केंद्राचे काळे कायदे मोडून काढू, कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसचा नागपुरात राजभवनाला घेराव

Congress besieges Raj Bhavan in Nagpur against agricultural laws

नागपूर : कृषी कायदे रद्द (agricultural laws) करण्याची मागणी आणि इंधन दरवाढीविरोधात नागपूर राजभवनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात घेराव घालण्यात आला. केंद्रातील भाजपा सरकारने आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून बड्या उद्योगपतींचे गुलाम असणारे पंतप्रधान आता शेतकऱ्यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पहात आहेत. पण, काँग्रेस (Congress) पक्ष त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही अशी ग्वाही थोरात यांनी केली.

इंधनदरवाढीच्या निषेधार्थ महिलांनी रस्त्यावर चुली मांडून भाकरी भाजल्यात, केंद्रातील भाजपा (BJP) सरकारचा निषेध केला.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले की, मोदी सरकार सातत्याने संसद आणि संविधानाला पायदळी तुडवण्याचे काम करते आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या केंद्रातील सरकारला सर्वसामान्य जनतेची नाही तर फक्त निवडक उद्योगपतींची चिंता आहे. या संघर्षात काँग्रेस शेतकऱ्यांसोबत असून कायदे मागे घेतल्याशिवाय हा लढा थांबणार नाही.

मंत्री सुनिल केदार म्हणाले की, ही शेतकऱ्यांसाठी करो वा मरो ची स्थिती आहे. शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द झाले तरच शेतकरी जगतील. बिहार, मध्य प्रदेशचे बाजार समित्या संपवल्या तिथे १० शेतकऱ्यांनाही हमीभाव मिळत नाही. बाजार समित्या संपल्या तर शेतक-याच्या मालाला भाव मिळणार नाही. ही परिस्थिती आपल्याकडे येऊ नये म्हणून काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, शेतकऱ्यांना मन की बात नाही तर काम की बात पाहिजे. मोदींच्या भाषणबाजीला शेतकरी भुलणार नाहीत. देशात भाजपा विरूद्ध शेतकरी असा संघर्ष निर्माण झाला आहे व तो काळे कायदे रद्द केल्याशिवाय थांबणार नाही. इंधनदरवाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून गृहीणींचे बजेट कोलमडले आहे केंद्र सरकारने तातडीने इंधन दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.

मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, कायदे बनवताना शेतक-यांना विश्वासात घेतले नाही, कायद्याच्या समर्थनात भाषणे करणाऱ्या लबाडांना जनता गाडल्याशिवाय राहणार नाही. भाजप सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला असून देशातील शेतकरी भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER