चला जाऊ खेड्याकडे !

Let's go to the village!

आज सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे एकदा मोबाईलवर (Mobile) काय काय पोस्ट आल्यात ते बघत होते. तेव्हा आज सुप्रसिद्ध गणितज्ञ, स्वातंत्र्य सैनिक ,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची (High School Education) व त्याद्वारे सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध व्हावी ,यासाठी आयुष्यभर असलेले विद्यार्थी सहाय्यक समितीचे संस्थापक, डॉक्टर अच्युतराव आपटे (Achutrao Apte) यांचा स्मृतिदिन आहे, असे वाचनात आले. माझे विचार ‘खेड्याची प्रगती’ (Village Progress) या विषयाभोवती फिरू लागले. महात्मा गांधीजी नेहमीच म्हणायचे की, खेड्याकडे चला. पंचवार्षिक योजना यांसारख्या अनेक योजना येऊन गेल्या ज्यात ग्रामीण विकासावर प्रचंड भर होता. तुकडोजी महाराज ,गाडगे महाराज सगळ्यांनीच खेड्यांच्या विकासासाठी प्रयत्न केलेले दिसतात. आता तर अनेक आयटी क्षेत्रातील तरुण पिढी आपले कार्यक्षेत्र बदलून खेड्यात स्थायिक व्हायला बघत आहे. तरीही शहरे स्मार्ट सिटी बनवतातच आहेत; पण खेडी मात्र स्मार्ट अजूनही बनत नाही. कुठल्याही प्रगतीसाठी ,नोकरी उद्योग मिळवण्यासाठी, शिक्षणासाठी पैसा मिळवण्यासाठी, हौशी मौजीसाठीदेखील लोक शहरांकडे धाव घेतात. आपोआपच शहरे सुधारत जातात . शहरातील उद्योग धंदे वाढीस लागतात . मात्र खेडी जैसे थे राहतात. सुधारणा होत आहेत; पण कासवाच्या गतीने. काय कारणे असतील याला ? काय करावं लागेल यासाठी ? खेड्यातील लोकांची मन:स्थितीची अनुकूलता नाही का ?

तसं माझं माहेरही तालुक्याचे ठिकाण आणि मुळात सासरही एक अतिशय छोटंसं खेडेगाव. त्यामुळे तिथे जाण्याचा प्रसंग अजूनही अधूनमधून येतोच .आता तिथे फारसं कोणी राहात नसलं तरीही आमच्या घरी असलेल्या राम मंदिरात आम्ही दरवर्षी राम जन्मोत्सव ,अखंड नामजप सप्ताह आणि भंडारा असा मोठा सोहळा साजरा करतो. त्यामुळे सलग दहा- बारा दिवस तिथे राहणे होते. आपोआपच आजूबाजूचे जनजीवन, राहणी, खाणंपिणं ,जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, वृत्ती , प्रवृत्ती दिसू लागतात.

गावात सुरुवातीला जर आपण अंधार पडत आल्यावर पोहचणार असू किंवा सकाळचे ऑफिस गाठायचे यासाठी लवकर निघणार असू, तर टोळीने गावातील स्त्रिया, मुली गावाबाहेर प्रातर्विधीसाठी बाहेर पडलेल्या दिसतात. सुरक्षितता हवी म्हणून सगळ्या एकत्र, सामूहिक सोहळा असल्यासारख्या जातात. इतकी साधी व आवश्यक प्राथमिक गरज आहे ती ! गाडीतून जाताना अनेक ठिकाणी सरकारी शौचालय बांधलेली दिसतात. पण मग हे दृश्य अजूनही तसेच का? हे समजत नाही. बऱ्याचशा घराघरांमधून अजूनही ही सोय नाही. वास्तविक बघता ह्या खूप प्राथमिक गरजा आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, सुरक्षितता. परंतु प्रत्यक्ष अनुभव असा की, आमच्या मळ्याची जबाबदारी ज्या एका कोरकू आदिवासी माणसाकडे दिली आहे, त्याच्या घरावरही डिश अँटिना आहे. रस्त्यांवर पालांच्या छपरावरही त्या दिसतात . म्हणजे ही दोन टोकाची विसंगती खेड्यांमध्ये दिसते तेव्हा प्रश्न पडतो.

अलीकडे स्त्री शिक्षणाचे प्रमाण वाढलेले आहे. थोड्या शिकलेल्या आया आपल्या मुलींना जवळच्या शहरात शिकायला पाठवू लागल्या आहेत; पण तरीही बऱ्याच जणींना दिवसभर काबाडकष्ट करायचे आणि रात्री दारू पिऊन आलेल्या नवऱ्यांच्या लाथाबुक्क्यांचा प्रसाद खात झोपायचे असाच दिनक्रम आहे. पुरुष त्यांचा ताण घालवण्यासाठी, गरिबी, शेतीची नापिकी, दारू पिण्याची सर्व कारणं सांगतात. स्त्रियांना त्यात वेगळं काही वाटत नाही. अजूनही सर्वत्र धुरांच्या चुलीचा वापर होतो. धूरमुक्त चूल, सूर्यचूल अजूनही त्यांच्यापर्यंत पोहचलेली नाही. अतिशय दुर्गम गावातील खेडी आहेत, जिथे वाहतूक व्यवस्था अतिशय तोकडी आहे. अशा वेळी एखाद्या पेशंटचे डॉक्टरपर्यंत जाणे त्याच्या जीवावर पण बेतू शकते . बरेचदा गरिबी, अज्ञान, अस्वच्छता व मुलींना याबाबत शिकवायला आयांना वेळ असणे किंवा त्यांना गरज न वाटणे यामुळे छोट्या मुलामुलींच्या डोक्यात उवा, लिखा आणि हातांना खरूज हे पण मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. कष्टकरी स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. त्यांच्या जीवावर बसून आरामात आयुष्य घालवणारे पुरुष तुलनेने जास्त आहेत.

स्त्रियांचे आरोग्य हा तर ग्रामीण भागासाठी एक अध्यायच म्हणावा लागेल. आपल्याला शहरातून वाटतं की, गावाकडे ताज्या भाज्या, फळे, दूध चांगली मिळत असतील. परंतु त्या स्त्रियांच्या वाट्याला येणारा आहार बघितला तर मन:स्थिती अजूनही अशीच आहे की, सगळे चांगलेचुंगले ते म्हाताऱ्या माणसांना, पुरुष माणसांना , मुलांना ! तिचं पोट फक्त पाण्यावरच भरतं का काय असा विश्वास असावा ! ती कष्ट करून पदार्थ बनवते, पण तांदूळ-डाळ चोळून चोळून धुतले जाते, भाज्या चिरल्यानंतर धुणे, पदार्थ उघडे रट रट शिजवणे असे प्रकार दिसतात. मोड आलेली कडधान्य वगैरे फार वापरात नाहीच. भाजीपाला खाण्याकडे कल नाही .मसुरीची डाळ ,मटकीची भाजी एवढंच फक्त बनवलं जातं. घरात जागा असूनही परसबाग नाही. कारण दिवसभर दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करण्यातच वेळ जातो. गर्भारपणी आणि बाळंतपणात आहारविषयक समजुती फार चुकीचे आहेत . कुठला तरी पदार्थ गरम पडतो म्हणून, कुठला थंड पडतो म्हणून खायला दिला जात नाही. बाळंतपण संपल्यानंतर, स्त्रीला कॅल्शियम आणि लोहाची काय गरज? हाच समज आहे . जी खेडी मुख्य गावापासून फार आडबाजूला आहेत तिथे तर जीवनसत्त्व, लोह, अपुरा आहार, अतिश्रम, अस्वच्छता फार मोठ्या प्रमाणात आढळतात. अजूनही मोठ्या घरंदाज घराण्यांमध्ये पुरुषांनी मग तो भाऊ, वडील, नवरा कोणीही यांनी घातले या अटी किंवा घेतलेले निर्णय तिला पाळावेच लागतात.

परंतु आता टीव्ही आणि विविध प्रकारचे मोबाईल्स यामुळे एका चुकीच्या पद्धतीने क्रांती घडताना दिसते. काही गोष्टींचं नको इतकं ज्ञान मुलांना मिळतं. परंतु एक सुशिक्षित आई पझल घेऊन आपल्या मुलाला बसली आहे असं चित्र सुधारित घरातूनही दिसत नाही , खूप वेगळं एक दृश्य माझ्या बघण्यात आलं. घरात झोळी बांधलेली आणि दोरीला मोबाईल टांगलेला. त्यावरचे व्हिडीओ, कार्टून, गाणी पाहात पाहात ते बाळ झोपी गेलं. मुख्य म्हणजे नंतरही व्हिडीओ चालूच होता; कारण थोड्या वेळाने बाळ परत उठलं आणि परत मोबाईल पाहात झोळीत पडून राहिलं.

काही ठिकाणी पाणी लांबून आणावं लागतं, दुसऱ्याच्या हापश्यावरून भरावं लागतं. पण जरा परिस्थिती बरी आहे, शिकलेली, सुशिक्षित मंडळी आहे ती ‘शहरातील पाणी पिऊन आलेली’ असतात. त्यामुळे तेच खेडेगावांमध्ये राबवायला पाहतात .आज बऱ्याच तरुण मुलींचे राहणे बघितले तर खूप शानशौकीचे दिसते. पण हा सुशिक्षितपणा बाळांना वाढवताना ,आहाराच्या बाबतीत, स्वतःची प्रगती करण्याबाबत दिसत नाही .

उलट बरेचदा रिकामा वेळ जास्त मिळाल्याने गॉसिपिंगमध्ये बराच वेळ घालवला जातो .योग्य पद्धतीच्या सुधारणांची त्यांना गरज वाटत नाही आणि वास्तविक सुधारणांचे वारे फार चुकीच्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहचतात .तरुण मुली आजकाल मुलांना नूडल्स, कुरकुरे, वेफर्स हे जास्त देताना दिसतात .शहराचे अनुकरण म्हणून बाळांना खाद्यांचे डबे वापरण्याकडे कल आहे . बिस्किट टोस्ट आणि खारी याचं न्याहारीमधून प्रमाण वाढत आहे.

बालसंगोपन अजून एक शास्त्र म्हणून तिकडे मुळीच पोहचलेले नाही. थोडा सकारात्मक बदल म्हणजे स्त्रीचं बदललेलं राहणीमान थोडं टापटीपिचं झाल्यामुळे स्वच्छतेसाठी खूप अनुकूल परिस्थिती दिसून येते . मासिक धर्मात शास्त्रीय स्वच्छ कपडे किंवा सॅनिटरी पॅड्स वापरताना दिसतात. इतर स्वच्छताही पाहताना दिसतात. त्यामुळे स्त्री संबंधित आजारांचे प्रमाण हळूहळू कमी झालेले दिसते. परंतु त्याची विल्हेवाट लावण्याचे भान अजूनही आलेले नाही. “ठेविले अनंते तैसेची रहावे” ही त्याची लोकांची कल्पना वा संस्कार. (समाधान वाईट नाही) पण त्यामुळे माणसाची गती कुंठित होऊन तो निष्क्रिय होणेही अपेक्षित नाही.

त्यामुळे ज्ञानलालसा कुठेही दिसत नाही. पारंपरिकतेचा एवढा पगडा की नवीन गोष्टी लवकर पचनी पडत नाही आणि त्यामुळे फक्त गॉसिपिंगला ऊत येतो. ‘सामाजिक आरोग्य’ हा शब्द ग्रामीण भागाला माहीत नाही. सगळ्या कळशा-हंडे घासघासून पाणी भरल्या जातं, घरातली वाट्या-भांडी वाकडे स्वच्छ ठेवल्या जातात , घर-अंगण लख्ख ठेवतात, पण कचरा सगळा बाहेर ढकलतात. सगळ्या उचलून सडकेवर (रस्त्यावर) फेकण्याकडे कल असतो. आजूबाजूचा परिसर असेना का खराब ! ही प्रवृत्ती. तसेच प्लास्टिकच्या बरण्या, पिशव्या वापरण्यात येतात. त्यामुळे आपोआपच नदीनाले आणि ज्वलनातून प्रदूषण वाढते. त्या मानाने शहराजवळची जी खेडी आहेत, त्यात शहरातील क्रेझी व हवाहव्याशा सोयी यांचा वापर खेड्यात होतो; पण मुळातून सुशिक्षित आणि जबाबदार नागरिक म्हणून बनण्यापासून हे लोक दूर राहतात .त्यामुळे या खेड्यांना खरोखरच सुरक्षित व सक्षम बनवणे आपले प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. ज्ञानप्रबोधिनी पुणे यासारख्या संस्था काही जवळची गावे दत्तक घेतात. तिथे काम करतात. त्यातील एक ज्योत होण्याचा आपणही प्रयत्न करूया का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER