रोल स्विचींग करूया

roll switching

संध्याकाळी बागेला पाणी घालत असताना शेजारच्या गॅलरीत मुलींचा खेळ भांड्याचा खेळ चाललेला दिसला. त्यांचे संवाद कानावर पडत होते .थोडी रुसवे-फुगवे चालू होते. मग त्यातील एक चिमुरडी समजावण्याच्या सुरात म्हणाली,” बरं ठीक आहे ग ! सानू तू काल बाबा होती ना, आज तू आई हो, मी बाबा होते. मात्र उद्या तू परत मला आई होऊ द्यायचं बरं का !”सानवी तिची मैत्रीण एकदम खुश झाली आणि समझोता झाला. ते ऐकून मला हसू आलं आणि लहानपणच्या खेळ भांड्यांच्या खेळाची आठवण आली. आणि मनात आलं, खरंच की ! त्यांनी” रोल स्विचींग” केलंय. !

तर असो! मूळ मुद्दा समझोता झाला होता. का? तर त्यांनी त्यांचे रोल्स बदलले होते. आणि हा रोल बदल त्या गरजेनुसार सहज करत होत्या. आणि सुसंवाद निर्माण होत होता.

फ्रेंड्स ! आपल्या प्रत्यक्ष आयुष्यातही असंच घडत असतं.

अनेकदा आपल्या भावना दररोजच्या व्यवहारात एकदम उत्कटतेने वाटतात, तीव्रतेने जाणवतात, त्या नेहमीच बरोबरच असतील असे नाही. बरेचदा आपल्याला स्वतःच्या भावनांची ओळख ही नीट पटलेली नसते. तर कधीतरी एखाद्या व्यक्ती बद्दल, घटनेबद्दल, परिस्थितीबाबत, कधीकधी आपण मत आपली लगेच बनवत जातो आणि ग्रह करून घेतो. आणि बरेचदा नंतर खरी परिस्थिती कळते. आणि आपलीच आपल्याला लाज वाटते किंवा वाईट वाटतं.

सकाळची वेळ. इला तिच्या नवऱ्याला सुदीप ला काही महत्त्वाचं सांगत होती. तिच्या बहिणी कुठेतरी ट्रीपला जाणार होत्या, आणि त्यांच्याबरोबर आपण जाऊयात का ?असं तिला विचारायचं होतं. मुख्य म्हणजे आज त्या सगळ्या मिळून ट्रीपसाठी वेस्टर्न वेअर खरेदीला जायचं ठरवत होत्या. सुदीप च्या कंपनीचे मोठे डील सुरू असल्याने तो काल ही उशिरा आला होता. त्यामुळे तिला यातलं काही सांगता आलं नाही.

अशी परिस्थिती अनेकदा येते, वेळ कमी असतो किंवा वेळ असेल तेव्हा इला विसरते म्हणा, किंवा बरेचदा मिळालेला वेळ ते असाच वाद विवादात घालवतात म्हणा ! आजही नेहमीप्रमाणे निघायच्या तयारीत असलेल्या सुदीप कडे, इलाने ट्रिपचा विषय काढला. तेवढयात त्याने घड्याळात बघितले, आणि झालं ! इलाचा पारा चढला. तुला माझ्यासाठी किंवा माझं काही ऐकून घ्यायला वेळच नसतो, पासून तर तुझं माझ्यावर प्रेमच नाही पर्यंत इलाची गाडी केव्हाच पोहोचली. ऑफिसची वेळ असल्याने सुदीप निघून गेला. आणि नंतर हळूच विचार करताना इलाच्या खरी परिस्थिती लक्षात आली. तसं तिला ओशाळल्यासारखे वाटलं ,चूक झाल्याची चुटपूट तिला लागली. म्हणून तिने पटकन स्वतःला सावरलं आणि फ्रेश होऊन पुढच्या कामाला लागली .संध्याकाळी तो घरी आल्यावर त्याच्याशी याबद्दल नीट बोलायचं ,योग्य वेळ पाहून असं तिने ठरवलं.

मागेही अशीच परिस्थिती घडली असताना इला दुःखाने दिवसभर रडत बसली होती, ना जेवली ना घर आवरलं. त्यामुळे सुदीप परत घरी आला तेव्हा घरात अंधार पडलेला .त्याची ही चिडचिड झाली होती हे इलाला आठवलं. मात्र यावेळी ती ही चूक परत होऊ देणार नव्हती . कारण?…कारण तिने “रोल स्विचींग”किंवा भूमिका बदलणे हा मस्त उपाय केला होता. तिने आज स्वतःला सुदीपच्या जागी ठेवून बघितले. त्याच्या नोकरीतील ताण ,त्याच्या समोरच्या टार्गेट्स, दररोज तीन तासांचा प्रवास, एवढ्यात स्वतःच्या तब्येतीकडे ही लक्ष देणं न होणे ,हे सगळं इलाने “त्याच्या जागी उभा राहून”(रोल्स स्विचींग) बघितलं. आणि मग त्याने तिच्या आवडत्या dietition च्या कोर्ससाठी ऍडमिशन घेण्यासाठी घेतलेला पुढाकार, तिच्या गाण्याचे केलेले कौतुक तिला आठवले. तिला आयुष्यात दिलेली मोकळीक, स्वातंत्र्यही आठवले. या कशावरूनच तर त्याचं आपल्यावर प्रेम नाही हे जाणवत नव्हतं. चूक झाल्याची चुटपुट तिच्या मनाला लागली.

संध्याकाळी सुदीप घरी आला, तो तिच्यासाठी तिच्या आवडीची सोनचाफ्याची फुले घेऊन. आल्यावर फ्रेश होऊन आल्या आल्या, त्याने येत्या मोठ्या विकेंडला लागुन सुट्टी घेऊन आपण तिच्या बहिणीबरोबर ट्रीपला जात असल्याचे जाहीर केले. ते दोन दिवस तो पूर्णवेळ तिला वेळ देणार होता. तिला वेळ देता येत नाही ही जाणीव तिच्या भूमिकेमध्ये जाऊन विचार केल्याने त्याला झाली होती.

बरेचदा विचार फार चुकीच्या मार्गाने जात असतात .इला ने जसा विचार एकदम सुतावरून स्वर्गाला नेला. तुला माझ्यासाठी वेळ नाही म्हणजे माझ्यावर तुझे प्रेम नाही ! पण असं नसतं.

फ्रेंडस ! मागच्या एका लेखात उल्लेख केल्याप्रमाणे जरा थोडासा “पॉज” घेतला तर त्यात आपण हा भूमिका बदल किंवा रोल स्वीचिंग करून बघू शकतो .जेणेकरून आपली प्रतिक्रिया न जाता प्रतिसाद जाऊ शकेल आणि संघर्ष टळतील. कधीतरी कोणाच्यातरी धास्तीमधून, भीती मधून एखादी गोष्ट ,कृती ,विचार वाटले तरी आचरणात आणता येत नाही .आवश्यक तो बदल, विचार किंवा कृती करता येत नाही.

सारंगी तिचा नवरा समीर ,मुलगी साक्षी आणि आजी आजोबा असे राहतात. आता सारंगी स्वतः मोठ्या प्रमाणात कमावते, स्वतः नोकरी करते. पण तिचे हात दगडाखाली दबलेले आहेत. तिच्या माहेरी आईला काही मदत लागली तर ती करू शकत नाही. कारण साक्षीला आजी-आजोबा सांभाळतात. व त्यांच्या भरवशावर ती नोकरी करते. पुन्हा सारंगीची आई कधी फार तिच्या अडचणींना काही कारणांनी जाऊ शकली नाही .आपोआपच ज्यांच्या आधारे तिचं सगळं चाललंय त्या पुढे सारंगीला हार मानावी लागते.

या सगळ्यांची कधीकधी खूप किंमत चुकवावी लागते. नाती संपतात, तुटतात. संकटाला आमंत्रण मिळतं. भरून न येणारे नुकसान होतं. जवळच्या नात्यात मतभेदाची कारणे तर अनेक असू शकतात. मात्र एकमेकांविषयी खोल विश्वास असावा लागतो. पण तो अनेकदा कमी पडतो. म्हणूनच आपल्याच वागण्याचा, बोलण्याचा, त्रयस्थ पण प्रेमळ नजरेने पाहून विचार करावा. आपण करतो वागतो तसं आपल्या प्रेमाच्या व्यक्तीने केले तर ? म्हणूनच रोल स्विचींग किंवा भूमिका बदलली हा एक मस्त उपाय आहे. हाच नियम पालक आणि पाल्य यांनी परस्परांविषयी बाळगला तर विशेषतः टीनेजर्स आणि त्यांचे पालक यांच्यातील टोक गाठणारा संवाद नाहीसा होऊन सुसंवादाकडे वाटचाल होईल. गरज आहे फक्त प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच्या भूमिकेत जाऊन बघण्याची म्हणजेच रोल – स्वीचीगची !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER