जेष्ठमध – गोड चवीची वनस्पती !

जेष्ठमध किंवा मधुयष्टी याच्या गोड काड्यांचा वापर आपण मुखवासात करीत असतो. जेष्ठमधाची पूड बारीक केलेल्या गोड सुपारीत वापरतात. जेष्ठमध सहजरित्या उपलब्ध होते. जेष्ठमध गोड रसाची असते. याला मधुक असे सुद्धा म्हणतात. आयुर्वेद शास्त्रात बऱ्याच ठिकाणी जेष्ठमधाचा वापर औषध रुपात वापर केला आहे. पाचनाचे विकार असो वा श्वसनाचे, सर्दी खोकला आवाज बसणे अशा विविध विकारात जेष्ठमधाचा तुकडा अथवा चूर्ण चघळल्यास फायदा होतो. मळमळ किंवा पित्तामुळे वांती होत असेल तर जेष्ठमधाचा काढा वारंवार थोडा थोडा देत राहावा. छातीत होणारी जळजळ पित्ताचे ढेकर येणे यामुळे कमी होते.

जेष्ठमध केसांच्या सर्व तक्रारींवर उत्तम कार्य करते. केस गळणे किंवा केस पिकणे या तक्रारींवर जेष्ठमधाच्या काढ्याने केस धुण्याकरीता वापर करावा. जखम होणे अथवा व्रण असल्यास जेष्ठमधाचा तूपासह मलमा प्रमाणे वापर केल्यास जखम लवकर बरी होते. जेष्ठमध स्वर चांगला होण्याकरीता उत्तम कार्य करते. जे गायन क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात किंवा ज्यांना खूप बोलावे लागते त्यांना स्वर चांगला राहण्याकरीता जेष्ठमधाचा तुकडा चघळावा.

छातीत कफ भरणे, खोकला, खोकला येऊनही कफ बाहेर न पडणे यासारख्या तक्रारींवर जेष्ठमध मधासह चाटण स्वरूपात घेतल्यास कफ पातळ होऊन बाहेर पडतो. जेष्ठमध छातीला बल देणारे असल्याने खोकला दमा यामुळे छाती दुखणे बरगड्यामधे वेदना ही लक्षणे दूर होतात जेष्ठमध अंगातील वाढलेली उष्णता कमी करणारे आहे. जेष्ठमध दूधात उकळवून घेणे किंवा जेष्ठमधाचा भिजविलेले पाणी पिणे शरीरातील उष्णता कमी करते. जेष्ठमध वर्ण उजळविणारे औषध आहे. लेपांमधे याचा वापर करून उटणे स्वरूपात वापरल्यास त्वचेचा वर्ण सुधारतो. मसूर पीठ जेष्ठमध कचोरा दूधासह एकत्रित केलेले मिश्रण त्वचेला तजेला देणारे डाग दूर करणारे तसेच कांती सुधारणारे आहे.

जेष्ठमध धातुक्षय दूर करणारे असून जेष्ठमध तूप यांचे मिश्रण दुधासह घेतल्यास शुक्रवृद्धी होते. जेष्ठमध डोळ्यांच्या मांसपेशींना बल देणारे आहे. त्यामुळे डोळ्यांची ताकद दृष्टी चांगली राहण्याकरीता जेष्ठमध उत्तम कार्य करते. दाह कमी करणारे पित्त कमी करणारे असल्याने पिवळ्या रंगाची मूत्र प्रवृत्ती होणे, आग होणे अशा तक्रारींवर जेष्ठमध चूर्ण अथवा जेष्ठमधाचा काढा पित्त कमी करून दाहशमन करतो. जेष्ठमधाचा वापर अनेक औषधी कल्पात करण्यात येतो. यष्टीघृत यष्टीतेल, लवंगादि चूर्ण अशी अनेक औषधी निर्माण जेष्ठमधापासून बनतात.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER