एक पल तो अब हमे जिने दो ,जिने दो !

Let us live for a moment

आमिर खानच्या ” थ्री इडियट्स “या चित्रपटातलं निराश तरुणाचं ,”सारी उम्र हम मर मर के जी लिये एक पल तो अब हमें….l “हे गाणं सगळ्यांनाच नक्की आठवत असेल. तो दुसरं तिसरं काही मागत नाही ,त्याची त्याची स्वतःची स्पेसच मागतो आहे .

काय आहे हे स्पेस प्रकरण ? तर खऱ्या अर्थाने आपल्याला पाहिजे ते करता येण म्हणजे स्पेस ! मोकळेपणाने वावरण्यासाठी एकमेकांना दिलं जाणार अवकाश म्हणजे स्पेस ! स्पेस म्हणजे वाव, मोकळीक ! आणि काही प्रमाणात स्वातंत्र्यही. ही कमी अधिक प्रमाणात प्रत्येकालाच हवी असते.

पूर्वीच्या काळात दिली जायची का हो अशी स्पेस ? त्यांना हवी असेल का ही स्पेस ? कसे पाहिले जायचे याकडे ?

परवाच माझ्याकडची काम करणारी बेबी विचारत होती की ,”तुमच्याकडे आहे का ही पद्धत की आषाढ महिन्यात नवऱ्याच तोंड नाही पाहायचं, आमच्याकडे मुलीला घ्यायला जायचं आहे.” तिच्या मुलीचं याच वर्षी लग्न झाले.

मी तिला म्हटलं की,” पूर्वी म्हणायचे पण आता काही कोणी हे पाळत नाहीत.” त्यावर ती म्हणाली की, ” हाव !आता मुली पण यायला तयार नाही होत.”

मला लगेच यामागचं कारण क्लिक झालं. हीच का ती स्पेस ? पूर्वी ही मिळत नव्हती हे उघड आहे ,पण गरजच नव्हती असं नसावं .म्हणूनच तर हे नवऱ्याच तोंड पहायचं नाही आषाढ महिन्यात ही पद्धत निघाली असावी .आजकाल मुली यायला तयार होत नाहीत किंवा फारशी पद्धत नाही कारण प्रत्येकाला आपली स्पेस आपल्या आपल्या जागी मिळू लागली आहे असही असावं.

१९९० चे दशकातही जे तरुण होते ,त्यांनाही बऱ्याच प्रमाणात हे स्पेस ते स्वातंत्र्य अनुभवाला आलेले नाही .त्यांना गरजच वाटली नाही का ? वाटलीही असेल पण तशी पद्धतच नव्हती. काय होती परिस्थिती ? असा विचार केला जायचा याविषयी ?

फ्रेंडस् ! एकत्र कुटुंब पद्धती होती .एकदम भाऊ भाऊ ,जावा एकत्र नसले तरीही घरात वडील मंडळी आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असायची आणि त्यांचा मान राखणं ,वाकून नमस्कार करणं हवं नको बघणं,त्यांना आवडेल ,सोसेल ते पदार्थ बनवून त्यांना जेवण देणे ,त्यांच्या विश्रांतीच्या व इतर वेळा सांभाळणं ही प्राथमिकता होती. इतिहासाच्या अंगाने शेती उद्योग व इतर सेवा आधारित उद्योग या पद्धतीने जर विचार केला तर हजारो वर्षे ही कृषी-आधारित, काही शतके ही उद्योगांची आणि सेवा उद्योगांचा समावेश काही दशकांत मधलाच ! शेती ही वैज्ञानिक पद्धतीने फारशी केली जायची नाही ,त्यामुळे केवळ अनुभवावर आधारित असल्याने ,त्याला “केवळ चार पावसाळे जास्त पाहिल्याने” आदरस्थान मिळणे असा आर्थिक आणि सामाजिक संदर्भ होता. नंतरही बराच काळ संस्कारांनी ही पद्धत चालत राहिली ,अजूनही काही प्रमाणात आहे,आणि ती चांगलीही आहे.इथे आपण केवळ “छोट्याश्या स्पेस “बद्दलच केवळ बोलतो आहे.

आता स्थिती ही पूर्णपणे बदलली. येत्या काही दशकांमध्ये तंत्रज्ञान आणि इंटरनेट यातील प्रगती इतकी झाली की जितकी व्यक्ती टेक्नोसॅव्ही तेवढी तरुण होणार हे समीकरण झाले. त्याला महत्त्व आले ,वयाला असणारे महत्त्व कमी झाले. आपोआपच “संसार” या गोष्टीची संकल्पना पण बदलली. मागच्या दशकांपर्यंत संसार म्हणजे वडिलधार्‍यांची सेवा , थोड्या पैशात भागविणे, आल्यागेल्या यांचे आदरातिथ्य, घरातल्यांना खायला-प्यायला घालून तृप्त करणे ,मुलाबाळांची योग्य ती काळजी घेऊन वळण लावणे, सणसमारंभ नीट पार पाडणे, त्यातही शिक्षण असेल तर नोकरी करून संसाराला हातभार लावणे ,नाहीतर फावल्या वेळात छोटे-मोठे उद्योग करणे. करिअर करणाऱ्यांचे प्रमाण बरेच स्त्रियांसाठी कमी होते. पुरुषांसाठी पण घराचा गाडा ओढणे आणि कर्तव्य हाच भाग जास्त होता.

मध्यंतरी असच बोलत असताना, माझा कॉलेजवयीन मुलगा मला म्हणाला आई तुझी संसाराची कल्पना जशी आहे अशीच सगळ्यांची आता कशी असेल ? आता ती जुनी झाली. ती चुकीची आहे असं नाही. नवीन भांडी काढून ,सुंदर स्वयंपाक करून पाहुण्यांचे स्वागत करणे,खाऊ पिऊ घालणे, ते गेल्यावर परत ती सुंदर भांडी खराब होऊ नये म्हणून ,फुटू नये म्हणून, टिकविण्यासाठी ,स्वतःच्या हाताने घासून पुसून लगेच जागच्याजागी ठेवणे म्हणजे संसार ! सत्यनारायण ,चैत्रागौर केली की संसार ही तुझी कल्पना आहे.

थोडक्यात अपेक्षा ठीक ,अट्टाहास नको,गाडी डिमांड ट्रॅक वर जायला नको. माझं लेकरु वेगळ्या शब्दात मला विवेकनिष्ठ विचार प्रणाली कडे घेऊन गेलं. त्यामुळे मला पटलं ते. तर असा हा सगळा प्रकार असल्याने “स्पेस” शब्दच तेव्हा नवीन होता. नव्हे हद्दपार होता. काय बाई आजकालची ही थेरं असं त्याकडे बघितलं जाई ! आणि नवरा-बायकोमध्ये कसली आलीये स्पेस ? त्यांच्यात तर ट्रान्सपरन्सी हवी , इतके एकजीव नातं ते ,असं हव की दुधात जशी साखर ! त्यापलीकडे पुरुष प्रधान कुटुंब पद्धतीमुळे नवऱ्याला जे आवडेल तेच करायचं नाहीतर मूड बिघडणार अशीही परिस्थिती काही ठिकाणी होती आणि अजूनही दिसते .म्हणजे घरातल्या स्त्रीला तिचे छंद जोपासायचे म्हंटले तरी घरातल्या कर्त्या पुरुषांची परवानगी अजूनही काही ठिकाणी लागते तर दुसरीकडे बरेचदा मानसिक आणि भावनिक दृष्ट्या देखील स्त्री-पुरुष याबाबत इतके दोघं परस्परांवर अवलंबून असतात की कुणीही एक आपल्या आवडीचं काही करत असेल तर दुसरा काय करेल एकटा , तो बोअर होईल का ? हा विचार मनात असतो .खरं तर कदाचित असं काही नसतं किंवा कोणी एकाने दुसर्याची करमणूक करावी ही काही समोरच्याची जबाबदारी नसते. किंवा कोणी इतकं लहाने नसतं .पण भावनिक व मानसिक स्पेस मिळवून घेणे आणि देणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खलील जिब्रान याने प्रेमाविषयी आणि त्यासंबंधी स्पेस विषयी असे म्हंटले की,” प्रेम करा पण त्या प्रेमावर बंधन, नियम आणि अटी नकोत .मृत्यू येईपर्यंत आनंदाने एकत्र जगतानाही तुमची स्वतःची एक स्पेस असू द्या.”

तुम्ही म्हणाल आत्ताची जीवनशैली, टेक्नोसॅव्ही झाल्यामुळे त्यांची मूल्य ,त्यांची स्वप्न हे सगळंच बदललं .आता जनरेशन गॅप ,जागेची अडचण यातूनही कदाचित मार्ग निघाला. आतातरी सगळ्यांना भरपूर स्पेस आहे का ? नाही, तरीही वेळेचा अभाव ही अडचण प्रकर्षाने जाणवतेच आहे. उच्च ध्येय, पैसा ,प्रसिद्धी आणि महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठी स्पर्धा या दुष्टचक्रात २४/७/३६५ दिवस लोक काम करतात. या सगळ्याची काय गरज आहे ? बेरोजगारी, प्रदूषण, भांडवलशाही ,विनाशकारी अनावश्यक चैनीच्या वस्तूंची निर्मिती, आणि सगळं काही युज अँड थ्रो ! कुणाला सुख मिळवून देतात आहे हे सगळ ? अनेक विचारवंतांच्या मते नऊ ते चार एवढं काम आठवड्यातले चार दिवसही केलं तरी पुरणार आहे. पण आता हे जीवन चक्र फिरवणार कस ? यामध्ये कुटुंबासाठीच वेळ नाही तर स्वतःच्या स्पेस चा विचारच न केलेला बरा !

फ्रेंडस् ! खरं सांगू आपल्याला स्वतःची स्पेस गमावल्यासारखी वाटते ना ?आपल्याला स्पेस मिळणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला पाहिजे ते करता येईल असे असणे. सगळ्यांना वाटते ती मला मिळत नाही म्हणून ! काय करायच मग सांगा बरं ? यासाठी खऱ्या अर्थाने स्वतःसाठी जगायला हवं. आपण कसे जगतो ? आई-वडिलांनी शिकवलं तसं ! समाजाला आवडेल तसं ! म्हणजे लग्नासारखी वैयक्तिक गोष्ट सुद्धा कुठल्या पद्धतीने करायची तर समाजाच्या रितीभातीनुसार ! खूप मोठे रिसेप्शन, व्हिडिओ शूटिंग, झगमगाट, प्री वेडिंग शूटिंग आणि काय काय ! खायचं कुठे तर मॅकडी किंवा सीसीडी ! कपडे कुठले घालायचे ? तर ब्रँडेड ! फिरायला कुठे जायचं ?” पुस्तकांचा गाव” बघायला की तोरण्याला ! नाही , मी तुम्हाला सांगतो सिंगापूरला नाहीतर ऑस्ट्रेलियाला जाऊन आले न की येथे इंडिया मध्ये एकदम बकाल वाटू लागत. यू नो ! एव्हढा cleanliness !

मग हे सगळं ऐकूनच आपलं आपल्याला बकाल वाटायला लागलं तर ? लग्नात हौसेला” मोल नसतं” हो ! हे ऐकताना ना मग आपण केलेला ५० माणसांमधला “अनमोल” विवाह सोहळ्याला आपण कंजूस पणाच लेबल लावणार का ? असं करत असाल तर आपण आपलं “स्वत्व “गमावलय. आपण काही तरी कमी पडतो आहे अस आपल्याला वाटण्याऐवजी, इतरांना असं वाटतंय हे माझं वाटणं म्हणजे खरा न्यूनगंड !

फ्रेंड्स ! ये दुनियाकी आयने से खुद को देखना छोड दिया, तो अपना स्पेस खुद ही मिल जायेगा l

हे फक्त मी नाही म्हणत, तर एरिक फ्रॉम मानसशास्त्रज्ञाने म्हटले आहे की स्वतःच्या स्पेस वरचे हे सर्वात मोठे अतिक्रमण असते. वेळ असेल ,जागा असेल ,जुन्या पिढीची लुडबुड नसेल पण आपण जेव्हा स्वतःला खरंच हवय ते करू, स्वतःचा खरा शोध घेऊ तेव्हा स्वतःची खरी स्पेस मिळवू. स्वानंद किरकिरे यांच्या सुंदर शब्दात आपणही म्हणू शकतो,”गिव मी सम सनशाईन, गिव मी सम रेन, गिव मी सम अनादर चान्स, आय वॉ्न्ना ग्रो अप वन्स अगेन ! “

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button