रोखू या ॲनिमियाच्या विक्राळ राक्षसाला !

Anemia

सुजलाम् सुफलाम् म्हणून गौरविल्या गेलेल्या आपल्या भारत देशात ॲनिमियाचे प्रमाण जास्त आहे.

२०१६ च्या एका सर्वेक्षणानुसार मोठ्या प्रमाणात भारतात ५८.६ टक्के मुले, ५३.२  टक्के स्त्रिया आणि ५०.४ टक्के गर्भवती स्त्रियांमध्ये रक्ताचे प्रमाण अत्यंत कमी आढळले. डब्ल्यूएचओच्या  मतानुसार सर्व स्त्रियांपैकी प्रजनन काळाच्या दरम्यानच्या म्हणजे साधारण १५  ते ४५ वर्षे वयोगटात पैकी एक तृतीयांश स्त्रिया ह्या  ॲनिमियाने  ग्रस्त असतात. २०१६ च्या रिपोर्टमध्ये मागील १० वर्षात गर्भवती महिलांमध्ये ॲनिमिया असलेल्या महिलांचे प्रमाण १२ टक्के कमी होताना दिसत असले तरीही सध्याच्याही परिस्थितीत  म्हणजे मागल्या वर्षीपर्यंत  ४५ टक्के गर्भवती स्त्रिया ॲनिमियाग्रस्त आहेत आणि हा जगातला सगळ्यात उच्चांक आहे हे दुर्दैव. ती आकडेवारी खूप बोलकी आहे.

ॲनिमिया हा शब्द (एन-हिमा) रक्त नसलेला या ग्रीक शब्दांच्या जोडीवरून तयार झाला. रक्तातल्या लाल रक्तपेशींचे किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होण्याला ‘ॲनिमिया’ असे म्हणतात. रक्तामार्फत शरीरातल्या सर्व पेशींपर्यंत प्राणवायू वाहून नेण्याचे काम हिमोग्लोबिनमार्फत केले जाते. त्याचेच प्रमाण कमी झाले तर शरीराला प्राणवायू मिळण्याचे प्रमाणही कमी होते. थकवा, अशक्तपणा असे मुख्य लक्षण असल्याने अनेकदा त्याचे निदान केले जात नाही.

कुठलाही शारीरिक आजार असो, त्याचे खूप परिणाम मानसिकतेवर, मानसिक स्वास्थ्यावर, मानसिक कार्यक्षमतेवर होताना दिसतात. त्यामुळेच नैराश्य, चिंता आणि मुलांमध्ये दिसणाऱ्या  अनेक कॉग्निटिव्ह कमतरता यांचे मूळ बरेचदा शारीरिक आजारातही असते. त्यामुळे बरेचदा शारीरिक आजारांचाही किंवा समाजातील शरीरस्वास्थ्याचा विचारसुद्धा मानसिक प्रश्न सोडवण्यासाठी करावाच लागतो.

आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून रक्तक्षयाला  पांडुरोग  म्हटले जाते. पांडू म्हणजे निस्तेजपणा, फिक्कटपणा, जो रक्तक्षयामुळे येतो. आरोग्याच्या दृष्टीने शरीरात रक्त पुरेसे असणे आणि ते शुद्ध असणे या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. सतेज कांती, प्रसन्न वर्ण, स्पर्शज्ञान सर्व शरीरावयवांना काम करण्यासाठी लागणारी जीवनशक्ती, मांसपुष्टी हे सारे रक्तावरच अवलंबून असते. म्हणूनच रक्तक्षय झाला किंवा रक्त बिघडले की त्वचा निस्तेज होते, काळवंडते, हातापायाला मुंग्या येतात, सुन्नपणा, बधिरपणा जाणवू शकतो. थोडे काम केले तरी थकवा येतो. एकंदरीत शरीरशक्‍ती कमी होते.

मग ही रक्ताची कमी कुठे आणि कोणामध्ये जाणवू शकते ? तर अपुऱ्या दिवसांची जन्मलेली मुले, कमी वजनाची मुले, एकूणच लहान मुले, पौगंडावस्थेतील मुली, गर्भवती महिला, अल्सरेटिव्ह डिसीज, कोलायटीस, पेशीसंबंधीचे आजार किंवा कुठलेही जुनाट आणि गंभीर आजार यात हमखास रक्ताची कमी जाणवते.

ॲनिमियाची  काही बेसिक लक्षणे  म्हणजे थकवा , अशक्तपणा ,आळस , श्वास घेण्यास त्रास होणे, एकाग्रचित्त नसणे वगैरे. रक्त कमी असल्याकारणाने, परिणाम म्हणून बाळंतपणात होणारे मातामृत्यू आणि शाळांमधील मुलांच्या संख्येतील घट (शाळांमधून मुले काढून घेणे, ड्रॉप आऊट ) हेही प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणात असते. आणि भारतात भरपूर मोठ्या प्रमाणात असलेल्या गर्भवती महिलांमध्ये रक्ताची कमतरता ही गर्भावर अतिशय परिणाम करणारी असते. बाळाचा पोटातच होणारा मृत्यू किंवा अबनॉर्मल मूल जन्माला येणे, लहान बाळ आणि मुले यांच्या बुद्ध्यंकामध्ये थोडी कमतरता पण जाणवते. परंतु त्याचबरोबर प्री-मॅच्युअर बेबी, पुरेशी वाढ न होणे यासारखे खूप गंभीर परिणाम होत असतात. आईच्या गर्भात निर्माण झालेली रक्तातील कमतरताही पुढे चालून मुला-मुलींनी कितीही टॅबलेट घेतल्या किंवा आहार चांगला घेतला तरीही भरून निघत नाही. यावरूनच गर्भारकाळामध्ये किती काळजी घ्यायला हवी हेच लक्षात येते.

व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्याचप्रमाणे प्रतिकारशक्तीवरदेखील परिणाम होत असल्याकारणाने इन्फेक्शन्स आणि इन्फ्लामेट्री डिसीजेसचे प्रमाण वाढते. आणि व्यक्तिगत प्रॉटडक्टिव्हिटीवर पण याचा परिणाम होतो. आयर्न डेफिशियन्सीचा परिणाम मुलांमध्ये भाषिक कौशल्य मोटर स्किल्स, को-ऑर्डिनेशन स्किल यांची कमतरता होण्यात होत असतो.

भारतात रक्ताची कमतरता होण्याची कारणे शोधल्यानंतर काही गोष्टी समोर येतात.

ते म्हणजे कुपोषण, गरिबी, स्वच्छतेची कमतरता, मलेरिया सारखे आजार, जंत होणे ह्याबरोबरच शाकाहारी जेवण हेही एक कारण आहे. मुळात शाकाहारी जेवणामधून रक्त वाढण्यासाठी आवश्यक अनेक गोष्टी मोठ्या प्रमाणात मिळतात हे नक्की. परंतु एका संशोधनानुसार असं सांगितल्याचं वाचनात आलं की शाकाहारी जेवणातील  १ ते १५ टक्के लोहाचे शोषण शरीरात होते, तर मांसाहारी जेवणात पैकी १५ ते ४० टक्के इतके लोहाचे शरीरात शोषण होते.

रक्तातील कमतरतेसाठी अत्याधिक शारीरिक श्रम किंवा व्यायाम, नियम न पाळता मद्यपान, दिवसा झोपणे, स्त्रियांमधील मासिक पाळीचे वेळी होणारा अतिरिक्त रक्तस्राव. फुप्फुसांची कार्यक्षमता कमी झाली की त्याचा परिणाम रक्तावर होऊ शकतो. अनेक वर्षांचा दमा असणाऱ्या व्यक्तींमध्ये रक्ताचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असलेले वास्तवात दिसून येते. याशिवाय यकृतामध्ये बिघाड झाला. किडनीची कार्यक्षमता कमी झाली तरी त्याचे पर्यवसान होऊन रक्त कमी होते. हिमोफिलिया, थॅलॅसिमियासारख्या आजारांमध्ये रक्तक्षय होतो. अति मानसिक ताण, त्रागा, चिडचिड यामुळेही रक्त कमी होऊ शकते. यावर उपाय काय?

भाज्यांपैकी पालक, मेथी, माठ, चाकवत, शेपू रक्तवाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे . त्याचबरोबर त्यावर थोडे लिंबू पिळले तर त्या जास्त प्रभावी ठरतात. फळांमध्ये डाळिंब, सफरचंद ,आवळा, अंजीर, द्राक्ष, रक्तवाढीसाठी उत्तम असतात . तर सुकलेले अंजीर, काळे खजूर, काळ्या मनुका हा सुकामेवा, मध, गूळ, केशर याबरोबरच स्वयंपाक करताना लोखंडाची कढई, तवा, पळी वापरणे हेसुद्धा खूप फायदेशीर असते.

चुकीची जीवनशैली , आहाराच्या चुकीच्या सवयी, आयुष्याचा आनंद लुटण्याच्या चुकीच्या कल्पना आणि त्यांचा अतिरेक यामुळे तरुणांमध्येसुद्धा  ॲनिमियाचे  प्रमाण वाढलेले असते.

मानसिक शांती, समाधान, आनंद राखणे, राग न करणे, उगीचच मत्सर करत राहणे, त्रागा करत राहणे, हे सोडून द्यायला हवे. आजच्या ताणतणावाच्या आणि धावपळीच्या युगामध्ये मनाचा समतोल राखणे आणि पुढच्या पिढीसाठी प्रेग्नेंसीपासून काळजी घेणे हे किती आवश्यक आहे हेच आता आपण बघितले. वरवर दिसणारा हा शारीरिक आजार असला आणि ताबडतोब खूप परिणाम करणारा नसला, तरीही यामुळे असणारे परिणाम जास्त घातक असल्यामुळे वेळीच काळजी घ्यायला हवी.

त्याचबरोबर रक्तदान हे सर्वोत्कृष्ट दान हे लक्षात घेऊन एक उत्तम नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावायला तर हवे, हेही नक्कीच!

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

ही बातमी पण वाचा : स्मरणशक्ती , पण विस्मरणाचीही शक्ती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER