जाणून घेऊया अबोध मनाला

अबोध मन

व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करत असताना मन समजून घेणे गरजेचे असते. सिग्मंड फ्रॉइड यांनी मनाची रचना करताना मन तीन पातळ्यांवर वर्णन केलेले आहे. एक बोधात्मक, पूर्वबोधात्मक आणि अबोध मन ! बोधात्मक मनाची अवस्था जाणिवेची असते तर पूर्वबोधात्मक म्हणजे अस्पष्टशी असणारी जाणीव की जिथून सहजपणे जाणिवेच्या पातळीवर येता येते. उदाहरणार्थ, आपण जेव्हा गाडीवरून जात असतो त्या वेळेस सिग्नल आला की थांबतो किंवा आजूबाजूला वाहने असतील तर ब्रेक दाबतो किंवा हॉर्न देतो. अशा वेळी याकडे तुमचे लक्ष असतं. ही सगळी कामं सहजतेने होत असतात. म्हणजे जाणिवेच्या  पातळीवर तुमची उपस्थिती असते आणि नसतेही.

मात्र अबोध मन म्हणजे जणू अडगळीची जुना भंगार टाकून देण्याची खोली असे वर्णन करता येईल. त्यात काय असणार नाही? तर मुलांची लहानपणीची खेळणी, जुन्या तुटलेल्या बॅग, जुन्या डायऱ्या आणि बरंच काही!

त्या काळामध्ये मेंदूतल्या जैवरासायनिक बदल हे मनोविकारांसाठी कारण ठरतात, असा ठामपणे निष्कर्ष निघालेला नव्हता. बरेचसे मतप्रवाह या बाबतीत होते. अशा पार्श्वभूमीवर फ्रॉइड यांनी ‘मनोविश्लेषण’, ‘सायकोएनालिसिस’ नावाची संकल्पना मांडली. या मनांच्या पातळ्यांचा अभ्यास यात केला जातो.

ही बातमी पण वाचा : फीलींग फ्रेश !

या अबोध मनामध्ये अडगळीच्या खोलीप्रमाणे अनेक दडलेली गुपिते, गुंतागुंत उठणारी वादळ, कलह, संघर्ष असतात आणि या खोलीला एक कुलूप लावून टाकलेले असते, ते म्हणजे दमन ! सगळ्या मानवाच्या लैंगिक प्रेरणा म्हणजेच सुखासीनतेच्या कल्पना, इच्छा-आकांक्षा यात बंद केलेले असतात. जेव्हा वास्तवाच्या पातळीवर एखादी  गोष्टी करणे योग्य असते किंवा शक्य नसते, त्यावेळी त्यांचे दमन करून त्या या अवस्थेतच ठेवल्या जातात.

मानवी मनातील या मागण्या, सुप्त इच्छा, आकांक्षा, प्रवृत्ती, गरजा या सगळ्यांना फ्रॉइडने ‘इड’ म्हटले. या सगळ्या  सुप्त इच्छा, गरजा म्हणजे इड ! याला आवर घालण्यासाठी असतो तो ‘सुपर इगो’  आणि इड आणि सुपरहिरो यांच्या भांडणात मनाची घुसमट होत राहते. मग यांचं दोघांचं भांडण सोडवण्यासाठी येते, ती मनाची पातळी म्हणजे ‘इगो’.

थोडक्यात या दोघांचे भांडण सोडवण्यासाठी ज्या गोष्टीची मदत घेतो त्याला म्हणतात ‘डिफेन्स मेकॅनिझम’ म्हणजे संरक्षण यंत्रणा. थोडक्यात संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग बसमध्ये असतो ना अगदी तसेच! तो मार्ग वेगवेगळ्या पद्धतीने लोक वापरतात त्यासंबंधी आपण येथे जाणून घेऊ.

ही बातमी पण वाचा : स्मरणशक्ती , पण विस्मरणाचीही शक्ती

मानवी मनामध्ये कायम चालू असलेला संघर्ष आणि त्यातून मानवाला Anxiety, चिंतारोगाला सामोरे जावे लागते. म्हणून ही संरक्षण यंत्रणा. डिफेन्स मेकॅनिझमची दोन गुणवैशिष्ट्ये आहेत : एक म्हणजे परिस्थिती नाकारणे आणि दुसरे वास्तवतेचा वेगळाच अर्थ लावणे.

जाणून घेऊया अबोध मनाला

१) नकार (denial of reality) : त्रासदायक वस्तुस्थिती नाकारणे किंवा तिला तोंड देणे टाळणे किंवा वास्तव परिस्थितीचे संवेदन नाकारणे, एखादी दुःखद घटना किंवा कॅन्सरसारख्या आजाराचे निदान झाल्यानंतर पहिली रिएक्शन denial ची असते किंवा अल्कोहोलीझमसारखा आजार हा डिसीज ऑफ डीनायल म्हणून ओळखला जातो.

२) रीप्रेशन, दमन (Repression) : मनोविकारी चिंता दडपून टाकणे, जाणिवेच्या कक्षेतून हद्दपार करणे किंवा धोकादायक विचारांना जाणिवेत येऊच न देणे.

३) स्वप्नरंजन (Fantacy) : अतृप्त इच्छा काल्पनिक पूर्ण करणे. शेखचिल्ली ,दिवास्वप्न पाहणे.

४) रेशनालिझेशन, मिथ्यासमर्थन : एखाद्या वर्तनामागच्या योग्य प्रेरणासाठी पटेल असे समर्थन देणे. आपली निराशा लोकांना दिसू न देणे. कोल्होबाची आंबट द्राक्ष किंवा एखाद्या व्यक्तीने गावाबाहेर घर बांधले गावामध्ये प्लॉट घेणे परवडत नाही म्हणून. मला कसे सिमेंटच्या जंगलात घर बांधायला आवडत नाही , गावाबाहेर कसं मोकळी हवा असते छान, असे सांगणे.

५) प्रक्षेपण (Projection) : स्वतःच्या अस्वीकार्य प्रेरणा व वैशिष्ट्ये यांचे दुसऱ्यावर दोषारोपण करणे किंवा आपल्या स्वतःच्या इच्छा-आकांक्षांची पूर्ती दुसऱ्यांच्या माध्यमातून करणे. एखाद्या मित्राशी आपले पटत नसेल
आणि कुणी आपल्याला विचारले, “काय रे तुझे हल्ली तुझा मित्र अनिलशी पटत नाही का? परवा तोच म्हणत होता, की सुनील आजकाल संवाद टाळतो !” नाही रे !तसं काही नाही. मी मुद्दाम म्हणून कसं बोलणार ? तोच मुळी माझ्या वाऱ्याला उभा राहात नाही, माझंच काय अडले आहे. त्यालाच कशाचा एवढा माज आलाय कळत नाही. समोरच्या व्यक्तीवर आरोप करत बरेचदा माझंच खरं म्हणत स्वतःची बाजू सांभाळण्याचे समाधान माणूस करून घेतो.

६) Conversion : बऱ्याच लोकांच्या मनाचा कमकुवतपणा असल्याने प्रतिकार यंत्रणा कार्यरत लगेच होते. अनेक पेशंटच्या बाबतीत असे घडते, लग्नानंतर लगेच झटके येऊ लागतात. व्यक्ती बेशुद्ध पडते. तिची काहीतरी मागणी असते. सर्वांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तिच्या अंतर्मनाने उपसलेलं हे हत्यार असतं.

७) प्रतिपूर्ती (compensation) : आपल्यातील उणिवा दुसरीकडून भरून काढणे. दिसण्यास कुरूप मुलाने खूप अभ्यास करून फर्स्ट येणे. एखादा गावभर उनाडक्या करणारा, दादागिरी करणारा मुलगा लष्करात भरती होतो आणि देशाची सेवा करतो.

८) उदात्तीकरण (Sublimation) : अतृप्त लैंगिक ऊर्जा राहिल्याने विफल व्यक्ती पर्यायी क्रियांमध्ये ती ऊर्जा वापरते. लैंगिक निराशा पदरी पडलेली व्यक्ती कलावंत किंवा कुंचल्यातून अलौकिक चित्रे काढून भावनांना मोकळी वाट करून देते. प्रेमभंग झालेला सिद्धेश संवेदनशील मनाने आत्महत्येचे विचारही त्याच्या मनात डोकावू लागले. प्रेमभंग हे आत्महत्येचे कारण होऊ शकत नाही ही अंतर्मनाची संरक्षण यंत्रणा वाचनाने
त्याच्या मनात बळकट झाली आणि दुसऱ्यांसाठी जगायचं, समाजासाठी जगायचं या प्रेरणेने प्रेरित होऊन तो कामाला लागला.

९) विस्थापन (Displacement) : वड्याचं तेल वांग्यावर म्हणतो आपण ते हेच! ऑफिसमध्ये बॉसशी झालेली वादावादी ! त्याने जास्त काम देणे. त्याच्यावर राग काढू न शकणाऱ्या व्यक्ती स्वतःला त्याला नकार देऊ शकत नाही आणि मग मनातला राग घरातील बायकोवर निघतो, मुलांवर निघतो.

१०) तादात्मीकरण (Identification) : आपल्यातील उणीव दुसऱ्या व्यक्तीशी तादात्म्य पावून भरून काढणे. श्रेष्ठ व्यक्तीशी जवळीक साधून स्वतःबद्दलची पात्रतेची जाणीव वाढवणे. श्रेष्ठ व्यक्तीसारखे बोलून त्यांच्याशी एकरूपता दाखवून अहंभाव टिकवणे.

या काही संरक्षण यंत्रणा कार्य करतात.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशन व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER