सरकार पडू द्या, १०५ चे १५० आमदार कसे होतात हे तेव्हा दिसेलच- फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई : नुकताच शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. मात्र या एक वर्षात हे सरकार लवकरच पडणार असा दावा भाजपकडून (BJP) सतत केला जात आहे. ‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा आमच्याकडून कुठलाही प्रयत्न करण्यात येणार नाही. हे सरकार महाआघाडीतील अंतर्गत विरोधातूनच पडेल.

त्यावेळी भाजप एक मजबूत सरकार देईल. आमच्याकडे सध्या १०५ आमदार असले तरी त्याचे १५० आमदार कसे होतात, हे मी सांगण्याची गरज नाही. तेव्हा तशी परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे हे सरकार पडले, की १०५ आमदारांचे १५० आमदार कसे होतील, हे तेव्हा दिसेल.’ असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही, असे भाकीत केले.

तसेच भाजपचे सरकार येईल आणि बहुमताचा १४५ हा आकडाही पार केला जाईल, असे भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखतीत केले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमधून तसेच शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून माझा अनेकदा उल्लेख केला होता.  त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला हे सर्व माहीत आहे. कुणी जनतेची फसवणूक केली, हे जनतेलाही ठाऊक आहे, असे फडणवीसदेखील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER