संदीपच्या वेडेपणावर बोलू काही…

saleel kulkarni and sandeep khare

संगीतकार सलील कुलकर्णी आणि गीतकार संदीप खरे यांचं नाव जोडीनं ऐकलं की आपल्या ओठावर एकच ओळ येते आणि ती म्हणजे- आयुष्यावर बोलू काही… कवितांमधील शब्दांना गाण्याच्या लयीत बांधत या जोडगोळीने एक पर्व साजरं
केलं. सलील आणि संदीपची कवितामय गाणी ऐकत तरुणाईची एक पिढी मोहरली. आयुष्यावर बोलू काही…  असं म्हणत आयुष्यातील अनेक भावविश्वांना शब्दस्वरांनी सजवणारे  सलील जेव्हा त्यांचा  मित्र संदीप खरेच्या वेडेपणावर बोलतात  तेव्हा ते ऐकणंही पर्वणीच. पण त्यासाठी कोणताही नवा कार्यक्रम घेऊन ते येणार नाहीत तर एका मुलाखतीत सलील यांनी  संदीपमधला अवलिया उलगडून दाखवला.खरं तर दोन समान स्वभावाच्या माणसांमध्ये मैत्री जुळते असं म्हणतात.

पण संदीप आणि सलीलने हा नियमच खोटा ठरवला आहे. हे दोघंही दोन टोकाचे अवलिया आहेत. एक सुरांमध्ये माहीर तर दुसरा शब्दांचा सवंगडी. सलील सांगतात, “आपल्याला माणूस म्हणून समाजात वावरताना खूप गोष्टी खुपत असतात. म्हणजे साधंच बघा. पैसे भरून आपण ज्या हॉटेलमध्ये राहतो तिथे प्रत्येक सुविधा मिळाली पाहिजे ही अपेक्षा असते. ती अपेक्षा रास्तही आहे. मग ती सुविधा काही कारणाने किंवा त्यांच्या अडचणीमुळे मिळाली नाही तर संदीप खूप अस्वस्थ होतो.

एरवी  शांत असलेल्या संदीपचा जणू तिसरा डोळा उघडतो. कुठेही जाताना रस्ता खराब असल्याने गाडीत धक्के बसले की सुरुवातीला नाराजी व्यक्त करणारा संदीप थेट व्यवस्थेवरच हल्ला चढवतो. त्याच्या ‘मोर्चा’ कवितेतल्या दगडासारखा तो त्याचा राग भिरकावतो.संदीपचा हा वेडेपणा योग्य असला तरी थोडा नियंत्रणात हवा.” असा सल्लाही सलील त्याला मित्रत्वाच्या नात्याने नेहमी देत असतात. संदीपला जेव्हा एखादी गोष्ट करावीशी वाटते तेव्हाच तो ती करतो. म्हणजे, आपण अनेकदा जेवणाची वेळ झाली म्हणून जेवतो, पण संदीपचे जेवणाच्या वेळेशी काहीही देणंघेणं नसतं.

तो त्याला भूक लागेल तेव्हाच तो जेवतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा आम्ही दौऱ्यावर असतो तेव्हा जेवणाची वेळ झाली की आम्ही गाडी थांबवून जेवतो. संदीप त्यावेळी पंगतीला बसत नाही, आणि मग दुपारी साडेतीनला त्याला भूक लागली की आमची गाडी संदीपच्या पोटपूजेसाठी थांबवली जाते. धीरगंभीर तर कधी विरहाच्या शब्दांची गाणी करणारा कवी संदीप अर्थातच मूडी असणार यात शंका नाही. पण सलीलकडून संदीपच्या वेडेपणाचे किस्से ऐकण्याची मजा या दोघांच्याही चाहत्यांना मिळाली. संदीप कविता लिहितो आणि सलील त्याला संगीत देतो.

मग, कधी असा प्रसंग आला असेल का या दोघांच्या आयुष्यात की, संदीपने लिहिलेली एखादी ओळ सलीलच्या संगीताच्या मीटरमध्ये बसत नसेल. मग त्यात बदल करावा असं सलीलला वाटलं तर संदीपच्या कविमनाला खटकलं असेल का… या प्रश्नाचं उत्तर ऐकणंही रंजकच. सलीलच्या शब्दात सांगायचं तर संदीपच्या शब्दातच इतकी ताकद असते आणि त्याला स्वरांची जाण असल्याने अशी वेळ खूप कमी वेळा येते.

पण जेव्हा आधी चाल बांधतो आणि त्यावर संदीपला शब्द लिहायचे असतात तेव्हा मीटर बदलाच्या गोष्टी आमच्यात अगदी दिलखुलासपणे होतात. संदीप त्याच्या मिस्कीलपणाने सांगतो, कुणी कुणाला प्रपोज केलं हे महत्त्वाचं नसतं तर दोघांचं जमून संसार सुरू होण्यात आनंद असतो. माझी कविता आणि सलीलचं संगीत यांचंही नातं असंच आहे. माझं कमी की तुझं जास्त यापेक्षा दोघांचं मिळून जे श्रवणीय ते फायनल हे आमचं सूत्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER