उद्योगाच्या वीज बिलातील स्थिर आकाराचा प्रश्न निकालात काढू : शरद पवार

Sharad Pawar

कराड : लॉकडाऊनच्या(Lockdown) कालावधीत औद्योगिक वीज बिलातील स्थिर आकार सहा महिन्यासाठी रद्द करावा अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्ससह औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) पक्षाचे नेते शरद पवार(Sharad Pawar) यांच्याकडे कराड येथे केली. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली कारखानदार, उद्योजक व व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेऊन स्थिर आकार रद्द करण्यासंदर्भात साकडे घातले. मागण्यांचे निवेदनही त्यांना दिले. यावेळी पवारांनी, उद्योगाच्या वीज बिलातील स्थिर आकाराचा प्रश्न निकालात काढू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसाय ठप्प आहेत. सहा महिन्यापासून कारखानदारी क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून औद्योगिक वीज वापरातील स्थिर आकार सहा महिन्यासाठी रद्द करण्याची ग्वाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यापूर्वी दिली होती. दरम्यान महावितरण कंपनीकडून उद्योगधंद्याच्या वीज बिलात स्थिर आकारणीचा समावेश केला आहे. यामुळे वीज बिलामध्ये मोठी वाढ झाली आहे. कारखानदारी बंद असताना उद्योग क्षेत्राला हा भुर्दंड कशासाठी ? असा प्रश्न कारखानदार, उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित करत आहेत.

या पार्श्वभूमीवर वीज बिलातील स्थिर आकार सहा महिन्यासाठी रद्द करावा अशी मागणी शिष्टमंडळाने पवार यांच्याकडे केली. आमदार जाधव यांनी तसेच कारखानदारी उद्योग-व्यावसायिकांसमोरील अडचणी पवार यांच्यासमोर मांडल्या. सरकारने उद्योगधंद्यांना मदतीचा हात दिला नाही तर उद्योग टिकणार नाहीत हे शिष्टमंडळाने प्रकर्षाने मांडले. शिष्टमंडळात कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष रणजित शहा, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, गोशिमाचे अध्यक्ष सचिन शिरगावकर आदींचा समावेश होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER