१४ वर्षांचा लिऑन बनला भारताचा ६७ वा ग्रँडमास्टर

Leon Mendonca

यंदा कोरोनाने (Corona) धुमाकूळ घातला. सारे काही विस्कळीत झाले; पण या गोंधळातही दोन भारतीय बुद्धिबळपटू (Chess) यंदा ग्रँडमास्टर (Grandmaster) ठरले. आधी जी. आकाश (G. Akash) आणि आता ३० तारखेला लिऑन मेंडोंका (Leon Mendonca) हा ग्रँडमास्टर ठरला. यासह बुद्धिबळ जगतात आता तब्बल ६७ भारतीय ग्रँडमास्टर आहेत.

अवघ्या १४ वर्षे ९ महिने १७ दिवस वयाच्या लिऑनचे हे यश म्हणजे त्याच्या जिद्द आणि चिकाटीचे फळ आहे. कोरोनामुळे तो तब्बल ९ महिने कुटुंबापासून दूर युरोपात अडकून पडला होता; पण हे संकट मानण्याऐवजी सुसंधी मानून त्याने याचा फायदा उचलला. तिकडे १६ स्पर्धांत तो खेळला आणि आपले एलो रेटिंगचे गुण  त्याने १४० ने वाढवले. ग्रँडमास्टर पदासाठी आवश्यक तिन्ही नाॕर्म त्याने तीन महिन्यातच पूर्ण केले आणि तो भारताचा ६७ वा ग्रँडमास्टर बनला.

तो जगातील २९ वा सर्वांत कमी वयाचा ग्रँडमास्टर ठरला. गोव्यातील तो दुसराच ग्रँडमास्टर आहे.

१८ मार्चपासून तो आणि त्याचे वडील कोरोनामुळे युरोपात अडकून पडले. पण या गेल्या ९ महिन्यांच्या  काळात तिकडेच १६ स्पर्धा खेळून त्याने आपले एलो रेटिंग २४५२ वरून २५४४ पर्यंत वाढवले  आणि या दरम्यान ग्रँडमास्टर पदासाठीचे नाॕर्मसुद्धा पूर्ण केले. त्याने पहिला नाॕर्म १६ ते २४ ऑक्टोबर दरम्यानच्या रिगो साखळी स्पर्धेत मिळवला. दुसरा नाॕर्म ७ ते १७ नोव्हेंबर दरम्यान बुडापेस्ट येथील स्पर्धेत आला तर शेवटचा नाॕर्म त्याने २६ ते ३० डिसेंबर दरम्यान इटलीतील व्हर्गानी कप स्पर्धेत पूर्ण केला.

या दरम्यान आर्थिक अडचणी आल्या.  युरोपातील देशांमध्ये प्रवासासाठी अडथळे आले. आई व बहिणीपासून महिनोमहिने त्याला १४ वर्षे वयात लांब राहावे लागले; पण लिऑनने खेळावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. बऱ्याचदा त्याला घराची ओढ लागली. आईची आठवण आली; पण उलट या अनुभवाने अतिशय कमी वयातच त्याला खंबीर बनवले. बुद्धिबळाचे वेड आणि वडिलांचे प्रोत्साहन त्याला प्रेरित करत राहिले.

आपल्या या यशात बऱ्याच जणांचे योगदान आहे. ईश्वराची कृपा तर आहेच; पण आईवडील व बहिणीचे प्रेम, प्रायोजकांचे पाठबळ, प्रशिक्षक विष्णू प्रसन्ना व आधीचे प्रशिक्षक यांचे  योगदान असल्याचे तो सांगतो. वयाच्या ११ व्या वर्षीच  इंटरनॅशनल मास्टर बनताना त्याने अवघ्या १७ दिवसांत त्याचे तिन्ही नाॕर्म मिळवले होते.

तो जेव्हा बुडापेस्टमध्ये होता तेव्हा ज्युडीथ पोल्गारने त्याचा उत्साह वाढवला. ही चॅम्पियन खेळाडू त्याला नुसती भेटायलाच गेली नाही तर तिने स्वतः त्याला सोबत घेत पूर्ण बुडापेस्ट शहर दाखवले.

गेल्या वर्षी विश्वविजेत्या व्लादिमीर क्रामनिक याने घेतलेल्या शिबिरातील तो एकमेव ग्रँडमास्टर नसलेला खेळाडू होता आणि त्याला क्रामनिकने शिबिरात खास बोलावून घेतले होते. बुद्धिबळाशिवाय तो उत्तम व्हायोलीनवादकही आहे.

९ महिन्यांपासून युरोपात अडकून पडल्यावर आणि आता ग्रँडमास्टर बनल्यावर तरी लिऑन मायदेशी न्यू इयर साजरे करण्यासाठी परतला असेल असे तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. तो २ ते ७ जानेवारीदरम्यान इटलीतील आणखी एका स्पर्धेत सहभागी होणार आहे. सध्या जागतिक क्रमवारीत तो २४ व्या स्थानी असून २५५० एलो रेटिंग मिळवण्याचे त्याचे ध्येय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER