वेगळ्या वाटेने चालू या

वेगळ्या वाटेने चालू या

हाय फ्रेंड्स ! दहावी बारावी जवळ आली की पुढच्या वाटा शोधण्यासाठी चर्चेला सुरुवात होते. कुठे चर्चा ,कुठे संवाद तर कुठे विसंवाद घडायला लागतात. कारण असे असते की मुलांनी बरेच वेळा आपल्या आपल्या वाटा शोधलेल्या असतात. काही ठिकाणी त्या सहजतेने स्वीकारले जातात. पण काही ठिकाणी मात्र अजूनही मुले आठवी नववीला गेली की पालकच मनाने पुढच्या दहावी-बारावीसाठी मनाची तयारी करायला सुरुवात करतात. इंजिनीअरिंग ,मेडिकल विषयीचे डोक्यावरचे भूत अजूनही उतरलेले नाही. कारण नोकरी व्यवसाय याची खात्री, पुरेसा नव्हे भरपूर पगार, नियमित इन्कम सोर्स यासाठी कम्फर्ट झोन मध्ये राहून विचार केल्या जातो .आणि हे साहजिक आहे.(मात्र आज वास्तविक बघता नामांकित कॉलेजेस सोडून झालेले इंजिनिअर बरेच जण नोकरीचा शोधच घेत आहेत .नाहीतर अत्यंत कमी पगारावर काम करताहेत.)एक तर याची कल्पना पालकांना नाही आणि या विद्या शाखांची क्रेझ अजून कायम आहे. पण काही ठिकाणी मुलांना गाण्यातच करिअर करायचं असतं तर काहींना अभिनयाच्या क्षेत्रात ! बरेचदा मुलांनी आपली आपली मतं ठाम पणे ठरवलेली असतात. त्याप्रमाणे ते विद्याशाखा ही निवडतात. आणि इथेच बरेचदा संघर्ष होतो. एक तर पालकांना सुरक्षितता हवी असते आणि मुख्य म्हणजे बरेचदा करिअरच्या अनेक नवीन वाटा त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नसतात.

अशीच एक वेगळी वाट म्हणजे “फूड फोटोग्राफी आणि फूड स्टायलिस्ट.” अनेक जणांनी आज पूर्णवेळ व्यवसाय म्हणून हा निवडलेल्या दिसतो अनेक आंतरराष्ट्रीय क्लायंट्स अशा कंपन्यांना मिळतात.

सध्याचे जग असे आहे की,” जो दिखता है वो बिकता है l “आणि यात महत्त्वाची ठरते ती फूड फोटोग्राफी. असं बघा की जेवायला बसल्यावर समोरचे ताटातले अन्न जर नजरेला सुखावणारे असेल तर ताबडतोब जेवणाची इच्छा निर्माण होते. आपल्याकडे आपण नेहमी बघतो की, गरमागरम वाफाळलेला वरण भात, पांढरा शुभ्र भात आणि त्यावर पिवळाधम्म वरण. शिवाय तुप आणि लिंबू. टोमॅटोची कोशिंबीर, बटाट्याची भाजी, त्यावर कोथिंबीर -, श्रीखंड त्यावर केशर किंवा गुलाबाच्या पाकळ्या, पानाभोवतीची महिरप, उदबत्ती ,समया ! जेव्हा जेवणाची पंगत डोळ्यासमोर येते तेव्हा आपोआपच उदबत्त्यांचा दरवळ आणि गरम जिलब्या आणि त्यांचा सुगंध अशी रंगीत आणि गंधीत पंगत डोळ्यासमोर येते आणि भूक लागल्यासारखे होते. पोटात कावळे ओरडू लागतात.

म्हणजेच बरेचदा पदार्थांच्या रंगामुळे, मांडणीमुळे आपल्याला तो पदार्थ खावासा किंवा विकत घ्यावासा वाटतो .म्हणूनच पदार्थांचे देखणेपण हा खूप महत्त्वाचा घटक समजला जातो. पदार्थांची चव जेवढी महत्त्वाची, तेवढेच त्याचे प्रेझेंटेशन ! प्रत्येक जण आज याला महत्त्व देतो कारण ग्राहकांच्या मानसिकतेत खूप बदल झालेला आहे.

पदार्थांची ही फोटोग्राफी वाटते तितकी सोपी नाही .टेबलावर मांडले नी काढले फोटो . तर आपले वेगळेपण ठरवणे खूप गरजेचे असते. मग फोटोशूट करताना, मांडणीत अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात .उत्पादन कशाचे आहे ? त्याची किंमत काय आहे ? त्याचा ग्राहक वर्ग कोणता ? आणि मग त्याप्रमाणे नेपथ्य बघावं लागत, म्हणजे चहाची किटली, ट्रे, कप्स, मग, बाजूनी एखादा चष्मा, पेपर टेबल क्लॉथ, एखादे फूल वगैरे. आणि चहाच्या वाफेने केवळ दरवळ ग्राहकांपर्यंत पोहोचवावा लागतो. कारण यामध्ये फूड किंवा पदार्थ हेच मॉडेल आहे ,आणि जे निर्जीव असते. याला सूचना कळत नाही .मग पदार्थांचा स्पोंजीनेस आणि कुरकुरीतपणा दोन्ही फोटोतूनच जाणवायला कौशल्य लागते. मेन्यू कार्ड वरील केवळ फोटोज बघून तो ग्राहकाला चव घ्यावीशी वाटायला लागणारा हवा असतो. यात आणखीन एकाची गरज असते ते म्हणजे फुल स्टायलिस्ट. म्हणजे वेगळ्या शब्दात पदार्थांचा मेकअपमन .मग उदा. मुगाचा शिरा . तो काचेच्या बशीत की बाऊलमध्ये की चांदीच्या वाटीमध्ये घ्यावा? तो कसा प्रेझेंट करावा? मग त्यावर काय पेरावं? रंग कसा हवा? हे सगळं क्लाइंट बरोबर चर्चा करून फूड स्टायलिस्ट ठरवतो. यामध्ये पदार्थांची पूर्ण माहिती, त्याचे वैशिष्ट्य, दोन पदार्थां मधला फरक फोटोग्राफरला माहित हवा. कुठलाही पदार्थ बघितल्यावर हवासा वाटणे यात फोटोग्राफरचे यश अवलंबून असते. यात सगळे पदार्थ इतर वस्तूसोबत मांडणे व प्रकाशयोजना आणि मग फोटोशूट ! मग असे पदार्थ आपल्याला हवेहवेसे वाटतात आणि पण तोंडाला पाणी सुटतं.

कुठल्याही शब्दांशिवाय , शब्दांपलीकडचं सगळं काही जाणून घ्यायचं असेल तर त्या पदार्थांत बाबत फूड फोटोग्राफर आणि फूड स्टायलिस्ट यांना ते श्रेय जातं.

आज अनेक फर्मस आणि अनेक लोक, बऱ्याच वर्षांपासून या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. ” फुड फोटोग्राफिक्स”, ” गुड इनफ टू इट ” यासारख्या नामांकित फर्मस, चहा, मसाले ,बिर्याणी ,सूप पावडर, एनर्जी ड्रिंक, बिस्किटे ,यासाठी , ओरिओ, कॅडबरी ,नोर यासारख्या कंपन्यांबरोबर काम करत आहेत. जिग्नेश झवेरी, स्वतः शेफ असलेले सबा गाझियानी, किंवा पायल गुप्ता,त्याशिवाय निलेश लिमये यांसाठी काम करणाऱ्या उज्वला खापरे यासारखे अनेक लोक यशस्वीपणे या क्षेत्रांमध्ये काम करत आहेत.

आज अनेक मुलांना स्वयंपाकात, पदार्थ बनवण्यात ,बनवून खिलावण्यात खूप आवड आहे असं जाणवतं. अशांसाठी हे क्षेत्र छानच आहे. त्याच प्रमाणे चांगली क्रिएटिव्हिटी , आणि लोकांच्या गरजा ओळखणाऱ्या मुलां मुलींसाठी हा एक हटके करिअरचा उत्तम पर्याय म्हणता येईल.

फ्रेंड्स ! चला तर मग याही दृष्टीने विचार करुया !

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER