“कुणाच्याही कुबड्या नकोत, २०२४ मध्ये स्वबळावर सरकार स्थापन करू” : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

पुणे :- गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय वर्तुळात बऱ्याच घटना घडत आहेत. काही घटनांमुळे राज्यातील सत्ताधारी असलेले महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात भाजपा (BJP) पुन्हा एकदा शिवसेनेसोबत (Shivsena) किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) आघाडी करून सत्ता स्थापन करणार अशी चर्चा आहे. मात्र, आगामी काळातील आघाड्यांबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सूचक विधान केले आहे.

आज भाजपाचा ४१वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्त चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भाजपाच्या कार्यालयात ध्वजवंदन केले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तसेच पक्षाच्या आगामी काळातील वाटचालीबाबतही त्यांनी संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, “राज्यामधील राजकीय वाटचालीबाबत आम्ही धोरण निश्चित केले आहे. आता राज्यात कुणाच्याही कुबड्या नको आहेत. आम्ही यापुढे स्वबळावर निवडणुका लढवणार. २०२४ मध्ये २ कोटी मतांचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. स्वबळावर निवडणून लढवून २०२४ मध्ये सरकार स्थापन करू.” असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. पाटील यांनी पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळातील तिसरा राजीनामा येईल, असे भाकित केले. त्यामुळे आता संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यानंतर आता कुणाला राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बापटांचा काँग्रेसला टोला

“आजपर्यंत भाजपचे शेकडो कार्यकर्ते मारले गेले. एकट्या पश्चिम बंगालमध्ये संघ आणि भाजपच्या १५७ कार्यकर्त्यांची हत्या झाली. पक्ष या कार्यकर्त्यांचे बलिदान कधी विसरणार नाही. कार्यकर्ता भाजप पक्षाचा प्राण आहे.” असे खासदार गिरीश बापट म्हणाले.

यावेळी गिरीश बापट (Girish Bapat) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी १०० योजना सुरू केल्या पण एकाही योजनेला स्वत:चे नाव दिले नाही. काँग्रेसच्या काळात इंदिरा आवास, संजय गांधी योजना सुरू करण्यात आल्या. त्या एवढ्या मोठ्या व्यक्ती होत्या का? ते मोठे असतीलही पण देशापेक्षा मोठे नाहीत, असा टोला गिरीश बापट यांनी काँग्रेसला लगावला.

ही बातमी पण वाचा : ‘येत्या आठ दिवसात पुन्हा एका मंत्र्याचा राजीनामा’, चंद्रकांत पाटलांच्या दाव्याने खळबळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button