स्टरलाईटच्या बंद कारखान्यात ऑक्सिजनचे उत्पादन करू द्या

Vedanta - Sterlite Copper - Supreme Court
Vedanta - Sterlite Copper - Supreme Court - Maharashtra Today
  • वेदान्त कंपनीचा सुप्रीम कोर्टात तातडीचा अर्ज

नवी दिल्ली : देशात कोरोना (Corona) रुग्णांसाठी सध्या जाणवत असलेली ऑक्सिजनची तीव्र टंचाई लक्षात घेऊन आम्हाला आमचा तमिळनाडूमधील बंद पडलेला स्टरलाईट कारखाना फक्त ऑक्सिजनच्या (Oxygen) उत्पादनासाठी सुरु करू द्यावा, अशी विनंती करणारा  एक तातडीचा अर्ज वेदान्त लि. या कंपनीने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारनेही कंपनीच्या या मागणीला पाठिंबा दिला आहे.

वेदान्त कंपनीतर्फे ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांनी सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी या अर्जाचा विशेष उल्लेख केला व त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. अ‍ॅड. साळवे यांनी न्यायालयास सांगितले की, कारखाना सुरु करण्याची परवानगी दिली तर आम्ही पुढील ५-६ दिवसांत तेथे ऑक्सिजनचे उत्पादन सुरु करू शकू. त्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचविणे शक्य होईल.

देशाला सध्या वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनची नितांत गरज आहे. त्यामुळे वेदान्त कंपनीस त्यांचा कारखाना फक्त ऑक्सिजन उत्पादनासाठी सुरु करू देण्यास आमची हरकत नाही, असे सांगून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कंपनीच्या अर्जाला पाठिंबा दिला.

वेदान्त कंपनीने त्यांच्या या अर्जाची प्रत आम्हाला आजच सकाळी दिली, असे सांगून तमिळनाडू सरकारतर्फे ज्येष्ठ वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याची विनंती केली. शिवाय हा कारखाना पर्यावरण रक्षणाच्या  नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बंद केलेला आहे व तमिळनाडूच्या जनतेच्या मनात या कंपनीबद्दल एकूणच अविश्वासाची धारणा आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणले.

यावर सॉलिसिटर जनरल मेहता म्हणाले की, सध्याच्या घडीला पर्यावरणीय मुद्यांहून लोकांचे प्राण वाचविणे अधिक महत्वाचे आहे. सरन्यायाधीश न्या. बोबडे सुद्धा वैद्यनाथन यांना म्हणाले की, कंपनीला ऑक्सिजनचे उत्पादन करू देण्यासही तमिळनाडू सरकारने विरोध करावा हे आपल्याला बरोबर वाटत नाही.

यानंतर, कंपनीच्या या अर्जावर उद्या शुक्रवारी सुनावणी घेण्यात येईल, असे सरन्यायाधीशांनी सांगितले. न्या. बोबडे यांचा शुक्रवार हा निवृत्तीपूर्वीचा न्यायालयीन कामाचा शेवटचा दिवस आहे.

वेदान्त रिसोर्सेस लि. या मुख्य कंपनीच्या स्टरलाईट या उपकंपनीतर्फे चालविला जाणारा हा तांबे शुद्धिकरण कारखाना तमिळनाडूत तुतीकोरीनजवळ तुथूकोडी येथे आहे. कारखान्यातून होणाºया प्रदूषणामुळे परिसरातील जमिनी नापिक झाल्या व जलस्रोत विषारी झाले. त्यामुळे स्थानिक जनता या कारखान्याच्या विरोधात अनेक वर्षे आंदोलन करत होती. २२ मे, २०१८ रोजी झालेल्या निदर्शनांच्या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १३ निदर्शक ठार झाले होते. त्यानंतर लगेचच तमिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाने व राज्य सरकारने हा कारखाना बंद करण्याचे आदेश काढले.

सरकारचा हा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाकडून रद्द करून घेण्यात कंपनीला अपयश आले. त्याविरुद्ध कंपनीने केलेले अपील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.याच प्रलंबित अपिलात कंपनीने कारखाना सुरु करू द्यावा, यासाठी गेल्या डिसेंबर व जानेवारीत केलेले अर्ज फेटाळले गेले होते. आता कंपनीने हा तिसरा अर्ज करून फक्त ऑक्सिजन उत्पादनासाठी कारखाना सुरु करू देण्याची विनंती केली आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button