चला, सारे विजयाकडे कूच करू या…

चला, सारे विजयाकडे कूच करू या...

Shailendra Paranjapeविजयादशमी, दसरा…सीमोल्लंघन करण्याचा दिवस. शमीच्या वृक्षावर ठेवलेली आपली शस्त्रे पांडवांनी बाहेर काढली आणि महाभारताचं युद्ध पुढे जिंकलं. करोना नावाच्या जगाच्या पाठीवर दहशत माजवलेल्या रोगरूपी राक्षसाचाही नाश करायची वेळ आलीय. अर्थात, करोनावर लस येईल तेव्हाच त्याचा समूळ नायनाट करता येईल. पण तोवर मास्क, सँनेटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या एसएमएसचा अवलंब करणं, हाच करोनावरचा (Corona) सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे.

विजयादशमीला सीमोल्लंघन करायचं असतं. दिल चाहता है, या हिंदी चित्रपटातला एक हिरो एक मजेशीर डायलॉग आपल्या मित्रांना हिणवण्यासाठी वापरत असतो. आपण सर्वोत्तम आहोत, हे सांगताना तो सर्वोत्तम असणाऱ्यांना स्वतःला आणखी सुधारणा अंगी बाणवणं अवघड असतं, असं सांगतो. मित्रांना हिणवण्याठी तो संवाद असला तरी एका गोष्टीचा संकल्प दसऱ्याच्या निमित्तानं विजयादशमीच्या निमित्तानं आपण सर्वांनीच करायला हवा. तो म्हणजे कठोर आत्मपरीक्षण करण्याची सवय लावून घ्यायला हवी आपण सर्वोत्तम असलो तरी किंवा आपल्याला तसं वाटत असलं तरी.

करोना काळात अनेक नव्या वास्तवांना आपण सारेच सामोरे गेलो आहोत. त्यामुळे पांडवांनी शमीच्या वृक्षावरून शस्त्रं काढली आणि आपल्याच बांधवांच्या विरुद्ध ते महाभारताचं युद्ध लढले. त्याच पद्धतीने आपण गेल्या सहा सात महिन्यात करोनामुळे ज्या गोष्टी शिकलोय, त्यातल्या चांगल्या गोष्टी न विसरता त्या विजयादशमीला घासून पुसून लख्खं करायला हव्यात. दसरा म्हणजे बुराइपे अच्छाईकी जीत का त्योहार किंवा चांगुलपणाचा वाइटावरचा विजय साजरा करण्याचा दिलस. करोना काळात भांडी घासायला शिकलोय, किंवा कपडे धुवायचे मशिनही लावायला शिकलोय, तर करोना रोग आपल्यातून गेल्यावरही हे संकटकाळात अंगी जोपासलेले गुण टिकवून ठेवायला हवेत.

एक तीळ सात जणांनी वाटून खावा, हे शिकवणारा सक्रांतीचा सण दिवाळी आणि नववर्षानंतर येईल. पण करोनामुळे ते प्रकर्षाने जाणवले आणि लोकांनी अंगीकारलेही आहे. त्यामुळे अन्नाची नासाडी करणार नाही. करोनासाठी सातत्याने हात धुवावे लागले तरी पाण्याची नासाडी करणार नाही. येणाऱ्या दिवाळीला दीपोत्सव करताना आजूबाजूच्या गोरगरीबांच्या घरातही दीप उजळतील, हे आवर्जून बघायला हवे. एक तीळ सात जण वाटून घेतात, तसं आपण दिवाळीचा फराळ करताना एका तरी भुकेलेल्याला दिवाळीचे पदार्थ द्यायला हवेत, ही जाणीव विजयादशमीच्या दिवशीच अंगात बाणवू या.

विजयादशमीला विजयाचा निर्धार करतानाच आपल्या विविधतामे एकता असलेल्या देशातले सर्व लोक आपल्याबरोबर विजयी व्हायला हवेत, हेही बघायला हवं. त्यासाठी वसुधैव कुटुंबकम् ही आपल्या देशाची परंपरा लक्षाय ठेवायला हवी. करोना काळात देश म्हणून भारतानं अनेक देशांना वैद्यकीय आणि इतरही स्वरूपाची मदत केलीय. त्याचप्रमाणे यथाशक्ती स्वतःबरोबरच इतरांचा विचार केला तर खऱ्या अर्थानं विजयादशमी साजरी होईल.

खंडप्राय देशात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखू या, हा संदेश देण्याची वेळ पंतप्रधानांवर येते, ही चांगली बाब नाही. पण सर्वोच्च पातळीवरून सुरू झालेल्या स्वच्छता ध्येयाचाही विसर पडू देता कामा नये. रस्त्यावर थुंकल्यावर दंड किंवा मास्क न घातल्यामुळे तीन लाखाहून अधिक लोकांकडून पुण्यासारख्या ठिकाणी १२-१३ कोटी रुपयांचा दंड वसूल होतो, ही नक्कीच पुणेकरांना भूषण वाटावी अशी बाब नाही. विजयादशमी साजरी करताना किमान मी आणि समाज वेगळे नाही, हे लक्षात घेतले तरी आपल्यासह संपूर्ण समाजाची उन्नती, प्रगती होईल आणि विजयादशमीला आपण सारेच विजयी होण्याचा संकल्प करू शकू.

हा दसरा आणि यापुढची प्रत्येक विजयादशमी आपण सर्वांनी एकत्रित विजयाचा संकल्प करू या. तसं करू शकलो तरच पुणं किंवा महाराष्ट्र आणि १३५ कोटी बांधवांचा आपला देशही विजयाप्रत वाटचाल करू शकेल.

Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER