माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे – मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भराडीदेवीला नमन करत कोरोना राक्षस नष्ट करून हा माझा सुंदर कोकण आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे, अशी प्रार्थना केली. कोरोनाचे (Corona) संकट असल्याने आंगणेवाडीच्या जत्रेत गर्दी करू नका या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी लाखो भाविकांचे धन्यवादही मानले. माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे, असा आशीर्वाद भराडीदेवीकडे मागताना मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीही दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लघु पाटबंधारे योजना मसुरे-आंगणेवाडी, कोल्हापुरी पाटबंधारा योजना मालोड-मालडी ता. मालवण तसेच लघु पाटबंधारे योजना कुंभवडे ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग या योजनांचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

ते म्हणाले की, इतकी वर्षे या जत्रेबद्दल मी ऐकत होतो, गेल्या वर्षी तिथे मुख्यमंत्री म्हणून येता आले याचे खूप समाधान वाटत आहे. यावेळी कोरोनामुळे आभासीपद्धतीने तुमच्याशी बोलत आहे. आभासी शब्द मला आवडत नाही. पण पर्याय नाही. आज जरी मी तिथे तुमच्यात प्रत्यक्ष नसलो तरी मनाने मी तिथेच आहे.

मला गेल्या वर्षीचे भक्तांनी फुलून गेलेले मंदिर आठवते. भराडीमातेची कृपा म्हणून इतके वर्षे मार्गी न लागलेल्या या तीन योजना आज मार्गी लागत आहेत याचा निश्चित आनंद आहे. भराडीमातेला वंदन करून प्रत्येकजण काही ना काही मागतो; पण मी भराडीमातेला विनंती करतो, की माझ्या शक्तीचा कण नि कण कोकणवासीयांसाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी वापरता येऊ दे, माझ्या हातून महाराष्ट्राचा विकास होऊ दे. कोविड काळात आपण काम करत आहोत. अनेकजण भराडीदेवीच्या उत्सवाची वाट पाहात आहेत मला माहीत आहे; पण आज आपण सगळेजण एकत्र येऊन कोरोना नामक संकटाचा मुकाबला करतो आहोत. आपण सगळे सहकार्य करत आहेत म्हणून कोरोनाची दुसरी लाट आपण थोपवू शकत आहोत. यावेळी आंगणेवाडीच्या जत्रेत कोरोना काळात गर्दी करू नका, या केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी लाखो भाविकांना धन्यवादही दिले.

उद्घाटनाला प्रत्यक्षात येणार, हे माझं तुम्हाला वचन
राज्यात अनेक धरणं, पाटबंधारे झाले पण अजून काही कामे बाकी आहेत. आता आपण गोसेखुर्द धरणाच्या कामाला गती दिली आहे. नुकताच मी तिकडे जाऊनही आलो. आज या तीन पाटबंधारे कामांचे आपण भूमिपूजन ऑनलाईन करतो आहोत; पण धरणाच्या उद्घाटनाला मी तिथे प्रत्यक्ष येईल हे माझे तुम्हाला वचन आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अनेक जण स्वत:साठी काही ना काही मागत असतात; पण मला आनंद आहे की, कोकणातील माझे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक, विश्‍वस्‍त म्हणून काम करत आहेत, स्वत:साठी काही न मागता जनतेसाठी हॉस्पिटल आणि इतर गोष्टी मागत आहेत, असा टोला त्यांनी नारायण राणेंना लगावला.

संपूर्ण कोकणपट्टा सुंदर आहे, निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. माझे कोकणावरचे प्रेम मी कधी लपवलेले नाही म्हणूनच मी गेल्या वर्षी भराडीदेवीच्या दर्शनाला आलो होतो. तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून कोकणातील योजना आणि व्यथांचा विचार केला. त्यातील अनेक गोष्टी मार्गी लावत असताना कोरोना आला आणि सगळं ठप्प झालं. असे असले तरी कोकणचा विकास मार्गी लावणार म्हणजे लावणारच, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. चिपीचे विमानतळ लवकरच सुरू होईल. ते सुरू केल्यानंतर मी तुमच्या मागे लागणार आणि विकासासाठी दरवाजे उघडण्याचे आवाहन करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. माझा कोकण संपन्न झालाच पाहिजे, यासाठी जे जे करता येईल ते ते करण्याचे वचन भराडीदेवीच्या साक्षीने माझ्या कोकणवासीयांना, माता-भगिनींना देतो.

ही बातमी पण वाचा : उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी – नारायण राणे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER