कोरोनारूपी रावणाचा नाश करू – उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray

मुंबई : विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या विजयादशमीला दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेऊ. एकजुटीने कोरोनारुपी रावणाचा नाश करू, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

करोना संकटावर मात करुन महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल असाही विश्वास दसऱ्याच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

लढवय्या महाराष्ट्र ही आपल्या राज्याची ओळख आहे. आपण अनेकदा संकटांचा यशस्वीपणे सामना केला आहे. कोरोना विषाणू विरोधातल्या लढ्यातही आपण सर्व भेद बाजूला ठेवून एकवटलो आहोत. कोरोनाच्या संकटात निसर्गाचीही अवकृपा झाली. पण, या सगळ्या संकटांना न डगमगता आपण सामोरे जात आहोत. कोरोना विषाणूला पराजित करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबवत आहोत. घराघरापर्यंत पोहचून कोरोना विषाणूचा पाठलाग करुन त्याला रोखण्यासाठी ‘कोरोना योद्धे’ काम करत आहेत असे उद्धव ठाकरे म्हणालेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळ्यांनी खूपच संयम दाखवला. सर्व धर्मीयांनी आपले सण आणि उत्सव घरीच साजरे केले. दसरा उत्साहात साजरा करत असताना कोरोना विषाणूच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य दक्षतेचे, गर्दी न करण्याचे, शारिरीक अंतर राखण्याचे, मास्क वापरण्याचे, वारंवार हात धुण्याच्या सूचनेचे पालन करा, असे आवाहन त्यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER