धीर, संयम, दक्षता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर कोरोनावर मात करू- शरद पवार

Sharad pawar

मुंबई :- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या देशात सर्वांत जास्त आढळून येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णांना बेडसाठी ताटकळत राहावे लागत आहे. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांसह जनतेला एक आवाहन केलं आहे. आपण धीर, संयम, दक्षता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर कोरोनावर मात करू, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

कोव्हिड-१९ ह्या जागतिक महामारीची दुसरी लाट संपूर्ण राज्यात पसरली आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. राज्यशासन, पोलीस व प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर्स, परिचारिका व संलग्न कर्मचारी रुग्णांना दिलासा देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. ह्या संकटावर मात करण्यासाठी जनतेच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे, असं मत शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे.

ही बातमी पण वाचा : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मायक्रो लॉकडाऊन आवश्यक : रणदीप गुलेरिया

नागरिकांना आवाहन आहे की, “शासनाने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. गर्दी टाळणे, सामाजिक अंतर राखणे, मास्क व सॅनिटयझरचा वापर करणे, स्वच्छता राखणे या सूचना कसोशीने पाळाव्यात. सभा-समारंभ वा गर्दीचे कार्यक्रम टाळावेत. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनादेखील कळविण्यात येते की, त्यांनीदेखील जनतेला ह्या अभूतपूर्व संकटातून बाहेर काढण्यासाठी स्थानिक स्तरावर स्वतःला झोकून द्यावे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम  राबवण्यावर विशेष भर द्यावा, असं आवाहनही शरद पवार यांनी नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केलं.

त्याचप्रमाणे राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. त्याकरिता रक्तदान शिबिरांचे कार्यक्रमदेखील हिरिरीने राबवावेत. मला खात्री आहे की, आपण धीर, संयम, दक्षता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर ह्या महामारीवर निश्चित मात करू. धन्यवाद.” असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button