चला, बोलू या माणसांविषयी…

Coronavirus - Editorial

Shailendra Paranjapeविज्ञान-तंत्रज्ञानातल्या प्रगतीच्या परिणामस्वरूप मिळालेल्या अनेक फायद्यांबरोबरच अनेक साईड इफेक्टही आपण सगळेच भोगतो आहोत. व्हाट्स अप विद्यापीठ, त्यातल्या खातरजमा न केलेल्या पोस्ट्स आणि एका बोटाच्या फटकाऱ्याने आपणही असं काही तरी, शेकडो-हजारो जणांपर्यंत जायला कारणीभूत ठरत असतो. गेल्या काही दिवसातल्या अशा काही घटना, त्यांचं सोशल मिडियावरचं प्रतिबिंब आणि वस्तुस्थिती हे सारं लक्षात घेतलं की गेल्या लेखातला कै. विद्याधर गोखले यांचा तात्काळ रिअँक्ट न होता, ठंडा करके खाओ, हा संदेश लक्षात घेण्याची गरज प्रकर्षाने जाणवते.

नागपूरमधे गरजू रुग्णासाठी स्वतःचा बेड दोन तासात सोडून चिरंजीव झालेल्या नारायणराव दाभाडकर (Narayanrao Dabhadkar) यांच्यासंदर्भात ते केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असल्याचा उल्लेख आल्याने कमालीचे घृणास्पद राजकारण सोशल मिडियावरही झाले. आपला स्वतःचा अग्रलेख मागे घेणाऱ्या नामांकित वृत्तपत्रानं जबरदस्त सत्यशोधन केल्याचा दावा केला. मुळात वृत्तपत्रीय स्पेस-टाईम मर्यादेत त्यांनी त्यांचे काम केले पण वस्तुनिष्ठता ठेवून कोणत्याही घटनेकडे बघण्याची दृष्टीच आपण गमावत चाललो आहोत, हे या घटनेवरच्या प्रतिक्रियांवरून सहज ध्यानात येते.

रेमडिसिव्हरच्या (Remdesivir) संदर्भात देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे दोघेही विरोधी पक्षनेते पोलीस स्टेशनला गेले, तेव्हाही हेच घडलं. पुण्यामधे सरकारी ससून रुग्णालयात केंद्र सरकारनं पीएम केअर्समधून दिलेली व्हेंटिलेटर्स नादुरुस्त, अशा बातमीमधूनही केंद्र सरकारने आकसाने महाराष्ट्रातल्या सरकारला अशी व्हेन्टिलेटर्स दिली गेल्याचं ध्वनित केलं गेलं होतं. प्रत्यक्षात मात्र मोजकी व्हेंटिलेटर्स किरकोळ तांत्रिक बिघाडातून नादुरुस्त झाली होती, हे स्पष्ट झालंय. स्पष्ट झालंय म्हणजे ज्या वृत्तपत्राने व्हेंटिलेटर्स खराब, अशी बातमी दिली होती, त्याच वृत्तपत्राने प्रशासनाच्या ठिसाळपणामुळे किरकोळ दुरुस्ती करायलाही विलंब झाल्याचं वृत्त दिलंय.

वास्तविक, अशा कोणत्याही बातम्या बहुतांशवेळा सर्वप्रथम झळकतात, त्या टीव्ही वाहिन्यांवरून ब्रेकिंग न्यूज म्हणून. मग त्या वृत्तपत्रातून तपशिलानिशी येतात पण प्रत्येक माध्यमाला त्याच्या म्हणून काही स्पेस-टाईम मर्यादा असतात. त्यात वृत्तपत्रीय लेखनाला लिटरेचर इन अ हरी किंवा घाईघाईत केलेले साहित्यिक लेखन असे म्हटले गेलेले असल्याने वृत्तपत्रातली ही घाई काही चुकांना कारणीभूतही ठरते. त्यामुळे टीव्ही असो की वृत्तपत्रातले पत्रकार, गुणवत्तेला पर्याय नाही, हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होते.

साखर कारखान्यातून प्राणवायूची निर्मिती, या बातमीनंतर हे कसे अवघड आहे, हे सांगणारी बातमी तज्ज्ञांच्या हवाल्याने एका वृत्तपत्राने दिली. तीच गोष्ट मोफत लशीकरणाची. मुळात तार्किक प्रश्न पडणे आणि व्यापक जनहितासाठी ते विचारणे, याचाच विसर पडत चाललाय की काय, अशी शंका येण्यासारखी स्थिती आहे. त्यामुळेच मग टीव्ही असो की वृत्तपत्रे, त्यात स्वतःच्याच आधीच्या वृत्ताला छेद देणाऱ्या बातम्या काही काळानंतर दिसू लागतात आणि वाचक प्रेक्षक कोड्यात पडतात. परिणामी, विश्वासार्हता लयाला जाते.

कोविड केअर सेंटरवरून पुणे महापालिकेमधे कालच एक पुरुष नगरसेवक आणि एक महिला अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. विशेष म्हणजे अतिरिक्त आयुक्तांनी अधिकारी महिलेची बाजू घेतली तर महापौरांनी नगरसेवकाची. दोघांनाही समज देण्यात येऊन प्रकरण संपलेय. पण मुळात नियमबाह्य कोविड सेंटर सुरू आहे, या नगरसेवकाच्या तक्रारीवर काय कारवाई करणार किंवा नगरसेवकाच्या कोविड सेंटर सुरू करण्याच्या विनंतीच्या अर्जावर निर्णय का घेतला नाही, हे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिलेत.

पुण्यात लशीकरण केंद्रावर तीन तास ताटकळत राहिलेल्या ज्येष्ठ नागरिकांची. लशीकरण केंद्रावर अचूक माहिती दिली न गेल्यानं अनेकांना गेल्या दोन तीन दिवसात तीन तीन तास ताटकळून रिकाम्या हातानं घरी परतावं लागलं आहे. पालिकेच्या काही लशीकरण केंद्रांवर बोर्डवरच माहिती लिहिल्याने लोकांची सोय झाली पण काही ठिकाणी ढिसाळ कारभारामुळे लोकांचे विशेषतः वृद्धांचे हाल झाले.

या कोणत्याही प्रकरणात बातम्या येतात, ब्रेकिंग स्टोरी होते, स्पेशल स्टोरी होते पण कारवाई कोणावरच होत नाही. पाठपुरवा करण्याइतका वेळ नाही आणि सरकारी यंत्रणा निर्ढावलेली. त्यामुळे करोनाच्या भीतीच्या छायेत जगताना सामान्यांचे जगणे आणखी दुष्कर होत गेले आहे. त्यातही पालिकेने राज्य सरकारकडे आणि राज्य सरकारने केंद्राकडे बोट दाखवले की झाले…पण केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो की महापालिका अंतिमतः ही सारी व्यवस्था माणूस जगवण्यासाठी आहे, हेच पुन्हा पुन्हा विसरले जाते आहे.

टीव्हीसाठी किंवा पेपरसाठी ती स्टोरी असते आणि सरकारी व्यवस्थेसाठी एक कागद. पण, ज्याच्याविषयी हे सारं आहे ती एक हाडामासाची व्यक्ती आहे आणि तिलाही घरात आईबाप भाऊबहीण मुलंबाळं नातवंडं मित्र असे सारे असतात, हे विसरून चालणार नाही. नेमकं याच गोष्टीचं भान माध्यमे आणि सरकारी यंत्रणा या दोन्हींना येण्याची आज सर्वाधिक गरज आहे.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer: ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button