रुजवात करू, नववर्षाच्या तयारीची !

रुजवात करू, नववर्षाच्या तयारीची !

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (World Health Organization) 2030 पर्यंत ,भारतातील 67% मृत्यू असंसर्गजन्य रोगाने म्हणजे चुकीच्या जीवनशैलीमुळे होतील .आपल्याला यात सहभागी नक्की व्हायचे नाही तर आरोग्यपूर्ण जीवनही जगायचे आहे. अजून कोरोनानेही पूर्णपणे काढता पाय घेतलेला नाही . त्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता ही उत्तम राखणे आवश्यक आहे. रोगांचा प्रतिकार करायचा तर सुदृढ आरोग्य आणि उत्तम जीवनशैली गरजेची आहे .यात योग्य व नियमित आहार महत्त्वाचा ठरणार आहे. यशस्वी जीवनासाठी उत्तम आरोग्य हीच किल्ली आहे.

तुम्ही म्हणाल हा घासून घिसापिटा झालेला विषय आहे. पण विषयांची चर्चा वारंवार होऊन देखील त्याचे अनुकरण मात्र शून्य होत असेल ,तर परत त्याची चर्चा होणे गरजेचे असते. आता लवकरच नवीन वर्ष येऊ घातल आहे. आणि मागील खडतर गेलेल्या वर्षानंतर नववर्ष हे चांगलंच जावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. त्यामुळे संकल्पही केले जातील पण आपले संकल्प आता दीड दिवसाच्या, पाच दिवसाच्या किंवा जास्तीत जास्त दहा दिवसाच्या बाप्पाच्या आगमनासारखे नकोत तर कायमस्वरूपी हवे आहेत आणि यासाठी आपल्याला जे बदल करायचे ते आयुष्यभरासाठी असावे यासाठी सावकाश ,दर आठवड्याला थोडे, थोडे प्रयत्न करत बदल करावे लागतील. नाहीतर तो आरंभशूरपणा ठरेल नेहमीसारखा !

आरोग्य आणि त्याला जबाबदार असणारी जीवनशैली याचा विचार करतांना नेहमीच जाणवत की अलीकडे सगळ्यांचं जीवनमान खूप उंचावले आहे . सगळी सोयसुबत्ता जिकडे तिकडे दिसते आणि असं असूनही विरोधाभास हा की आरोग्याची पातळी मात्र पूर्वीपेक्षा खूप खालावलेली दिसते. आणि म्हणूनच हा विषय अधिकाधिक गंभीर होत जातो, वारंवार चर्चेला समोर यावं लागतं. अलीकडच्या काही वर्षांमध्ये अनेक शोध आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवाला आधुनिक बनवलं आहे. वेगवेगळी उपकरणे ,साधनसामग्री, सोईसुविधा तत्परतेने समोर हजर असल्यामुळे जीवन सुखासीन झाले आहे. परंतु या आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत अशी आमची शरीररचना मुळी नाहीच आणि एवढ्या थोडक्या कालावधीमध्ये शरीर रचनेमध्ये एवढा फरक होऊही शकणार नाही. हा आधुनिक तंत्रज्ञान आणि निसर्ग यांच्यातला संघर्ष आहे असं म्हणता येईल.
कोकणासारख्या काही प्रदेशांमधून लोकजीवन अतिशय कष्टाचे आहे. सोई-सुविधा म्हणाव्या तितक्या प्रगत नाहीत. आणि त्यामुळेच तेथील माणूस जास्तीत जास्त काटक असलेला जाणवतो.

अधून मधून पर्यटनाच्या निमित्ताने त्या प्रदेशात जाणे झाले की लक्षात येतं की, येथील जनजीवन किती कष्टाचे आहे .पर्यटकांना राहण्यासाठी वेगवेगळ्या घरगुती स्वरूपाचे रिसॉर्ट तेथे बांधलेले आहेत आणि तेथील घरचीच मंडळी मिळून पर्यटकांसाठी जेवणाची, चहापाण्याची ,नाष्ट्याची व्यवस्था करताना दिसतात .ती एक उत्तम व्यवसायाची संधी तिकडे असते. एवढ्या पर्यटकांसाठी नाश्तापाण्याची सोय, घरातलेच लोक ,गृहीणी करताना दिसतात. ते थेट भांडी घासण्या पर्यंत.
याउलट बैठ्या सुखासीन जीवनशैलीमुळे कार्यपद्धतीमुळे कॅलरीज म्हणजे कार्यशक्तीची गरज कमी झालेली आहे. म्हणजे इनपुट जेवढा आहे, तेवढा आउटपुट नाही. खाण्यापेक्षा कॅलरीचा वापर जास्त नाही. अर्थातच कॅलरीजचे रूपांतर चरबीत होतं. म्हणजे त्या शरीरात साचतात ,वजन वाढतं आणि पर्यायाने आरोग्य बिघडतं. मग हृदयरोग ,मधुमेह अशा आजारांना खतपाणी मिळत जाते. त्याचबरोबर बरोबरीने जाणवणारा कामाचा स्ट्रेस , कामाची पद्धत, वेळा या सगळ्यातून ताण तणाव वाढतो. स्ट्रेस बस्टर म्हणून अति प्रमाणात खाल्ले जाते आणि नकारात्मक भावनांना वाट करून दिली जाते.

आपण आहार घेतो पण तो सकस ,संतुलित ,नियंत्रित आणि योग्य पद्धतीने घेत नाही. आपलं वागणं आणि विचार करण्याची पद्धत त्यानुसार निर्माण झालेला व्यवहार हे सगळंच त्रासदायक होत असते मुख्य म्हणजे शरीर आरामाला सोकावलेल असतं, आणि व्यायामाचा कंटाळा. परिणाम जो व्हायचा तोच होतो. पहिल्यापासून असणारी रूढ दिनचर्या आणि सुरुवातीपासून पाहिली जाणारी स्वच्छता आणि स्वच्छतेचे नियम हे आता आउटडेटेड झाले आहेत. या सगळ्या सवयींचा परिणाम म्हणजे आजच्या आपल्या तब्येती.

आणि म्हणूनच आज परत घिस्यापीटा विषयाचे दळण करण्याचा योग मला आला. मग आता आपल्याला काय सांगायचं, तर नियमित जेवण, योग्य व्यायाम आणि हालचाल, सुयोग्य विश्रांती श्वासावर लक्ष केंद्रित करणे, भरपूर हसणे आणि तणावरहित राहणं, आणि कुठल्याही स्वरूपात मदत करून समाधान मिळवणं.

  • खाणे कसे असावे ? तर ऋजुता दिवेकर सांगतात ,त्याप्रमाणे आपल्या परिसरात पिकणारे, आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतातले ,आपली आई – आजी जे शिजवत होते ते ,आपल्या स्वयंपाक घरात बनलेले असे ते असावे. त्याबरोबरच आपले जैविक घड्याळ नुसार जेवणाच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे जेवण केले तर त्यामुळे पचन नीट होते कारण त्या वेळी आपोआपच पाचक रस तयार होत असतात .या वेळेस जर चुकल्या तर अन्नपचन नीट होत नाही आणि गॅस एसिडिटी यांचा त्रास होतो .म्हणूनच नवीन वर्षापासून सर्वप्रथम जेवणाच्या वेळा नियमित करणे ही पहिली प्रायोरिटी असायला पाहिजे .दुसरी गोष्ट जेवताना पूर्ण लक्ष जेवणावरच असू द्या, वेळ टीव्ही, इमेल बघणे यासारख्या गोष्टींचा वापर न करता सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर करून जेवणाचा आस्वाद घ्यावा .त्यामुळे अन्न अंगी लागू शकते. जेवण भरभर खाल्ल्याने वजनाचा धोका संभवतो. जेवण सावकाश करावे. गरज असेल तेवढेच खावे .जाता-येता खाऊ नये .फळे, सुकामेवा ,चणे यांचा साठा असावा. जंक फूड ,तेलकट ,गोड पदार्थांचा वापर करू नये आणि निराशा घालवण्यासाठी खाऊ नये .तसेच कुठलेही जेवण चूकवायचे सुद्धा नाही .त्यामुळे मधली गॅप खूप मोठी होते .भरपूर पाणी हे घातक टॉक्सिंस बाहेर टाकायला मदत करते.
  • झोप ही पुरेशी असावी जेवणापर्यंत प्रमाणे त्याचे वेळापत्रक आणि पॅटर्न ठरवून घ्यावे. सात ते आठ तासांची झोप शरीरासाठी आवश्यक असते .गॅजेट्स मुळे रात्री उशिरापर्यंत झोपेचं खोबरं होतं, उशिरा जेवण आणि कॉफी प्यायलाने झोपेवर परिणाम होतो .
  • आपली मन:शांती टिकवण्यासाठी श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करणे ,दीर्घ श्वसन यांचा वापर करावा .प्राणायाम यासारख्या गोष्टींचा वापर केल्यामुळे अन्नपचनापासून तर शरीरातील सर्व सिस्टीम्स ना फायदा होतो. त्याच बरोबर ताणतणाव टाळण्यासाठी खळखळून हसणे चांगले.त्यामुळे चांगले हार्मोन्स तयार होतात आणि स्ट्रेस हार्मोन जसे की कोर्तीसोल नष्ट होते.
  • कुणासाठी तरी काहीतरी केल्याने किंवा दुसर्‍याला कुठल्याही पद्धतीने मदत केल्याने आत्मसन्मानात भर पडते किंवा समाधान मिळतं. धनधान्याच्या स्वरूपात, श्रमाच्या स्वरूपात किंवा ज्ञानाच्या स्वरूपात, मदत करून समाधानी होता येते. आणि भौतिक सुखापेक्षा समाधान आणि शांती ही माणसाला आरोग्य प्रदान करणारी असते.
  • दिवसातला थोडासा तरी वेळ आपल्याला आवडणार्‍या कामांमध्ये घालवणे खूप आवश्यक आहे . असे जीवनशैलीचे छोटे-छोटे नियम जरी पाहिले तरी खूप मोठा परिणाम साधणारा आहे. याची सवय अगदी दररोज छोट्या छोट्या चांगल्या सवयीनी करता येईल. आजचा हा लेख अशासाठी की बरोबर पंधरा दिवसानंतर, नवीन वर्ष येईल तोपर्यंत बऱ्याच प्रमाणात आपल्याला ह्या सवयी अंगी बाळगण्याचा आलेल्या असतील.

या सवयी फक्त चार प्रकारात मोडतात. आपले खाणे, व्यायाम ,झोप, आणि प्राणायाम आणि वृत्ती. यासाठी आपल्याला एक विशिष्ट दिनक्रम आखून त्याप्रमाणे सवयी अंगीकाराव्या लागतील .आणि या साठी आपली पूर्वीची ,लहान असतानाची किंवा आपल्या आई वडीलांची दिनचर्या आठवून बघायला लागेल.

हाय फ्रेंड्स ! चला तर मग लागूया कामाला !! नवीन वर्षासाठीच्या तयारीला !!!

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER