरं तर आजकाल प्रत्येकाच्या आयुष्याला खूप व्यापून उरला आहे. बरेचदा आपल्या आजूबाजूचे अनेक लोक देखील हीच तक्रार करताना दिसतात. आयुष्य (Life) खूप बिझी यांत्रिक आणि गुंतागुंतीचं झालं आहे. ही खरी गोष्ट आहे आणि ही गोष्ट आपण प्रत्येकजण अनुभवतो आहोत! तेच तेच रुटीन व्यस्तत्याने पार पाडतो. कालच्या दिवसासारखाच आजचा दिवस असतो. त्यात नवीन कशाला जागाच नसल्यामुळे, बरेचदा उदास पण वाटतं. मात्र तरीही प्रत्येक जण त्यांचे त्यांचे रुटीन काम अतिशय काटेकोरपणे अतिशय आशा-अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षा बाळगून करीत असतात. एकीकडे त्यातून खूप अर्थपूर्ण आणि आनंददायी आयुष्य त्यांना मिळेल अशी भविष्याची स्वप्न पहात, आशा बाळगून असतात. त्याच वेळेला ते एकीकडे सरधोपट, एंडलेस अशा आयुष्याला दोष पण देताना दिसतात. त्यामुळे त्यांना आणि फावला वेळ म्हणून मिळत नाही, आवडी-निवडीना जागा राहत नाही, त्यांच्या दृष्टीने ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, म्हणजेच घरातले लोक, जोडीदार मुले, यांना वेळ देता येत नाही अशी तक्रारही ते नेहमी करत असतात.

आपल्याला आयुष्यात काय हवें आहे? त्याची खरंच गरज आहे का ? याचा विचार न करता उर फुटेस्तोवर धावत राहणे एवढेच घडते. मग उपाय काय? ही जगरहाटी आहे, चालायचंच ! असं म्हणून कसं चालेल? आपण जर आपल्या आयुष्याकडे नीट खोलवर डोकावून बघितलं तर लक्षात येतं की आम्ही आम्हाला असणाऱ्या गरजे पलीकडच्या अनेक गोष्टी गोळा केल्या आहेत .अनेकदा आपण आपल्या दृष्टीने बिन महत्त्वाच्या गोष्टींची कमिटमेंट देखील कुणाला तरी देऊन ठेवलेली असते .ती केवळ आपल्या दृष्टीने कमी महत्त्वाची असते एवढेच नाही तर ती शक्य देखील नसते, ज्यापासून काही फायदा नसतो. आयुष्यामध्ये इच्छा, गरजा हा तर कधीही न संपणारा भाग आहे .त्याचप्रमाणे इतरांच्या आपल्याकडून आणि आपल्या इतरांकडून असलेल्या अपेक्षांची बांडगुळ आपण वाढवतच ठेवतो आणि मग त्याचं ओझं होऊ लागतं. कधीही पूर्ण होऊ न शकणाऱ्या इच्छा किंवा ध्येय आपण ठरवत राहतो. वास्तविक कुठलीही इच्छा किंवा ध्येय ठरवतानाच ते तितकच उंच ठेवाव कि जे आपल्या आटोक्यात आहे. उगीचच शेखचिल्लीची स्वप्न बघणं अयोग्यच !

फ्रेंडस् ! एखाद्या क्षणाला या सगळ्याचा विचार व्हायलाच हवा की आम्ही नेमकी कुठे जातो आहोत ? याचा विचार करायला वेळ नाही कुणाकडे ! अगदी आम्ही कोण आहोत? माझी नेमकी उत्कट इच्छा काय आहे आहे ?मला काय हव आहे ? हे तर समजायला हवं. जरूर वेळ काढा यासाठी ! जग धावतंय म्हणून मी धावतोय / धावतेय. ऊर फुटेस्तोवर ! पण कुठे? का? हे ना मला माहित, ना जगाला !

मध्यंतरी एक छान पोस्ट वाचनात आली .आयुष्यातले सगळेच झोके उंच जायला हवेत हे जरुरी नाही. ज्याचा त्याचा झोका, प्रत्येकाचा झोका वेगळा ! त्याची उंची किती हवी हा ज्याचा त्याचा प्रश्न. दुसऱ्यांनी का ठरवावा? आणि आपणही तो दुसऱ्यांना का ठरवू द्यावा !

मध्यंतरी कोणी एकाने, कलाकाराला प्रश्न विचारला. “भल्या भल्या प्रस्थापितांच्या तोंडात मारेल अशी अप्रतिम गायकी पण तरीही कुठल्याही झगमगाटी दुनियेत हे नाव मी फारसं कधी ऐकलं नाही, असं का ? तुम्ही थोडा प्रयत्न केला असता तर आज कुठल्या कुठे असता ! कोणी अडवलं होतं तुम्हाला ?” यावर त्या गायका ने सुंदर उत्तर दिलं होतं. “मला ना कोणासारखं तरी बनायचं आणि गायचं ही नाहीये. मला मानसन्मान नकोत. मी फक्त स्वांतसुखाय गातो. माझ्यासाठी गाणं ही देवाची पूजा आहे आणि तुम्हाला खोटं वाटेल पण माझ्या इतका आनंदी माणूस तुम्हाला खरंच सापडणार नाही. “ते शांत हसत म्हणाले.

माझी आई आयुष्यभर निगुतीने, मायेने आणि कठीण परिस्थितीतही हसतमुखाने संसार करणारी. तिने केलेले सुंदर भरत काम प्रसिद्ध होते. ओळखीची मंडळी येत आणि ते मागून मागून नेत. सगळ्या कामाच्या धबडग्यात कसाबसा वेळ काढून ती ते विणायची. तो तिचा झुला होता ,तो कुठेही उंच उडाला नाही. आणि तो उंच उडवावा असं तिला कधी वाटलं नाही. खरंच हा अट्टाहास का?

हा आनंद आपल्याला परत मिळवायचा असेल, तर खूप सोपा आहे. आपल्याला फक्त आपल्या आयुष्याची पुनर्रचना करायची आहे. आपले आयुष्य साधे सरळ बनवायचे आहे. सध्याच्या गुंतागुंतीच्या जगण्यातून थोडी माघार घ्यायची आहे.

फ्रेंड्स !माझ्या आयुष्यात ज्यामुळे गोंधळ गडबड होतो ,ज्या गोष्टींची अतिरेकी गर्दी होते, त्यामुळे माझ्या आयुष्यात अव्यवस्थितपणा येतो. योग्य नियोजन होत नाही आणि मग सगळाच गोंधळ होतो. अशा सगळ्याच गोष्टी मला प्रथम दूर करायच्या आहेत .एवढे नुसती कल्पना जरी केली तरी किती छान हलकं वाटेल. आपल्याला कल्पनाही येणार नाही इतका गोंधळ आपल्या आयुष्यात आपणच निर्माण करून ठेवलेला असतो.

उद्या मी कोणते कपडे घालू? ऑफिसला? किंवा उद्याच्या फंक्शनसाठी ? अरेरे ! मग यावर हा दुपट्टा येत नाही, त्यावर तो टॉप मॅचिंग होत नाही. अगदी संध्याकाळला भाजीला काय करायचं ?पाहुणे येणार आहेत. त्यांच्या साठी लागणाऱ्या वस्तू घरात आहेत का? सगळ्या चटण्या मध्ये ठेवायचे छोटे चमचे दिसतच नाही आहे. वेळ खूप कमी उरला आहे. हा सगळा गोंधळ होतानाच कामाचे ओव्हरलोड झाले की वस्तू कुठे ठेवल्या? मोबाईल, गॉगल, किल्ल्या! कुणी नेमकं काय सांगितलं ? अशा बारीक बारीक गोष्टींचा विसर पडतो. उत्तम संवाद कौशल्य असूनही योग्य पद्धतीने मांडता येत नाही .कारण विचारांचा झालेला गोंधळ !

तुम्ही म्हणाल हे सगळं करायचं ? एवढा पसारा आवरायचा काय सोपी गोष्ट आहे का? असंख्य प्रकारचे कागद, डायरी, कपडे, वस्तू हे आवरायचं म्हणजे अवघडच ! मलासुद्धा याचे खूप दडपण येत असे. खरोखरच हे काम खूप नाउमेद करणार आणि थकवणार आहेच मुळी ! खरं तर कुठून सुरुवात करू आणि कुठे संपवू असंही होतं बघा ! मग ही अशी वेळखाऊ गोष्ट करायची कशी ?

मला स्वतःला विचार करताना काही युक्त्या सापडल्या. त्याच बरोबर मेरीकोंडो Marie Kondo या लेखिकेचे एक सुंदर पुस्तक माझ्या वाचनात आलं.”Life changing magic of tidying up .”या नावाचं. या पुस्तकात अगदी कपड्यांपासून ,स्वयंपाक घरातील प्रत्येक वस्तू म्हणजे थोडक्यात “पसारा”कसा मॅनेज करायचा याबद्दल सुंदर टीप्स दिल्या आहेत .अगदी कपड्यांच्या घड्या कशा घालायच्या इथपर्यंत. त्याचा मला चांगला उपयोग झाला.

परंतु मी म्हणेल दिवसातला काहीएक वेळ ठरवून म्हणजे पंधरा मिनिटात किंवा अर्धा तास या गोष्टीसाठी राखून ठेवायचा. एका कोणत्याही गोष्टीपासून सुरुवात करायची, मग ती कुठलीही असेल आपल्या कपड्यांचे कपाट किंवा स्वयंपाक घरातील क्रोकरीचे कपाट, ड्रॉवर, सगळ्यांचे आत्तापर्यंतचे मेडिकल्स रिपोर्ट, विज बिल, इतर महत्वाची कागदपत्र जुन्या-नव्या चादरी पांघरून, चप्पल्स शिवला चा डब्बा एवढेच काय ,आपला सेल फोन सुद्धा ! एवढी प्रचंड अडगळ असते त्यात आपण साठवलेली. पण हवे तेव्हा, हवे ते मिळतच नाही . मग काय उपयोग !

अशा प्रत्येक वस्तू ला विचारा की त्याची खरंच गरज आहे का ? ही नेहमी उपयोगात येते का? या वर्षभरात एकदा तरी ती वापरली गेली का? भविष्यामध्ये वापरण्याची खूप शक्यता आहे का? किंवा त्याला भावनेच्या दृष्टीने काही विशेष मूल्य आहे का ? आणि या कुठल्याही वर्गवारीत न बसणारी वस्तू योग्य प्रकारे reuse किंवा दान करायची अथवा डिलीट करायची. आणि आणि आपण यासाठी जो वेळ ठरवला आहे ,त्याच वेळी दुसऱ्या दिवशी परत ठरवलेला वेळ केवळ या गोष्टीसाठी द्यायचा. आपोआपच सभोवतालच्या गोष्टीच काय तर आपल्या आतल्या जगातही खूप सकारात्मक बदल जाणवेल.

जी गोष्ट बाहेरील पसाऱ्याची,तीच मनातल्या अडगळीची ! आयुष्यात संतुष्ट, परिपूर्ण, समाधानी जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर पहिल्यांदा स्वतःला आणि आजूबाजूच्या परिसराला अस रिक्त आणि हलके करावा लागेल , मग यात वासना ,विकार ,हव्यास या सगळ्यांपासून विचारपूर्वक दूर होऊन मनाचे कोपरे अन् कोपरे मोकळे केले जातील आणि आनंद प्रेम सौख्य आणि समाधान गोळा करता येईल. मग त्यात जागा असेल आपल्या आवडी निवडीना ,छंदांना ,आपल्या जवळच्या माणसांना !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

ही बातमी पण वाचा : टोकाचे नैराश्य, सुसाईड आणि कलंक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER