स्थानिकांच्या तक्रारीनंतर खेडमधील दोन रेशन दुकानदारांचा परवाना रद्द

रत्नागिरी/प्रतिनिधी :- रेशन दुकाने चालवताना शासनमान्य नियमांना धरून न चालवल्यामुळे खेड तालुक्‍यातील दोन स्वस्त धान्य दुकानदारांचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली.

रेशनकार्ड धारकांना धान्य कमी वाटप करणे, वाटपाच्या नोंदी न ठेवणे, कार्डधारकांशी उद्धट वागणे यासारख्या कार्डधारकांच्या व स्थानिक नागरिकांच्या तक्रारी व प्रत्यक्ष स्थळपाहणी करून ही कारवाई करण्यात आली आहे. पांगरी येथील संभाजी बाजीराव तळेकर, वडगाव घेनंद येथील संपत बाबुराव बवले यांच्या सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात रेशनधारकांना शासनाने दिलेल्या साठ्यापेक्षा कमी धान्य देण्यात येत होते. आलेल्या धान्याची व वाटप धान्याची नोंद ठेवली जात नव्हती. भाव फलकावर भाव लिहिले जात नव्हते, स्टॉक पत्रक भरले जात नव्हते आणि आलेल्या रेशनकार्ड धारकांशी उद्धट बोलले जात असल्याच्या अनेक तक्रारी तालुका पुरवठा विभाग व तहसीलदार यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार मंडलधिकारी, पुरवठा अधिकारी तलाठी आणि तहसीलदार यांनी या ठिकाणी भेटी देऊन संबंधित दुकानदारांची कानउघाडणी केली होती; मात्र त्यात बदल होत नसल्याने या दोन दुकानदारांचा तात्पुरता परवाना रद्द करण्यात आला आहे. पुढील कारवाईचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्याकडे पाठविण्यात आला असून त्यानंतर या दुकानांवर मोठी कारवाई केली जाणार आहे.