‘असेल हिंमत तर ये मैदानात’, कोको गौफने दिले टीकाकाराला आव्हान

Coco Gauff

अमेरिकेची (US) टेनिसपटू (Tennis) कोको गौफ (Coco Gaugh) ही फक्त १६ वर्षांचीच असली तरी तिच्या वयाच्या मानाने तिने खेळातही आणि आपल्या विचारांतही बरीच प्रगल्भता दाखवून दिली आहे. रंगभेदाविरुद्धच्या (Racism) ब्लॅक लाईव्हज मॅटर (Black lives matter) आंदोलनावेळी याची प्रचिती आली आहे. आता पुन्हा एकदा तिने वयाबद्दल आणि लिंगभेदाबद्दल आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत. मी मुलगी आहे म्हणून अशी काहीही बाष्कळ विधाने करू नका, असे तिने आपल्याबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्यांना सुनावले आहे. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे तिने हे मत मांडले आहे.

कोकोने अतिशय कमी वयातच गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये छाप पाडली आहे. तिने व्हिनस विल्यम्स, साबालेंकासारख्या आघाडीच्या खेळाडूंना मात दिली आहे. टॉप १५ मधील खेळाडूंवर तिचे तीन विजय आहेत आणि वुमेन्स टेनिस असोसिएशनच्या (WTA) स्पर्धेचे विजेतेपदही तिच्या नावावर लागले आहे. तरी काही लोक तिचे १६ वर्षांचे वय बघता तिच्या या यशाला हवे तेवढे महत्त्व न देता कमी लेखत आहेत. त्यांना कोकोने स्पष्ट शब्दांत सुनावले आहे.

कोकोबद्दल एकाने म्हटले होते की, ती मोठ्यांचे नाही तर मुलींचे टेनिस खेळतेय आणि मुलीच्या टेनिसमधील व्यावसायिक खेळाडू मुलांची राज्यस्तराचीसुद्धा स्पर्धा जिंकू शकणार नाही.

यावर अपेक्षेप्रमाणे कोकोकडून उत्तर आलेच. त्यात तिने म्हटलेय की, काही लोकांना वाटते की, ते तिच्यापेक्षा चांगले खेळू शकतात, त्याला आपली काहीच हरकत नाही; पण जेव्हा लोक लैंगिकतेचा संदर्भ घेऊन बोलतात, त्याला मात्र आपली हरकत आहे. केवळ मुलगे आहात म्हणून तुम्ही चांगले आहात आणि मुली आहोत म्हणून आम्ही तेवढ्या चांगल्या नाहीत या तर्काला काहीच अर्थ नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर रॉजर फेडररचे देता येईल. रॉजर फेडररने म्हटले की, तो मला हरवू शकतो तर ते शंभर टक्के शक्य आहे. ते यासाठी की त्याच्याकडील कौशल्य आणि त्याचा खेळ माझ्यापेक्षा कितीतरी चांगला आहे. पण केवळ मी मुलगी आहे म्हणून तू मला हरवशील हे म्हणणे म्हणजे मूर्खपणा आहे. हो…तुझा खेळ, तुझे कौशल्य माझ्यापेक्षा चांगले असेल तर हा दावा मान्य आहे; पण केवळ मी मुलगी आहे या आधारावर बोलत असशील तर मैदानावर उतरून प्रत्यक्ष खेळूनच बघू या. तू जर खरा खेळाडू असशील तर हे समजशील, असे तिने या टीकाकाराला फटकारले आहे.

कोकोने टॉप सीड ओपन स्पर्धेत विजयी सुरुवात करून तिने या टीकाकाराला चोख उत्तर दिले आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात तिने द्वितीय मानांकित व जगातील नवव्या क्रमांकाची खेळाडू एरिना साबालेंका हिला पराभवाचा धक्का दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER