चिमणीसंगे बोलू काही….!

चिमणीसंगे बोलू काही

चिमणी ……!
माझ्या अंगणातली मैत्रीण, दूर गेली माझ्यापासून,
तिचा चिवचिवाट ,किलबिलाट आजही आठवतो कानी !
काहीतरी बोलत होती माझ्याशी, काहीतरी सांगायचे होते तिला मला.
आता करमेना मला तुझ्याशिवाय ! माणूस झाला शत्रू तिचा, त्यात वाटा होता माझा सुद्धा !
अंगणात दाणे पसरले आहेत तुझ्यासाठी , वाट पहात आहे पून्हा तुझ्या येण्याची !

प्रिय चिऊ ,
खरच खूप शोधते मी आत्ताच्या माझ्या घरात तुला. तुझी आठवण तुझ्यासह मला घेऊन जाते त्या माझ्या बालपणीच्या अंगणात ! आई चिऊ काऊचा घास भरवायची ते नाही आठवतय मला. पण मला समजू लागलं, तेव्हापासून कौलारू घराच्या व्हरांड्या वरच्या वळचणीला नेहमी तुझी घरटी असायची.. सारखा छोटासा कापूस, दोरे ,कुठे लोकरीचे तुकडे, तर कुठे छोटी कापड गवताच्या काड्या घेऊन हे काम अखंड चालू असायचं आणि सोबतीला दिवसभर अक्षरशः चिवचिवाट ! एखादी सोसायटी उभी करायचे म्हणा ना तुम्ही !कारण तिथे मुळी सुद्धा धोका नव्हता. त्यामुळे हळूहळू तुमची भाषा समजायला लागली होती मला .एका विशिष्ट प्रकारचा चिवचिवाट झाला ना, की नक्कीच मांजर आलेली असायची .तुम्ही अगदी एकमेकींना पटापट निरोप सांगून सावध करायच्या. हा चिवचिवाट आणि गोंधळाच्या पार्श्वसंगीतावरच माझा अभ्यास चालत असे. त्याचा डिस्टर्बन्स वगैरे नव्हता होत. कारण इतर अनेक गोष्टींबरोबर या चिमण्या हा जीवनाचा एक भाग होता अगदी लहानपणापासून !

आणखीन एक वेगळा, विचित्र प्रकार आठवतो, तेव्हा हातावर मेहंदी ची पाने वाटून मेहंदी लावायचो आम्ही. मग पाने आणायची, वाटायची, पाट्यावर आणि नंतर हातावर हवे असेल त्या प्रकारे हरभऱ्याची डाळ रचना करून मांडायची. त्यावर हि मेंदी थापायची .वरुन एक फडकं बांधायचे. उद्देश हा की त्या हरभऱ्याच्या डाळी खाली कोरी जागा हातावर राहून नक्षी उमटायची. त्या मेहंदी ला चांगली रंग यावे म्हणून एक फॉर्म्युला होता .त्यात चिमणीची ” शी ” गोळा करून टाकायची. त्यामुळे म्हणे मेहंदी सुंदर रंगत होती.

हळू हळू गळ्याला काळसर रंग असलेला चिमणा हे कळू लागलं .त्याचा चिमणी मनवण्याचा”,पटवण्याचा” खेळ मजेदार होता, पाऊस पडून गेल्यावर पागोळ्या गळायच्या. त्याखाली चिमण्या थुई थुई नाचत सचैल स्नान करायच्या .पागोळ्या गळतील तिथे खड्डा झालेला असायचा. जणू तो त्यांच्यासाठी केलेला स्विमिंग पूल किंवा परियोन का तालाब असायचा! त्या ऐटीत ,या चिमण्या तेथे आंघोळ करून मग पंख फडफडवून कोरडे करत. हळू हळू मग दादा आणि ताई ची मुलं सांभाळताना,” चल, चल ! चिऊताई दाखवते!” असं म्हणून आयांना चिकटून बसलेली भाचरे विचलित करून भूर् नेण सोपं झालं.

हळूहळू मी मोठी होत गेले. स्वतःला जसा राग ,लोभ ,मत्सर समजायला लागला, तसेच ते चिऊताई तुझेही असतात, हेही कळू लागलं. छोट्याशा, गोडूल्या मेंदूमुळे प्रतिबिंबालाच दुसरी चिमणी समजून तिच्याशी भांडताना आम्ही तुला कितीदा बघितलं. पुढे ही कविता अभ्यासाला आली,”आरसा टांगलाय भिंतीला, चिमणी पाहे सवतीला”अशी काहीशी होती ती !

काही काळानंतर माहेर सोडायची वेळ आली. पण त्यावेळी शहरात अगदीच चिमण्या नव्हत्या असं नाही. हाऊसस्परोज हा माणसाच्या अगदी जवळ राहणारा पक्षी आहे .हा गेल्या तीस वर्षांमध्ये मुंबईसारख्या शहरात तो दहा ते वीस टक्के इतकाच दिसतो. चिमण्या गायब होण्याचे,एक म्हणजे वाढते मोबाईल टॉवर, आणि डिशऑंटीने ही कारणे गृहीत धरली जातात. परंतु शहरात कमी होणारे मातीचं प्रमाणही याला कारणीभूत असल्याची माहिती कळली आहे. आठवणीत आधी सांगितल्याप्रमाणे पावसाच्या पागोळ्यांमध्ये त्या आंघोळ करतात, त्याचप्रमाणे मातीमध्ये सुद्धा चिमण्या ‘मड बाथ’ घेतात.

अक्षरश: मातीत बसून पंख फडफडवत खड्डा करून माती अंगावर घेतात हे मी स्वतः बघितला आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरावरील जिवाणू मातीत मिसळून त्यांना त्वचा रोगाची भीती राहत नाही. त्यांना अन्नपचनासाठी मातीतील खड्यांची ही गरज असते धान्य सोबत ते खडेही खातात. कॉंक्रिटीकरण झालेल्या जंगलामध्ये माती व खडे काहीच मिळत नाही. चिमण्या आपल्या पंखाखाली मुंग्यांना चिरडतात. अन्नधान्यावरही फवारणी केल्यामुळे त्यांच्या पोटात ही औषधे जात असल्याने त्या शहरापासून दूर गेल्या. हिरव्या पांढऱ्या फिकट रंगाची ही तपकिरी ठिपके असलेली चिऊताई चार ते पाच अंडी घालते. नर आणि मादी दोघे मिळून घर बांधतात, अंडी उबवतात, पिलांना खाऊ घालतात.

खरंच मला आठवतं आहे की खूप सुंदर सोहळा असायचा हा ! घरट्यातून तीन-चार चिमण्या चोचींचा चिवचिवाट, आणि पिलांना खाऊ घालण्यासाठी, चिमणा चिमणीची लगबग खूप मोहक असायची.

प्रिय चिऊ, नंतर माझी स्वतःची अशी लगबग सुरु झाली ग. माझ्या बाळांचे बाबा कामावर गेले की त्यांना खाऊ घालने, आंघोळ घालणे, खेळवणे, जोजवणे सुरू झाले माझे ! असच कामात असताना दुसरी काम समोर यायची, आणि थांब ! माझ्या बाळाला पावडर लावू दे, तीटी लाऊ दे ! असं करताना माझी लगबग व्हायची. आणि त्यांना भरवताना मात्र नेमकी तुझी आठवण यायची. पण तुही यायचीस ग तेव्हा ! एखादा घास तरी खाऊन जायचीस. आणि तेवढ्या तुझ्या येण्यावर माझी बाळ छान जेवायची. पुढे झोपवताना, बोलायला शिकवतानाही तुझी वर्णी लागलीच.

“चिऊताई चिऊताई, घरटे तुझं सुंदर बाई, अंगणी येतेस, घाईघाई उडत. भुरभुर फार नको, विचार करू हेही घर तुझंच म्हण, आपली मैत्री झाली तशी खेळेल माझं बाळ तुझ्या पिलापाशी “अशी बालगीत मी तुला सोबत घेऊन म्हणू लागले. आणि खेळताना “चिऊ चिऊ ये, काऊ काऊ ये, दाणा खा पाणी पी, भुर sकन उडून जा” दोन्ही हात उंच करून हसत खिदळणारी, खेळणारी मुलं शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी दूर उडून गेली आपापली घरटी बांधायला !
पण प्रिय चिऊ,… तू ?….

तू पण आता भेटतच नाहीस मुळी ! माझ्या घरट्यातल्या चिमण्या बाळांची चिवचिव आता नाहीये ती सुद्धा गेलीय त्यांच्या घरट्यासाठी दोरे, कापूस, लोकरीचे तुकडे जमवायला.

“चिऊ, तुला ते बालगीत आठवतय का ग ?” आपण म्हणायचो बघ बाळांना ! “चिमणीचे घरटे”एकदा एका चिऊचं घरटं हरवत, ती विचारते कावळेदादाला “माझा घरटा पाहिलास बाबा? ” तो नाही म्हणतो. मग ती विचारते कपिला गाईला. ती म्हणते,” अगं मी कसं तुझं घरटं मोडीन ? मीच तर तुला मऊ मऊ गवत दिलं.” शेवटी तिने पोपटाला विचारलं तो म्हणतो “, नाही मी तर नाही बघितलं! पण तू येना माझ्या पिंजऱ्यात मोठा छान पिंजरा आहे देखणा !” पण ती म्हणते, “नको रे बाबा, मला माझं घरटच प्यारे !”

खरंच सांगते चिऊताई, तुझं, माझं घरटं ! किती छान ,आपुलकीने भरलेलं, प्रेमाने न्हायलेल ! पण चिऊ, हीच आपली बाळ आज परदेशाच्या मोहक पिंजऱ्याला, आणि तेथील भौतिक सुखाला बळी पडत आहेत. मेहनत करतात पण सगळी त्या चकचकीत काचेच्या पिंजर्यासाठी. कुठेतरी यातला फोलपणा कळतोय ग ! म्हणूनच त्यांना सांगावस वाटतंय, “या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या, जाहल्या तिन्हीसांजा !”आता खरंच ही पाखरे घरट्यात असावी अस वाटतं आहे. ह s ! आणि मी माझ्या अंगणात शेणाचा सडा घालते, रांगोळी रेखते आणि गाईला गवतही घालते. तुझ्यासाठी भरपूर माती आहे बरं का खेळायला. मग येशील ना तू नक्की ? खेळायला माझ्या अंगणात परत, पहिल्यासारखी ! मग मी नातवंडांना शिकवेल,” चिऊ चिऊ ये ….!!!”

ही बातमी पण वाचा : उंच माझा झोका ग !

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER