चला प्रपोज करूया

आपल्या आयुष्याचा जोडीदार कधी, कुठल्या क्षणी भेटेल आणि हृदयाच्या तारा झंकारतील याचा काही नेम नाही. आपल्या आयुष्यात अनेक माणसं असतात जी जात येत असतात. पण एकच माणूस क्लिक होतो आणि त्याच्यासोबत आपण आयुष्य आनंदात घालवू शकतो असं वाटतं तोच खरा जोडीदार. अभिनेत्री ईशा केसकर (Isha Keskar) ला देखील तिच्या आयुष्याचा जोडीदार मिळाला असाच मिळाला. चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) शो च्या मंचावर इशा आणि अभिनेता ऋषी सक्सेना (Rishi Saxsena) कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र भेटले आणि चला-हवा-येऊ-द्या म्हणता म्हणता म्हणता चला प्रपोज करूया असं म्हणत दोघांनी एकमेकांना पसंत केलं.

मराठी सिनेमा, मालिका इंडस्ट्रीमध्ये सध्या अशा अनेक जोड्या आहेत ज्या याच इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. सध्याच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजेच इशा केसकर आणि ऋषी सक्सेना. जय मल्हार या प्रचंड लोकप्रिय झालेल्या मालिकेमध्ये बानुची भूमिका ईशा केसकरने केली होती. धनगर समाजातील देखणी बानुच्या व्यक्तिरेखेला इशा केसकर चा चेहरा परफेट सूट झाला होता. अभिनयाने तर तिने बानुचा रोल घराघरात पोहोचवला. खंडेरायाची भक्त असलेली बानु त्याच्या प्रेमात पडते आणि नंतर त्यांचा विवाह होतो याची कथा उलगडण्यात ईशा केसकर चांगलीच सरस ठरली ती तिच्या अभिनयाने. काहे दिया परदेस ही मालिका देखील लोकप्रियतेच्या शिखरावर होती. मालिका, नाटक, सिनेमा यातील कलाकारांशी मुक्त संवाद साधत कॉमेडीचा पंच देणाऱ्या हलक्याफुलक्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात दर आठवड्याला वेगवेगळे कलाकार गप्पा मारण्यासाठी येतात.

चला हवा येऊ द्या या शोचा भागांमध्ये इशा केसकर आणि ऋषी सक्सेना सहभागी झाले होते. इशा सांगते, चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात येईपर्यंत आम्हा दोघांची काहीच ओळख नव्हती. फक्त एका वाहिनी वरच्या दोन मालिकांमध्ये काम करणारे आम्ही कलाकार एका मंचावर एकत्र आलो. खरंतर ऋषी सक्सेना हा हिंदी भाषिक आहे. काहे दिया परदेस या मालिकेच्या कथेला अनुरूप हिंदी भाषिक हिरो असल्याने ऋषी सक्सेनाचा मराठी मालिकेच्या वर्तुळात प्रवेश झाला. चला हवा येऊ द्या या शोच्या वेळी गप्पा मारताना त्याचा स्वभाव खूप आवडला. तो जरी हिंदी भाषिक असला तरी मराठी जाणून घेण्याची, मराठी भाषेतील अर्थ समजून घेण्याची त्याला फार आवड होती. त्यातूनच आमचा संवाद सुरू झाला. त्याने काही मराठी शब्दांचे अर्थ मला त्यावेळी विचारले होते. आमचा संवाद वाढत गेला आणि मग आमची मैत्री झाली. एकमेकांचे मित्र असताना आमच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्यातूनच आपण एकत्र आयुष्य छानपणे जगू शकतो असे.आम्हाला दोघांनाही वाटलं. त्यामुळे चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम म्हणजेच आमच्या दोघांसाठी एकत्र येण्याचं कारण आहे.

गेली तीन वर्षापासून ईशा आणि ऋषी एकमेकांना डेट करत आहेत. खरे तर अनेकदा असं होतं की, कलाकार एकमेकांना डेट करत असतात तेव्हा त्याविषयी जाहीरपणे बोलण्याचे टाळतात. मात्र या दोघांनीही आपलं रिलेशन कधीच नाकारले नाही. त्या दोघांच्या सोशल मीडिया पेजवर त्यांचे एकत्रित फोटो दोघंही शेअर करत असतात. गेल्यावर्षी दोघांनी एकत्रित टूरदेखील केली होती आणि त्या वेळचे फोटो देखील त्यांनी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवले होते. सहाजिकच आता हे नक्की आहे की ईशा आणि ऋषी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. पण दोघांच्या हातात वेगवेगळे प्रोजेक्ट असल्यामुळे सध्यातरी दोघांच्या लग्नाचा विचार नाही.

इशा केसकरला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. वुई आर ऑन होऊन जाऊ द्या या सिनेमातून तीची मराठी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री झाली. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया ची भूमिका करणारी रसिका सुनील तिच्या अभिनय प्रशिक्षणासाठी लंडनला गेली त्यानंतर शनाया हा रोल तिच्याकडे चालून आला. नुकतीच जय मल्हार मालिका संपल्या मुळे सुरुवातीला इशा ही बानुच्या व्यक्तिरेखेने प्रचंड लोकप्रिय झाली होती. बानू ही व्यक्तिरेखा एका वेगळ्या काळातील असल्यामुळे लोक अजूनही बानू म्हणजे इरकली साडी तील जुन्या काळातील स्त्री अशा लूक मध्येच ईशाला पहात होते. पण माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया ही अत्यंत मॉडर्न मुलगी दाखवण्यात आल्याने ईशाला एकदम बानू या व्यक्तिरेखेतून शनाया च्या भूमिकेत शिरायचं होतं. तीने ही सगळी कसर भरून काढत लवकरच शनाया मध्ये स्वतःला एकरूप केले. गर्लफ्रेंड या सिनेमातही शनाया च्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. सध्या काही वेबसीरिज आणि जाहिरातीमध्ये इशा बिझी आहेत तर ऋषी सक्सेना याचं हिंदी मध्ये जोरात काम सुरू आहे. सध्या तरी दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित नसली तरी एकमेकांसोबत सहवासातला आनंद मात्र ईशा आणि ऋषी मनमुराद घेत आहेत. जेव्हा जेव्हा ते त्यांच्या जुळलेल्या नात्याचा विचार करतात तेव्हा चला हवा येऊ द्या या मंचाला मात्र ते हजार वेळा धन्यवाद देत असतात.